राखी चव्हाण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तीव्र गतीने वाढणाऱ्या हवामान बदलांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शाश्वत प्रयत्न करणानिमित्ताने नोव्हेंबर २०२१ मध्ये स्कॉटलंड येथे झालेल्या कॉप-२६ या जागतिक व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याच्या प्रयत्नांची दखल घेण्यात आली. या परिषदेत महाराष्ट्राला ‘इन्स्पायरिंग रिजनल लीडरशिप’ पुरस्काराने गौरवण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य ठरले. २०२१ च्या अखेरीस राज्याला हा सन्मान मिळाला असतानाच २०२२च्या सुरुवातीला हवामान बदलाच्या परिणामामुळे होणाऱ्या मृत्यूत महाराष्ट्र आघाडीवर असल्याची माहिती मिळाल्याने राज्यासमोरील चिंता वाढली आहे.

हवामान बदलाची कारणे

हवामान बदलासाठी माणूसच कारणीभूत ठरत असून त्याचे परिणामही त्यालाच भोगावे लागत आहेत. घरात, कारखान्यांमध्ये, वाहतुकीसाठी केल्या जाणाऱ्या तेल, वायू आणि कोळशाच्या वापरामुळे हवामानात झपाट्याने बदल होत आहेत. जैवइंधन जळताना त्यातून कर्बयुक्त हरितगृह वायूंचे उत्सर्जन होते. जंगलतोड हेदेखील हरितगृह वायूंचे प्रमाण वाढवण्यामागील एक कारण आहे. यात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जास्त असते. या वायूंमुळे सूर्याकडून आलेली उष्णता अडकून राहते आणि त्यामुळे पृथ्वीवरील तापमान वाढते.

‘पॅनेल ऑन क्लायमॅट’चा महाराष्ट्राला इशारा

सततच्या हवामान बदलामुळे शेतीची उत्पादकता कमी झाली असून पिके जळण्याच्या घटना वाढल्या आहेत. कीटकांचे हल्ले वाढले असून दुभत्या जनावरांकडून उत्पादन घटले आहे. मानवी शरीरावरही हवामान बदलाचे परिणाम जाणवत आहेत. हवामानातील बदलाचे महाराष्ट्रावर गंभीर परिणाम होतील, असा अहवाल संयुक्त राष्ट्रांच्या ‘इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट’ या संस्थेने दिला आहे. हवामान बदलामुळे राज्यातील दुष्काळाची तीव्रता वाढेल. उष्ण कटिबंधातील महाराष्ट्रात वातावरणात दोन ते २.५ अंश सेल्सिअस तापमान वाढ झाल्यास राज्यातील सागरी किनारपट्टी परिसर ०.१ ते ०.३ मीटरने पाण्याखाली जाईल. कोकण किनारपट्टीवरील सर्व शहरात समुद्राची उंची वाढेल. मध्य महाराष्ट्रात तीव्र दुष्काळ व जंगलात वणवे लागण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असेही या अहवालात सांगितले आहे.

महाराष्ट्रासमोरील आव्हाने

औद्योगिक तसेच आर्थिकदृष्ट्या भारतातील आघाडीवरील राज्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रासमोर मोठी जबाबदारी आहे. विकासाच्या दिशेने वाटचाल करताना पर्यावरण ऱ्हासासोबत राज्यात मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत आहे. महाराष्ट्रात नद्यांवर अनिर्बंध अतिक्रमण आहे. बेसुमार वाळू उपसा ही महाराष्ट्रातील मोठी समस्या आहे. बांधकामासाठी जवळच्या जलाशयातून बेसुमार वाळू उपसली जाते. शेतीसाठी रासायनिक औषधे आणि खताचा वापर ही आणखी एक जीवघेणी समस्या आहे. याचाही परिणाम हवामान बदलावर होत असल्याने विकास साधताना या सर्व गोष्टी टाळून पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धनाचे मोठे आव्हान राज्यासमोर आहे.

संकटांची मालिका सुरूच..?

जानेवारी २०२० मध्ये गारपीट, जून २०२० मध्ये निसर्ग चक्रीवादळ, ऑगस्ट २०२० मध्ये विदर्भातील पूर परिस्थिती, ऑक्टोबर २०२० मध्ये अतिवृष्टी आणि २०२१ मध्ये आलेले गुलाब, तौक्ते चक्रीवादळ अशी संकटाची मालिका आली. या नैसर्गिक आपत्तीत हजारो कोटी रुपयांची हानी झाली. कोकणासह मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला. महाराष्ट्रात पावसाळा सुरू होण्यापूर्वीच कोकणामध्ये दोन वेळा चक्रीवादळे आली. त्यामुळे २०२२ हे वर्ष आणखी काय घेऊन येणार, याची चिंता राज्यासमोर आहे.

rakhi.chachan@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained challenges of climate change for maharashtra exp 0122 sgy
First published on: 24-01-2022 at 07:58 IST