मंगल हनवते

मुंबई ते नवी मुंबई अंतर कमी करून हा एक ते दीड तासांचा प्रवास ३० मिनिटांत पूर्ण करता यावा यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र सागरी मंडळ आणि सिडको या यंत्रणांनी एकत्र येऊन वॉटर टॅक्सीचा पर्याय आणला आहे. त्यानुसार भाऊचा धक्का ते बेलापूर, बेलापूर ते जेएनपीटी आणि बेलापूर ते एलिफंटा अशा तीन मार्गांवरील वॉटर टॅक्सी सेवेला सुरुवात झाली आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीपेक्षा कमी धकाधकीचा, जलद जलवाहतुकीचा मात्र महागडा असा हा नवा पर्याय प्रवाशांच्या पसंतीस कितपत उतरतो, यावर भविष्यातील असे प्रकल्प अवलंबून आहेत.

delhi high court
नावाने ओळखले जाण्याचा अधिकार ओळखनिश्चितीसाठी महत्त्वाचा!
pegasus apple advisory
iPhone वर ‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरचे संकट, खासगी डेटावर हॅकर्सची संभाव्य ‘नजर’; उपाय काय?
iPhone users in 91 countries warned to beware of Pegasus like spyware
‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरपासून सावधान! ९१ देशांतील आयफोन वापरकर्त्यांना इशारा
Loksatta kutuhal Deep learning Internet data
कुतूहल: सखोल शिक्षण- आत्ताच का?

इंग्रजांच्या काळापासून मुंबईत जलवाहतूक?

सात बेटांनी बनलेल्या मुंबईला नैसर्गिक बंदर लाभले आहे. दोन हजार एकरवर वसलेल्या या बंदरात तीन गोदी असून सध्या मात्र एकच म्हणजे इंदिरा गोदीच सुरू आहे. याच मुंबई बंदरातून जलवाहतुकीला सुरुवात झाली. त्यावेळी जलवाहतुकीचा पर्याय केवळ मालवाहतूकीसाठीच केला जात होता. आसपासच्या देशातून, राज्यातून दिवसाला ४२ ते ४५ हजार जहाजे मुंबई बंदरात येत होती. पुढे १८७३मध्ये मुंबई पोर्ट ट्रस्टची स्थापना झाली आणि एकीकडे मुंबई बंदराचा विकास होत गेला तर दुसरीकडे जलवाहतूक व्यवस्था अधिकाधिक सक्षम होत गेली. आज मुंबई बंदर हे भारतातील एक अत्यंत महत्त्वाचे बंदर म्हणून ओळखले जाते . मुंबई बंदरासह आता १९८९मध्ये बांधण्यात आलेले जेएनपीटी बंदरही भारतात महत्त्वाचे बंदर म्हणून नावारूपाला आले आहे. मुंबई आणि जेएनपीटी बंदरातून देशातील ५० टक्के मालवाहतूक केली जाते.

ठाणेकरांचे वॉटर टॅक्सीचे स्वप्न पूर्ण; मुंबई ते ठाणे केवळ ५० मिनिटांत, बेलापूर ते ठाणे ३० मिनिटांत

मालवाहतूक ते प्रवासी वाहतूक असा प्रवास?

मुंबई बंदरातून मोठ्या संख्येने मालवाहतूक होत होती. दररोज ४५ जहाजे या बंदरात ये जा करत होती. पण पुढे मात्र जसे मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये खासगीकरण सुरू झाले तशी मालवाहतूक कमी-कमी होत गेली. कालांतराने जेएनपीटी हेच मालवाहतुकीचे मुख्य केंद्र झाले तर मुंबई बंदराचा विकास एंटरटेन्मेंट पोर्ट म्हणून करण्यात आला. येथून प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल येथे विकसित करण्यात येत आहे. या बंदरात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रूझ आता येऊ लागल्या आहेत. प्रवासी वाहतुकीतील संधी लक्षात घेता आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल तयार करून जगभरातील पर्यटकांना भारताकडे आकर्षित करण्याचा मुंबई पोर्ट ट्रस्टचा प्रयत्न आहे. तर मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना जलवाहतुकीद्वारे वाहतुकीची एक चांगला, जलद पर्याय कसा उपलब्ध करून देता येईल याचा बारकाईने विचार करण्यात येत आहे. त्यातूनच आधी रो-रो सेवा आणि आता वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे. ज्या भाऊचा धक्का येथून वॉटर टॅक्सी सुटणार आहे, ते भाऊचा धक्का बंदर मुंबईतील जुने आणि पहिले प्रवासी वाहतूक करणारे बंदर आहे. सुरुवातीला या बंदरातून कमी प्रमाणात प्रवासी वाहतूक होत होती. आता हेच भाऊचा धक्का बंदर प्रवासी वाहतुकीसाठीचे महत्त्वाचे म्हणून ओळखू जाऊ लागले आहे. आता वॉटर टॅक्सीमुळे या बंदराचे महत्त्व आणखी वाढले आहे.

वॉटर टॅक्सी का?

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तसेच जलद प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी प्रवाशी जलवाहतुकीला प्राधान्य देण्याचा प्रयत्न मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि सागरी मंडळाच्या माध्यमातून केला जात आहे. त्यातही रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर ताण कमी करण्याचाही उद्देश यामागे आहे. मुंबई महानगरात नवनवीन जेट्टी विकसित करण्यात येत आहेत. तर जलवाहतुकीचे नवे, जलद आणि अत्याधुनिक पर्यायही पुढे आणले जात आहे. त्यातूनच आता अत्याधुनिक अशा वॉटर टॅक्सी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वॉटर टॅक्सी ही अतिजलद अशी जलवाहतूक आहे. परदेशात वॉटर टॅक्सी कित्येक वर्षांपासून सुरू आहे. पण भारतात मात्र आता कुठे वॉटर टॅक्सी सुरू झाली आहे. ही देशातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा आहे हे विशेष. अतिजलद, आरामदायी आणि सुरक्षित प्रवास वॉटर टॅक्सीमुळे शक्य होत असल्यानेच मुंबईत वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे.

