समजून घ्या : ‘नेजल व्हॅक्सिन’ म्हणजे काय? लहान मुलांच्या लसीकरणात ती अधिक फायद्याची कशी ठरु शकते?

देशामध्ये करोनाच्या तिसऱ्या लाटेआधी मुलांच्या लसीकरणासाठी या लसीकडे गेम चेंजर म्हणून पाहिलं जात असल्याचं अगदी जागतिक आरोग्य संघटनेच्या वैज्ञानिकांनाही म्हटलंय

what is nasal vaccine
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशाशी संवाद साधताना नेजल व्हॅक्सिनचा उल्लेख केला. (मूळ फोटो : द इंडियन एक्सप्रेसवरुन साभार)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (७ जून २०२१ रोजी) देशातील नागरिकांशी करोनाच्या पार्श्वभूमीवर संवाद साधताना नेजल व्हॅक्सिनचा उल्लेख केला. नेजल व्हॅक्सिनवर संशोधन सुरु असल्याचं सांगत मोदींनी हा शोध लागला तर त्याचा भरपूर फायदा होणार असल्याचं मत व्यक्त केलं. मात्र नेजल व्हॅक्सिन अशापद्धतीने चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनाही सुद्धा या नेजल व्हॅक्सिनला गेम चेंजर असं म्हटलं होतं. लहान मुलांसाठी ही लस गेम चेंजर ठरेल असं सौम्या यांनी काही आठवड्यांपूर्वी म्हटलेलं. करोनाची तिसरी लाट ही मुलांसाठी धोकादायक ठरणार असल्याची भीती व्यक्त केली जात असतानाच नेजल व्हॅक्सिनचे महत्व वाढलं आहे. पण नेजल व्हॅक्सिन म्हणजे काय?, भारतात कोणती कंपनी याची निर्मिती करत आहे?, त्याचा काय फायदा होणार आहे? यासारखे अनेक प्रश्न नेजल व्हॅक्सिनसंदर्भात उपस्थित केले जातात. याच प्रश्नांची उत्तरे समजून घेण्याचा केलेला हा प्रयत्न…

मोदी काय म्हणाले?

मोदींनी तिसऱ्या लाटेचा उल्लेख करत नेजल व्हॅक्सिनसंदर्भात भाष्य केलं. “करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी लहान मुलांबाबत चिंता व्यक्त केली होती. या दिशेने देखील दोन लसींची ट्रायल वेगाने सुरू आहे. याशिवाय आता देशात एका नेजल व्हॅक्सिनवर देखील संशोधन सुरू आहे. याला सूई वाटे न देता नाकात स्प्रे केलं जाणार आहे. देशाला जर नजीकच्या काळात या लसीवर यश मिळालं तर यामुळे भारताच्या लसीकरण मोहीमेस आणखी गती येईल.” असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.

नक्की वाचा >> समजून घ्या : ५०० रुपयांमध्ये दोन डोस; सर्वात स्वस्त Corbevax लस इतर लसींपेक्षा वेगळी कशी?

कोणी कंपनी करतेय निर्मिती?

कोवॅक्सीन बनवणाऱ्या हैदराबादमधील भारत बायटेकची निर्मिती असणाऱ्या आणि नकाद्वारे दिल्या जाणाऱ्या लसीची चाचणी सुरु केलीय. बीबीव्ही १५४ असं या नेजल व्हॅक्सिनची म्हणजेच नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीचं नाव आहे. ही लस प्रि क्लिनिकल टप्प्यामध्ये आहे. ही इंटरनेजल म्हणजेच नाकावाटे देण्यात येणारी लस आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये सेंट्रल ड्रग्ज कंट्रोल ऑर्गनायजेशनने (सीडीएससीओ) भारत बायोटेकला या लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणी करण्याची परवानगी दिली होती.

नक्की वाचा >> समजून घ्या : करोनानंतर लहान मुलांना होणारा MIS-C आजार आणि त्याच्या सात लक्षणांबद्दल

नाकावाटे विषाणू करतो शरीरात प्रवेश

नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीमुळे विषाणू जिथून शरीरामध्ये प्रवेश करतो तिथेच ही नेजल व्हॅक्सिन परिणामकारक ठरणार आहे. म्हणजेच विषाणू नाकावाटे शरीरामध्ये प्रवेश करण्याआधीच थांबवण्याचे प्रयत्न या लसीच्या माध्यमातून केले जाणार आहे. अनेक वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासामधून विषाणू नेजल कॅव्हिटी म्हणजेच नाकाच्या माध्यमातून शरीरामध्ये प्रवेश करतात आणि नंतर शरीरातील इतर अवयवांना इजा पोहचवतात. करोनाचा विषाणू फुफ्फुसांना सर्वाधिक धोका पोहचवतो.

चाचण्यांची स्थिती काय?

समोर आलेल्या माहितीनुसार या लसीच्या चाचणीची सर्व प्राथमिक प्रकिया पूर्ण झाली असून मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून या लसीची प्राथमिक चाचणी सुरु करणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. चाचणी पाटणा, चेन्नई, नागपूर आणि हैदराबादमध्ये सुरु करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलेलं. या चार शहरांमधील १७५ रुग्णांची या लसीच्या प्रयोगासाठी प्राथमिक चाचणीसाठी करण्यात आली आहे. सेंट्रल ट्रायल रजिस्ट्री ऑफ इंडियाने (सीटीआरआय) रुग्णांची निवड केल्यासंदर्भातील माहिती दिली होती.

