हृषिकेश देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वयाच्या ९४व्या वर्षी निवडणुकीच्या आखाड्यात उतरणे तसे आश्चर्यकारकच. देशाच्या राजकारणातील एक धुरंधर व्यक्तिमत्त्व प्रकाशसिंग बादल यांच्या नावे हा विक्रम नोंदवला जाणार आहे. यापुर्वी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व केरळचे माजी मुख्यमंत्री व्ही.एस. अच्युतानंदन यांनी २०१६ मध्ये ९२व्या वर्षी  विधानसभा निवडणूक लढवली होती. आता  शिरोमणी अकाली दलाचे सर्वेसर्वा प्रकाशसिंग बादल हे ९४ व्या वर्षी विधानसभा निवडणूक लढवत आहेत. पंजाबमध्ये २० फेब्रुवारीला राज्यातील सर्व ११७ जागांसाठी मतदान होत आहे. सत्ताधारी काँग्रेस-आम आदमी पक्ष आणि अकाली दल अशी प्रामुख्याने तिरंगी लढत राज्यात अपेक्षित आहे. १९५७पासून दहा वेळा विधानसभा निवडणूक जिंकलेल्या बादल यांनी पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्रिपद भूषवले आहे. मात्र यंदाची निवडणूक अकाली दलासाठी आ‌व्हानात्मक आहे. बहुधा त्यासाठीच बादल यांना मैदानात उतरावे लागले आहे.

अकाली दल एकाकी

अकाली दल सत्तेबाहेर आहे. गेल्या निवडणुकीत तर त्यांना विरोधी पक्षाचा दर्जाही प्राप्त करता आला नाही. आम आदमी पक्ष दुसऱ्या स्थानी राहिला होता. कृषी कायद्याच्या मुद्द्यावर अकाली दलाने भाजपशी फारकत घेतली आहे. यावेळी विधानसभेसाठी बहुजन समाज पक्षाशी त्यांनी आघाडी केली आहे. गेल्या निवडणुकीत अकाली दलाला केवळ १५ जागा जिंकता आल्या होत्या. त्यातील काही ठिकाणी तर केवळ पाच ते दहा हजार मतांनी विजयी झाले होते. भाजपची राज्यात तीन ते सहा टक्के मते गृहीत धरली तर अकाली दलाच्या शहरी भागातील या जागा धोक्यात येऊ शकतात. त्यामुळेच अकाली दलापुढे अनेक आव्हाने आहेत. कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी प्रकाशसिंग बादल यांनी पारंपरिक लांबी मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे. बादल कधीही निवडणूकीत पराभूत झालेले नाहीत यावरून त्यांचे पंजाबच्या राजकारणातील स्थान लक्षात येते.

सारे काही बादल कुटुंबाभवतीच…

अकाली दलाचे भाग्य आणि अस्तित्व बादल कुटुंबाभवतीच फिरते. प्रकाशसिंग बादल यांचे पुत्र सुखबिर यांच्याकडे पक्षाची धुरा आहे. तर सुखबिर यांच्या पत्नी हरसिमरत या खासदार आहेत. हरसिमरत यांचे बंधु विक्रमसिंग मजिठीया हे पक्षाचे प्रमुख नेते आहे. शेतकरी वर्ग हा प्रामुख्याने अकाली दलाचा आधार. त्यामुळे कृषी कायद्याच्या मुद्द्यावर त्यांनी भाजपशी असलेली जुनी मैत्री तोडली. यंदा बहुतांश जनमत चाचण्यांमध्ये अकाली दलाची कामगिरी फारशी चांगली राहणार नाही असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पक्षाच्या अनेक नेत्यांनी आम आदमी पक्ष तसेच भाजपची वाट धरली आहे. अशा स्थितीत अकाली दलापुढे मोठे आव्हान आहे.

फेरजुळणीच्या शक्यता

राजकारणात कधी कोणाची आघाडी होईल हे सांगणे कठीण आहे. भविष्यात अकाली दल-भाजप एकत्रित येतील काय? याची चर्चा सुरू आहे. अर्थात या मुद्द्यावर दोन्ही पक्षाचे नेते थेट बोलणे टाळत आहे. आजच्या घडीला पंजाबमध्ये भाजप हा, माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची पंजाब लोक काँग्रेस व अकाली दलातून बाहेर पडलेले सुखदेवसिंग धिंडसा यांच्याबरोबर आघाडीत आहे. आतापर्यंत भाजप अकाली दल आघाडीत दुय्यम भूमिकेत २० ते २५ जागा लढवत होता. तर यावेळी ६० पेक्षा जास्त जागांवर लढत आहे.

दोन-अडीच वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अकाली दल पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत येईल काय, या प्रश्नाचे उत्तर विधानसभा निकालातून मिळेल अशीच चिन्हे आहे. कारण अकाली दलाच्या कामगिरीवर बरेच काही अवलंबून आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained shiromani akali dal parkash singh badal filed his nomination papers from lambi abn 97 print exp 0222
First published on: 02-02-2022 at 11:26 IST