अन्वय सावंत

भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाने बुधवारी चाहत्यांना धक्का दिला. २०२२ हे कारकिर्दीतील अखेरचे वर्ष असल्याची घोषणा ३५ वर्षीय सानियाने केली. २१व्या शतकात भारतीय टेनिसला नवी उभारी देण्याचे श्रेय लिअँडर पेस आणि महेश भूपती यांच्यासह सानियालाही जाते. २००३मध्ये व्यावसायिक टेनिसमध्ये पदार्पण करणाऱ्या सानियाने आधी एकेरी आणि मग दुहेरीत सातत्याने यश प्राप्त करताना जागतिक टेनिसमध्ये स्वतःसह भारताचे नाव उंचावले.

canada student visa (1)
कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?
vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Brad Hogg Says Parag Is eggo
IPL 2024 : ‘त्याच्यामध्ये अजूनही अहंकार आहे…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे रियान परागबद्दल मोठं वक्तव्य
Government decision not to increase read reckoner for elections
रेडीरेकनर वाढीला निवडणुकीची वेसण; घरांच्या किमती घटणार? रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीवर काय परिणाम?

निवृत्तीच्या घोषणेमागील कारणे…

मुलाच्या जन्माच्या वेळी सानियाने काही काळासाठी टेनिस कोर्टापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मार्च २०१९मध्ये तिने पुनरागमन केले. मात्र, करोनाच्या साथीमुळे तिच्या वाटचालीवर परिणाम झाला. त्यातच वयामुळे सातत्याने स्पर्धा खेळणे, तसेच तंदुरुस्ती राखणे आणि दुखापतीतून लवकर सावरणे तिला अवघड जाऊ लागले. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत पहिल्याच फेरीत पराभवानंतर सानियाने निवृत्तीची घोषणा केली.

सानिया काय म्हणाली?

‘‘माझ्या या निर्णयामागे विविध कारणे आहेत. मला आता दुखापतीतून सावरायला बराच वेळ लागत आहे. माझा मुलगा तीन वर्षांचा आहे. त्याला सोबत घेऊन विविध स्पर्धा खेळण्यासाठी प्रवास करणे जोखमीचे आहे. जून किंवा जुलैपर्यंतच्या स्पर्धांविषयी मी कोणतीही आखणी केलेली नाही. शरीराची तंदुरुस्ती, करोनाचे आव्हान यामुळे आयुष्यातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर मी पुढील आठवड्याविषयीच धोरण आखत आहे,’’ असे सानिया म्हणाली.

तडकाफडकी निर्णय का?

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील महिला दुहेरीच्या पहिल्याच फेरीत सानियाला पराभव पत्करावा लागला. स्लोव्हेनियाच्या टॅमारा झिदानसेक आणि काया युव्हान जोडीने सानिया आणि नाडिया किशेनॉक (युक्रेन) जोडीला ६-४, ७-६ (५) असे नमवले. मात्र, मिश्र दुहेरीत तिने पहिल्या फेरीचा सामना जिंकला. त्यामुळे महिला दुहेरीतील पराभव जिव्हारी लागल्याने तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय घेतला नसल्याचे सानियाने स्पष्ट केले. ‘‘ऑस्ट्रेलियन स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभूत झाल्याने मी निवृत्त होण्याचा निर्णय घेतलेला नाही. शरीराची साथ महत्त्वाची असते. हा हंगामसुद्धा पूर्ण करू शकेन याची मला शाश्वती नाही. परंतु जागतिक क्रमवारीत ५० ते ६० या क्रमांकांमध्ये स्थान असल्याने पूर्ण हंगाम खेळण्याबाबत आशावादी आहे,’’ असे सानिया म्हणाली. बरेच आठवडे विचार केल्यानंतरच सानियाने टेनिसला अलविदा करण्याचा निर्णय घेतल्याचे तिचे वडील इम्रान यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले.

यंदाच्या हंगामात कोणती आव्हाने?

सानिया सध्या ऑस्ट्रेलियन स्पर्धेत खेळत असून शरीराने साथ दिल्यास विम्बल्डन, फ्रेंच खुली स्पर्धा आणि अमेरिकन खुली स्पर्धा या चारही ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धांमध्ये खेळण्याचा तिचा प्रयत्न असेल. तसेच यावर्षी एशियाड स्पर्धाही होणार असून त्यात देशासाठी आणखी पदके कमावण्याचे सानियाचे ध्येय असेल. भारताचे प्रतिनिधित्व करताना तिला मिश्र दुहेरीत अनुभवी रोहन बोपण्णाची साथ लाभणे अपेक्षित आहे.

झळाळती कारकीर्द

कारकिर्दीच्या सुरुवातीला प्रामुख्याने एकेरीत खेळणाऱ्या सानियाने मनगटाच्या दुखापतीमुळे दुहेरीकडे लक्ष केंद्रित केले. परंतु डब्ल्यूटीए अजिंक्यपद पटकावणारी ती पहिली भारतीय महिला टेनिसपटू ठरली. एकेरीमध्ये ३७व्या क्रमांकापर्यंत तिची मजल गेली होती. अर्थात दुहेरीत तिची कारकीर्द अधिक फुलली. तिने उल्लेखनीय यश प्राप्त करताना महिला दुहेरीत तीन (ऑस्ट्रेलियन : २०१६, विम्बल्डन : २०१५, अमेरिकन : २०१५) ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावली. ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या महिला दुहेरीत चार पैकी तीन अंतिम सामने जिंकण्यात सानिया यशस्वी ठरली आणि तिन्ही वेळा स्वित्झर्लंडची तारांकित खेळाडू मार्टिना हिंगिस तिची साथीदार होती. सानिया आणि मार्टिना जोडीने तब्बल ४४ सामने सलग जिंकण्याचाही पराक्रम केला.

तसेच मिश्र दुहेरीत भूपतीसोबत खेळताना सानियाने अप्रतिम कामगिरी केली. या जोडीने (ऑस्ट्रेलियन : २००९ आणि फ्रेंच : २०१२) दोन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या. तिने ब्राझीलच्या ब्रुनो सोरेसच्या साथीनेही २०१४ मध्ये अमेरिकन खुल्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. तसेच तिला एशियाड स्पर्धेत आठ पदके, तर राष्ट्रकुल स्पर्धेत दोन पदके जिंकण्यात यश आले.

सानिया आणि वाद…

सानियाचा वादांनीही वेळोवेळी पिच्छा पुरवला. टेनिस कोर्टावरील सानियाचे कपडे आणि तिचा वावर यामुळे तिच्यावर अनेकदा टीका झाली. २०१० मध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकशी विवाहबंधनात अडकल्याने अनेकांनी तिच्यावर टीका केली. तिच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र, तिने तिच्या खेळातून टीकाकारांची तोंडे बंद केली. सानिया भारतातील मुलींसाठी प्रेरणास्थान बनली आहे. तिच्यापूर्वी भारताच्या महिला टेनिसपटूंना फारसे यश मिळवता आले नव्हते. परंतु तिने भारतातील महिला टेनिसचा चेहरामोहरा बदलला. टीका, दुखापती असा सर्वांवर मात करत तिने युवकांसमोर उदाहरण ठेवले आहे. आता हैदराबाद येथे टेनिस अकादमी उभारत युवा खेळाडू घडवण्याचा वसा तिने घेतला आहे.