नक्की वाचा >> Explained: संसर्गाची लाट म्हणजे काय? ती कशी येते? तिसरी लाट टाळता येणं शक्य आहे का?

सध्या देण्यात येणाऱ्या लसींमध्ये आणि नेजल व्हॅक्सिनमध्ये काय फरक?

सध्या भारत सरकारने करोना लसीकरण मोहिमेसाठी सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. मात्र या दोन्ही लसी इंटरामस्कुलर म्हणजेच पेशींमध्ये दिल्या जाणाऱ्या लसी आहेत. त्यापेक्षा ही नाकावाटे देण्यात येणारी लस पूर्णपणे वेगळी असल्याचा दावा केला जातोय. तसेच या नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीमुळे लसीकरण आणखीन स्वस्त होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जातेय. तसेच सध्या देण्यात येणाऱ्या सर्व लसी या दोन डोसच्या असल्या तरी ही नेजल व्हॅक्सिन एका डोसची असणार आहे. तसेच या नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीचे दुष्परिणाम कमी असणार आहेत.

नक्की वाचा >> समजून घ्या : Long Covid म्हणजे काय आणि त्यावर कशी मात करता येते?

भारत बायोटेक म्हणते…

भारत बायोटेकचे अध्यक्ष कृष्णा एल्ला यांनी यापूर्वीच कंपनी नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीसंदर्भात काम करत असल्याचे जाहीर केलं होतं. सध्याच्या लसीकरणामध्ये लसीचे दोन डोस घ्यावे लागत आहेत. त्यामुळेच लसीच्या कुप्या, इंजेक्शन, सुया असा मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कचरा निर्माण होत आहे. त्यावरच तोडगा म्हणून नाकावाटे लस देण्यासंदर्भातील संशोधन सुरु असल्याचे कृष्णा यांनी म्हटलं होतं. या नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीच्या मदतीने लसीकरण आणखीन सोप्प्या पद्धतीने करता येणार आहे. या लसीमुळे लसीच्या कुप्या, इंजेक्शन, सुया यांचा खर्च वाचवणार असल्याने लसीकरण आणखीन स्वस्त होऊन त्याचा फायदा सर्वसामान्यांना होईल असं मतही कृष्णा यांनी व्यक्त केलेलं. सध्या भारतामध्ये इंजेक्शनच्या माध्यमातून लस देण्याचा निर्णय घेण्यात आला तर सर्व लोकांना लस देण्यासाठी २६० कोटी इंजेक्शन वापरावे लागतील.

नक्की वाचा >> Explained : लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढलं तर काय होतं?; त्याचे दुष्परिणाम होतात का?

मुलांसाठी महत्वाची का?

सध्या मुलांना तोंडावाटे देण्यात येणाऱ्या पोलिओच्या लसींप्रमाणेच ही नेजल व्हॅक्सिन देता येणार आहे. नाकामध्ये लसीचे काही थेंब टाकून हे लसीकरण अधिक वेगाने, दारोदारी जाऊन, स्वस्तात करणं शक्य होणार आहे. अर्थात या लसींसाठी पोलिओच्या लसींप्रमाणेच थंड तापमान, काळजीपूर्वक हाताळणी या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. पण यासाठी येणारा खर्च आणि या लसी देण्यात असणारी फ्लेक्झिबिलीटी ही सध्याच्या व्यवस्थेपेक्षा अधिक आहे. याचमुळे कमी वेळात अधिक अधिक लोकांपर्यंत आणि खास करुन लहान मुलांचे लसीकरण या लसींच्या माध्यमातून करणे शक्य होणार आहे. या लसी सध्याच्या लसींपेक्षा अधिक स्वस्त, परिणामकारक आणि हाताळण्यास सोप्प्या असतील असं सांगितलं जात आहे. ग्रामीण भागांमध्ये सुई टोचून घेण्याची असणारी भीतीचा प्रश्न सुद्धा ही लस घेताना निर्माण होणार नाही.

नक्की वाचा >> समजून घ्या : करोना विषाणूची उत्पत्ती नक्की कुठे झाली?

करार कोणाचा आणि लस कुठे पाठवणार?

या नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीसाठी भारत बायोटेक आणि सेंट लुईच्या वॉशिंग्टन स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये परवान्यासंदर्भातील करार झाल्याची गोष्ट सप्टेंबर महिन्यात करण्यात आलेली. त्यामुळेच भारत बायोटेकला या लसीच्या वितरणाचे अधिकार मिळाले आहेत. मात्र प्राथमिक टप्प्यामध्ये कंपनी अमेरिका, जपान आणि यूरोपीयन बाजारपेठांमध्ये ही लस विकू शकत नाही अशी माहिती समोर येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व समजून घ्या बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Explained what is nasal vaccine how it can be gamechanger for kids coronavirus vaccination scsg