व्हॉट्सअ‍ॅप या इन्संटट मेसेजिंग सेवेच्या नव्या धोरणांचा (अटी व शर्ती) म्हणजेच पॉलिसीचा स्वीकार करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप युझर्सकडे अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. व्हॉट्सअ‍ॅपची नवीन धोरणं १५ मेपासून लागू होणार आहेत. सध्या तरी कंपनीने युझर्सचे अकाउंट डिलीट करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र कंपनीने त्याचवेळी जर या धोरणांचा स्वीकार केला नाही तर व्हॉट्सअ‍ॅपची फंक्शनॅलिटी कमी होत जाईल असंही सांगितलं आहे. म्हणजेच व्हॉट्सअ‍ॅपच्या या धोरणांशी युझर्सने आय अ‍ॅग्रीचा पर्याय निवडत स्वीकार केला नाही तर काही सेवा युझर्सला वापरता येणार नाहीत. जाणून घेऊयात हा सर्व प्रकार नक्की आहे तरी काय?, आणि कोणत्या सेवांवर होणार आहे याचा परिणाम?

कशावर होणार परिणाम?

> शुक्रवारी व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या नवीन प्रायव्हसी पॉलिसी म्हणजेच खासगी माहितीसंदर्भातील धोरणांबद्दल खुलासा केला आहे. कंपनीकडून अनेकदा या नवीन धोरणांसंदर्भातील रिमांइडर पाठवला जात आहेत. मात्र १५ तारखेपर्यंत कंपनीची नवीन धोरणांना युझर्सने मान्यता दिली नाही तर काही फिचर्स त्यांना वापरता येणार नाही. धोरणांचा स्वीकार न करणाऱ्या युझर्सचे अकाउंट्स लिमिटेड फक्शनॅलिटी मोडवर टाकण्यात येतील असं कंपनीने म्हटलं आहे.

> युझर्सला आपल्या व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट लिस्ट पाहता येणार नाही. अर्थात समोरच्या युझर्सकडून त्यांना मेसेज येत राहतील मात्र ते केवळ नोटिफिकेशन माध्यमातून त्यांना वाचता येतील किंवा त्या मेसेजला उत्तर देता येईल. आता ज्या पद्धतीने स्क्रोल करुन संपूर्ण चॅट लिस्ट पाहता येते ती सेवा बंद केली जाईल.

> धोरणांचा स्वीकार न करणाऱ्या युझर्सला येणारे ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल स्वीकारता येतील. मात्र १५ मेनंतरही धोरणांचा स्वीकार न करणाऱ्यांना ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल करता येतील की नाही यासंदर्भात कंपनीने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

मर्यादित सेवा देणार मात्र नोटीफिकेशन येणार

फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअ‍ॅपने नवीन धोरणांचा स्वीकार न करणाऱ्या युझर्सला मर्यादीत सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याचवेळी १५ मे नंतरही ही धोरणं न स्वीकारणाऱ्यांना यासंदर्भातील नोटीफिकेशन पाठवले जातील असंही कंपनीने म्हटलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपने यापूर्वी जे लोक या मुदतीत अटी व शर्ती स्वीकारणार नाहीत त्यांची अकाउंट बंद केली जातील असं म्हटलं होतं. मात्र नंतर कंपनीने हा निर्णय मागे घेतला. नवीन अटी व शर्ती स्वीकारण्याच्या धोरणावरून व्हॉट्सअ‍ॅपवर बरीच टिका झाली होती. व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या अटी व शर्ती या व्यक्तिगततेचे उल्लंघन करणाऱ्या आहेत अशी तक्रार केली जात होती.

काही दिवसांपूर्वीच केलेला खुलासा

काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअ‍ॅपने इमेल मेसेजमध्ये अकाउंट बंद केली जाणार नाहीत असं म्हटलं आहे. १५ मेपर्यंत जरी कुणी अटी व शर्ती स्वीकारलेल्या नाहीत, तरी त्यांची अकाउंट काढून टाकली जाणार नाहीत. भारतातील कुणाचेही व्हॉट्सअ‍ॅप वापरणे बंद करण्यात येणार नाही. पुढील अनेक आठवडे अटी व शर्ती स्वीकारण्यासाठी युझर्सला मेसेज येत राहतील. प्रवक्त्याने पुढे म्हटले आहे की, अनेक युझर्सनी नव्या अटी व शर्ती स्वीकारल्या आहेत. किती युझर्सने अटी व शर्ती स्वीकारल्या आहेत हे सांगण्यात आलेले नाही. यावर्षी जानेवारी महिन्यात व्हॉट्सअ‍ॅपने अपडेट देण्यास सुरुवात केली होती. युझर्सला नवीन व्यक्तिगतता धोरण स्वीकारण्यास सांगितले होते. सुरुवातीला कंपनीने अटी व शर्ती स्वीकारण्यास ८ फेब्रुवारी २०२१ ही मुदत दिली होती. नंतर ती १५ मे करण्यात आली.

काय आहे नवीन धोरणांमध्ये?

व्हॉट्सअ‍ॅपवरील माहिती फेसबुक व इतर संलग्न कंपन्यांशी वाटून घेतली जाईल पण ते केवळ व्यावसायिक खात्यांसाठीच असेल असे व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले होते. व्हॉट्सअ‍ॅपने असे म्हटले होते की, माहितीच्या गुप्ततेत कुठलाही बदल करण्यात येणार नाही. खासगी मेसेज कुठेही जाहीर होणार नाही तसेच युझर्सची इतर माहिती फेसबुकला दिली जाणार नाही पण तरीही या धोरणाबाबत संदिग्धता कायम राहिली. जेव्हा एखादी व्यक्ती व्यावसायिक गटांशी संपर्क साधतील तेव्हा ती माहिती विपणनासाठी फेसबुक वापरू शकेल असे सांगण्यात आले होते. व्हॉट्सअ‍ॅपने नव्या अटी व शर्ती लागू केल्यानंतर अनेकांनी टेलीग्राम व सिग्नल या उपयोजनांना प्राधान्य दिले होते. या उपयोजनांची लोकप्रियता या काळात वाढली. व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रकरणात एक दावा दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला होता. अलीकडच्या एका सुनावणीत सरकारने सांगितले की, व्हॉट्सअ‍ॅपचे नवे व्यक्तिगतता धोरण हे २०११ मधील माहिती तंत्रज्ञान नियमांचे  भंग करणारे असून कंपनीला हे धोरण राबवण्यापासून परावृत्त करावे. व्हॉट्सअ‍ॅपने आपली धोरणे राबवण्याची योजना सोडून दिल्यासारखेच आहे असे बोलले जाते.