महाराष्ट्रातील एकमेव ‘हत्ती कॅम्प’ गडचिरोली जिल्ह्यात असताना राज्याचे हे भूषण अधिक तेजांकित करण्याऐवजी, या ‘हत्ती कॅम्प’ मधील हत्ती गर्भश्रीमंत उद्योगपतीच्या खासगी संग्रहालयाचे भूषण वाढवण्यासाठी पाठवण्यात राज्य सरकारला धन्यता वाटत आहे. सहा दशकांचा हा इतिहास पुसण्याचा अधिकार कुणी दिला, यावरुन आता ‘हत्ती कॅम्प’शी नाळ जुळलेल्या नागरिकांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. हत्तीच्या स्थलांतरणाचा राज्य सरकारने घातलेला घाट आता त्यांच्याच अंगलट येण्याची चिन्हे आहेत. या प्रकरणात आता केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाला नोटीस पाठवण्यात आल्याने यात राज्य सरकारचे उद्योगपतीवरील प्रेम जिंकणार की स्थानिकांचे हत्तीवरील प्रेम जिंकणार हे लवकरच कळणार आहे.

‘हत्ती कॅम्प’ वाचवण्यासाठी मोहीम

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे ‘हत्ती कॅम्प’ आहे. नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या या भागात ‘हत्ती कॅम्प’मधील हत्तींचा मुक्त वावर पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक येतात. मात्र, गुजरातमधील प्राणीसंग्रहालयासाठी येथील सात हत्ती नेण्यात येणार आहेत. ओडिशासारख्या राज्यातून आलेल्या हत्तीच्या कळपाला महाराष्ट्रातील याच जिल्ह्याने आश्रय दिला असताना कमलापूर ‘हत्ती कॅम्प’मधील हत्तीच्या स्थलांतरणाला स्वयंसेवी तसेच राजकीय क्षेत्रातून विरोध होऊ लागला आहे. राज्यातील एकमेव ‘हत्ती कॅम्प’ला बळ देण्याची भाषा करणारे वनखाते हत्ती स्थलांतरित करूच कसे शकते, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. यासाठी कमलापूर बचाव अशी मोहीमच त्यांनी सुरू केली असून या विरोधाची धार अधिक तीव्र होत आहे.

supriya sule water shortage in maharashtra
“ट्रिपल इंजिनचे खोके सरकार असंवेदनशील, त्यांना…”; राज्यातील पाणी टंचाईवरून सुप्रिया सुळेंची शिंदे सरकारवर टीका!
bombay high court nitesh rane speech examine
मीरा-भाईंदर हिंसाचार प्रकरण : नितेश राणेंसह दोन भाजपा नेत्यांची भाषणं तपासण्याचे कोर्टाचे आदेश
Maharashtra
मुद्दा महाराष्ट्राचा… महाराष्ट्र समस्यांच्या विळख्यात का?
BRS in Maharashtra
अवघ्या काही महिन्यांतच ‘गुलाबी रंग’ उडाला, भारत राष्ट्र समितीचे राज्यातील अस्तित्वच धोक्यात

उद्याोगपतीच्या प्राणीसंग्रहालयासाठी घाट

गुजरातमधील जामनगर येथे मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या माध्यमातून देशातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय उभारण्यात येत आहे. २५० एकर परिसरात उभारल्या जाणाऱ्या या प्राणीसंग्रहालयात देशभरतून विविध प्राणी नेण्यात येत आहेत. केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अखत्यारितील केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधीकरणाने त्यासाठी १२ फेब्रुवारी २०१९ला मंजुरी दिली आहे. रिलायन्स राधे कृष्णा एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट हत्तीचे स्थानांतरण करणार आहे. यात ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील चार नर आणि दोन मादी हत्ती, आलापल्ली वनविभागातील दोन नर आणि एक मादी हत्ती, कमलापूर ‘हत्ती कॅम्प’मधील एक नर आणि दोन मादी हत्ती नेण्यात येणार आहेत.

‘हत्ती कॅम्प’चा इतिहास

अहेरी, एटापल्ली, सिरोंचा हे घनदाट जंगलाने व्यापलेले तालुके आहेत. येथे मौल्यवान वृक्षसंपदा आहे. १९६२ साली अहेरी तालुक्यातील कमलापूर वनपरिक्षेत्रात लाकूड वाहतुकीसाठी बसंती आणि महालिंगा या दोन हत्तींना आणण्यात आले होते. हत्तीची संख्या वाढत गेल्यानंतर कोलामार्का येथील जंगलात हत्तींना पिण्याच्या पाण्याची सोय होत नसल्याने कमलापूरपासून चार किलोमीटर अंतरावरील दामरंचा मार्गावरील जंगलात आणले गेले. हत्तींसाठी हा अधिवास उपयुक्त ठरल्यामुळे त्याला ‘हत्ती कॅम्प’ असे नाव देण्यात आले. महाराष्ट्रातील हा एकमेव ‘हत्ती कॅम्प’ आहे.

हत्तींचा जन्म आणि मृत्यू

२०२० पर्यंत या ‘हत्ती कॅम्प’मध्ये दहा हत्ती होते. २९ जून २०२० ला आदित्य या चार वर्षीय हत्तीचा चिखलात फसून मृत्यू झाला. तीन ऑगस्ट २०२१ ला सई नावाच्या हत्तीणीचा मृत्यू झाला. सहा ऑगस्ट २०२१ ला अर्जुन नावाच्या हत्तीचा मृत्यू झाला. या ‘हत्ती कॅम्प’मध्ये सध्या अजित, मंगला, बसंती, गणेश, प्रियंका, रुपा आणि राणी असे सात हत्ती आहेत. आठ जानेवारी २०२२ ला मंगला नावाच्या हत्तीणीने एका पिलास जन्म दिला. याठिकाणी आता आठ हत्ती झाले आहेत.

वनखात्याकडील हत्तींची संख्या

राज्याच्या वनखात्याकडे ताडोबा-अंधारी, मेळघाट या व्याघ्रप्रकल्पात असे मिळून सुमारे २० हत्ती आहेत. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथे असलेल्या हत्ती कॅम्पमध्येही हत्ती आहेत. जिल्ह्यातील आलापल्ली येथेही हत्ती आहेत. मात्र, कमलापूर येथील हत्तीच्या पालनपोषणासाठी शासनाकडून वेळेवर निधी मिळत नाही. एका हत्तीमागे एक माहूत आणि एक चाराकटर आवश्यक असताना तेवढेही मनुष्यबळ दिले जात नाही. एका कंत्राटी पशुवैद्यकाच्या बळावर ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प आणि हत्ती शिबिराची जबाबदारी सांभाळली जाते. मागील दोन वर्षांत हत्तीची तीन पिल्ले आजाराने मृत पावली. एवढेच नाही तर ताडोबातील हत्तीच्या हल्ल्यात कर्मचारी मृत्युमुखी तर पशुवैद्यक जखमी झाल्याच्या घटना ताज्या आहेत.