सहसा संसदीय लोकशाहीमध्ये पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून मुख्यमंत्री ठरवला जातो. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांकडून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येते. सर्वसाधारणपणे विधानसभा निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री ठरवण्याची ही पद्धत. मात्र पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री कोण असावा यासाठी जनतेतूनच कौल घेतला. त्यासाठी एक दूरध्वनी क्रमांक देण्यात आला. त्यावर लोकांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून खासदार भगवंत मान यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. पंजाबमध्ये २० फेब्रुवारीला राज्यातील सर्व ११७ जागांसाठी मतदान होत आहे.

कोण आहेत हे भगवंत मान?

संगरूरमधून दोन वेळा लोकसभेवर विजयी झालेले भगवंत मान हास्य कलाकार म्हणून लोकप्रिय. शिखांमधील प्रभावी मानल्या जाणाऱ्या जाट समुदायातील ते आहेत. २०११मध्ये मनप्रित बादल यांच्या पीपल्स पार्टी ऑफ पंजाब या पक्षातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. संगरुरमधील लेहरगा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली मात्र ते पराभूत झाले. पुढे तीनच वर्षांत त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. मग २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत संगरुर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते सुखदेव सिंग धिंडसा यांचा दोन लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत देशभरात ते आपचे एकमेव उमेदवार विजयी झाले. मान यांच्यावर मे २०१७ मध्ये पंजाब प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. युवक तसेच ग्रामीण भागात मान हे लोकप्रिय आहेत. अर्थात अनेक वेळा ते वादग्रस्तही ठरले आहेत.

sharad pawar
‘गोविंदबागे’त जेवायला या! शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना स्नेहभोजनाचे आमंत्रण!
Baramati Namo MahaRojgar Melava
बारामतीमधील शासकीय कार्यक्रमासाठी शरद पवारांना पहिल्यांदा डावललं; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
himachal pradesh political crisis
हिमाचलमधील सरकार वाचविण्याचे प्रयत्न; काँग्रेस निरीक्षक राज्यात दाखल; नाराज आमदारांशी चर्चा
Eknath Shinde viral video of karyakram karen
“मुख्यमंत्री साहेब, कार्यक्रम म्हणजे काय समजायचं?”, मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ VIDEO शेअर करत काँग्रेसचा सवाल

वादाचे कारण…

मद्यपानाच्या कारणावरून मान वादात सापडले आहेत. यावरून विरोधकांना आयता मुद्दा मिळतो. जानेवारी २०१९ मध्ये बर्नाला येथील एका सभेत आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी मान यांनी मद्यपान सोडल्याची शपथ घेतल्याचे जाहीर केले. या सभेला मान यांची आई उपस्थित होती. विरोधक मात्र हा मुद्दा सोडण्यास तयार नाहीत. पण आपसमोरही मान यांच्याखेरीज दुसरा चेहरा पंजाबमध्ये नव्हता. गेल्या वेळी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला नसल्याने त्यांना पंजाबमध्ये फटका बसला अशी भावना पक्षात आहे. यावेळी ती चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न आहे.

सभांना गर्दी

मान आता परिपक्व राजकारणी झाले आहेत असे अरविंद केजरीवाल वारंवार नमूद करतात. मान यांच्या सभांनाही गर्दी होत आहे. आपला मुद्दा ते सहजपणे मांडतात. त्यांच्या प्रचारातही वेगळा बाज असतो. त्यामुळेच आता मुख्यमंत्रिपदासाठी लोकांकडून प्रतिसाद मिळालेल्या एकवीस लाखांवर मतांपैकी ९३ टक्के जणांनी मान यांच्या बाजूने कौल दिला आहे. पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेस, आम आदमी पक्ष तसेच अकाली दल अशी तिरंगी लढत आहे. याखेरीज भाजप-अमरिंदर तसेच धिंडसा यांच्या पक्षाची आघाडीही रिंगणात आहे. त्यामुळे आपपुढे आव्हान आहे. बहुतांश जनमत चाचण्यांनी आप पुढे राहील असा अंदाज वर्तवला आहे. तरीही आप व काँग्रेसमधील जागांचे अंतर फार नाही. अशा वेळी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करून आपने काठावरचे मतदार आपल्या पारड्यात वळवण्याचा प्रयत्न केला आहे.

आव्हाने कोणती?

दिल्लीत ज्याप्रमाणे केजरीवाल सरकारने शाळा तसेच रुग्णालयांमध्ये सुधारणा केल्या, तेच प्रारूप पंजाबमध्ये आणू असे आपचे आश्वासन आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आप विरोधी पक्ष ठरला तरी नंतर अनेक आमदार पक्ष सोडून गेले आहेत. आताही आपने बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित केले असले तरी पक्षाला सत्तेपर्यंत नेण्याचा मान यांचा मार्ग आव्हानात्मक आहे.