कसा आहे प्रकल्प?

मुंबई आणि नवी मुंबई अंतर कमी करण्यासाठी, वाहतुकीचा जलद पर्याय देण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई ते बेलापूर, मुंबई ते जेएनपीटी आणि मुंबई ते एलिफंटा अशा तीन मार्गांवर ही सेवा देण्याचे ठरले. मात्र नेरुळ आणि बेलापूर येथे जेट्टी नसल्याने या दोन ठिकाणी आधी जेट्टी विकसित करण्यास सुरुवात केली. यासाठी सिडकोची मदत घेण्यात आली. काम पूर्ण झालेल्या याच जेट्टीचे गुरुवारी लोकार्पण झाले आणि याच जेट्टीवरून देशातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा सुरू झाली. आता या जेट्टीवरून रोज दर तासाला वॉटर टॅक्सी सुटणार आहे. जेट्टी विकसित केल्यानंतर मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि महाराष्ट्र सागरी मंडळाने चार खासगी कंत्राटदारांची निवड करून त्यांना ही सेवा कार्यान्वित करण्यासाठी परवानगी दिली. या कंत्राटदारांच्या माध्यमातून तीन मार्गांवर वॉटर टॅक्सी धावण्यास सुरुवात झाली आहे. भविष्यात याचा विस्तार होण्याची शक्यता आहे. रेवस, करंजाडे अशी वॉटर टॅक्सी सुरू होण्याची शक्यता आहे.

वैशिष्ट्ये काय ?

वॉटर टॅक्सीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही अतिजलद जलवाहतूक सेवा आहे. ताशी २५ नॉटिकल माइल्स वेगाने वॉटर टॅक्सी धावते. त्यामुळेच मुंबई ते बेलापूर अंतर स्पीड बोटीने दीड तासांऐवजी केवळ ३० मिनिटांत पार करता येणार आहे. तर कॅटामरान बोटीने हे अंतर पार करण्यासाठी ५० मिनिटे लागणार आहेत. बेलापूर ते जेएनपीटी आणि बेलापूर ते एलिफंटा अंतर २० मिनिटांत पार करता येणार आहे. अतिजलद अशी ही सेवा सुरक्षित आणि आरामदायी असून गारेगार प्रवास देणारी अर्थात वातानुकूलित सेवा आहे. बेलापूर येथून प्रत्येकी १० ते ३० प्रवासी क्षमता असलेल्या ७ स्पीडबोटी आणि ५६ प्रवासी क्षमता असलेली एक कॅटामरान बोट अशा एकूण ८ बोटी प्रवाशांना वॉटर टॅक्सीची सेवा देत आहेत. दर तासाने बेलापूर आणि भाऊचा धक्का येथून वॉटर टॅक्सी सुटणार आहे. या वॉटर टॅक्सीची आसन क्षमता १४ ते ५० प्रवासी अशी आहे.

दर काय?

बेलापूर ते भाऊचा धक्का (डीसीटी) असा स्पीड बोटीने प्रवास करण्यासाठी ८२५ ते १२१० रुपये (एकेरी) मोजावे लागतील. या प्रवासाचा कालावधी ३०मिनिटे असा आहे. बेलापूर ते भाऊचा धक्का (डीसीटी) असा कॅटामरान बोटीने प्रवास करण्यासाठी २९० रुपये (एकेरी) मोजावे लागणार आहेत. त्याचा कालावधी ५० मिनिटे असेल. म्हणजेच प्रवासाची २० मिनिटे वाचवायची असतील तर प्रवाशांना ५३५ ते ९२० रुपये अधिक मोजावे लागतील. त्याच वेळी बेलापूर ते जेएनपीटी अशा स्पीड बोट प्रवासासाठी ८२५ रुपये (एकेरी) मोजावे लागतील. या प्रवासाचा कालावधी २० मिनिटे आहे. बेलापूर ते एलिफंटा स्पीड बोट प्रवासासाठी ८२५ रुपये (एकेरी) मोजावे लागतील आणि त्याचा प्रवास कालावधी २० मिनिटे असा आहे.

सेवा पसंतीस उतरणार का?

देशातील पहिल्या वॉटर टॅक्सी सेवेला प्रत्यक्षात कसा प्रतिसाद मिळतो हे महिन्याभरात स्पष्ट होईलच. पण आजच्या घडीला मात्र या सेवेला कसा प्रतिसाद मिळतो यावरून मोठी चर्चा रंगली आहे. याचे कारण म्हणजे वॉटर टॅक्सीचे दर हे भरमसाट असल्याचे आणि सर्वसामान्यांना परवडणारे नसल्याचे टीका होत आहे. त्यामुळे प्रवासाचा हा नवा पर्याय सद्यःस्थितीतील वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी करणारा ठरण्याची शक्यता कमी आहे. ही सेवा हौसेमौजेसाठीच राहण्याचीही शक्यता आहे. वॉटर टॅक्सीमुळे वेळेची मोठी बचत होणार हे खरे असले तरी दैनंदिन प्रवास करणाऱ्याना हा महागडा प्रवास परवडणारा नाही. या सेवेला प्रतिसाद मिळाला नाही तर पुढे काय असा हा प्रश्न उपस्थित झाला आहे.