– गौरव मुठे

शेअर बाजार हा आपल्यासाठी नाहीच, अशी समजूत हळूहळू कमी होत असल्याचे दर्शविणारे अनेक पुरावे गेल्या काही वर्षांपासून मिळत आहेतच. पण त्याच्याही आधीपासून म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा आधुनिक पर्याय सूज्ञपणे स्वीकारला जात असल्याचे दिसलेले आहे. विशेषतः छोट्या-छोट्या बचतीतून मोठी रक्कम जमा करण्याचे शिवधनुष्य उचलायचे तर ‘सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ अर्थात ‘एसआयपी’ हे म्युच्युअल फंडाने मिळवून दिलेले सर्वोत्तम साधन असल्याचा विश्वास लोकांमध्ये वाढला आहे. गुंतवणूकदारांच्या सततच्या पसंतीमुळे जानेवारीमध्ये देशातील म्युच्युअल फंड उद्योगाकडील एकूण गुंतवणूकयोग्य मालमत्ता (एयूएम) ३८ लाख कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली. ‘एसआयपी’च्या मार्गाने सुरू असलेली विक्रमी आवक यामागे निश्चितच आहे.

Drug trafficker Shirazi case
अमली पदार्थ तस्कर शिराझी प्रकरण : साडेपाच कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच
Inspiring story of Mumbai's varun sawant who is autistic chef and ultra marathoner
गोष्ट असामान्यांची Video: ऑटिस्टक शेफ आणि अल्ट्रा मॅरेथॅानर वरुण सावंतचा प्रेरणादायी प्रवास
Maharashtra State Electricity Board, Contract Workers, Strike, Supported, Permanent Employees organization
राज्यात वीज चिंता! कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात ७ कायम संघटनांची उडी
akola, Senior Civil Court, Defamation Suit, Dismisses, Intak Leader, bjp and shinde group, mla,
आजी-माजी आमदारांचा इंटक नेत्यांवरील अब्रुनुकसानीचा दावा…नेमकं प्रकरण काय?

‘एसआयपी’ खाती अत्युच्च टप्प्यावर..

म्युच्युअल फंडाची शिखर संस्था असलेल्या ‘अ‍ॅम्फी’ने दिलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत म्युच्युअल फंड उद्योगाची व्यवस्थापनाअंतर्गत मालमत्ता (एयूएम) अर्थात गंगाजळी जानेवारी २०२२ मध्ये ३८.०१ लाख कोटी रुपये झाली आहे. तर समभागसंलग्न (इक्विटी) योजनांच्या मालमत्तेचा यात वाटा १३,५६,१०६.४७ कोटींचा आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे नियोजनबद्ध पद्धतीने गुंतवणुकीचा पर्याय असलेल्या ‘एसआयपी’ खात्यांच्या संख्येने जानेवारी महिन्यात प्रथमच ऐतिहासिक पाच कोटींचा टप्पा गाठला आहे. एकट्या जानेवारीमध्ये २६ लाख नवीन ‘एसआयपी’ खाती उघडण्यात आली.

म्युच्युअल फंडांकडील ओढा काय दर्शवितो?

गुंतवणुकीची पारंपरिक साधने असलेल्या बॅंकेच्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजदरामध्ये दिवसेंदिवस कपात होत असल्याने गुंतवणूकदारांनी स्वाभाविकच चांगल्या परताव्यासाठी म्युच्युअल फंडाकडे वळण घेतले आहे. विशेष म्हणजे छोट्या गुंतवणूकदारांचा प्रतिसाद वाढताना दिसत आहे. यातून सोने-अडके, जमीन-जुमला अशा भौतिक मालमत्तांकडून, तुलनेने सुरक्षित आर्थिक मालमत्तांकडे गुंतवणूकदार वाढत असल्याचेही स्पष्ट होते. सरलेल्या जानेवारी २०२२ मध्ये म्युच्युअल फंडातील एकूण गुंतवणूकदार खात्यांची (फोलिओ) संख्या १२.३१ कोटींवर पोहोचली आहे. ज्यामध्ये मासिक आधारावर २८ टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे. दर महिन्याला नवीन एसआयपी करणाऱ्यांची संख्या गेल्या वर्षभरात २५ लाख इतकी आहे. तर मार्च २०२० पासून म्हणजे करोना उद्रेकापासून आजतागायत तब्बल ३ कोटी नवीन डिमॅट खाती उघडली गेली आहेत.

इक्विटी म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम

सरलेल्या महिन्यात समभाग आणि समभागसंलग्न योजनांच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता (एयूएम) १३,५६,१०६.४७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. बहुतांश गुंतवणूकदारांना भांडवली बाजारातील तेजीचा फायदा घ्यायचा असतो. मात्र बाजारातील अस्थिरता आणि माहितीच्या अभावी थेट भांडवली बाजारात गुंतवणूक करण्यासाठी सामान्य गुंतवणूकदार धजावत नाहीत. अशांना समभागसंलग्न म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय ठरतो. शिवाय मध्यम कालावधीत इक्विटी म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून घसघशीत परतावा प्राप्त झाला आहे, असे म्युच्युअल फंडाने आतापर्यंत दिलेल्या परताव्यावरून दिसून येते. इक्विटी म्युच्युअल फंडात नियोजनबद्ध गुंतवणूक योजना (एसआयपी) आणि नियोजनबद्ध हस्तांतर योजना (एसटीपी) मध्यम कालावधीतील गुंतवणुकीवर चांगला परतावा देऊ शकतात.

तंत्रज्ञानसुलभ गुंतवणुकीची सोयिस्करता

भांडवली बाजारातील अस्थिरतेमुळे नुकसान अनुभवलेले गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाचा पर्याय निवडण्यास प्राधान्य देतात. कारण भांडवली बाजारातील व्यवहारांसाठी योग्य माहिती आणि सल्ला छोट्या गुंतवणूकदारांना सहजासहजी उपलब्ध नाही. शिवाय स्वतःच्या कामात व्यग्र असल्यामुळे या गुंतवणुकीकडे पुरेसे लक्षही देता येत नाही. त्यामुळे तज्ज्ञ निधी व्यवस्थापकाच्या देखरेखीखालील म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सुरक्षित असते. तंत्रज्ञानाच्या आघाडीवर आमूलाग्र बदल सुरू आहेत. म्युच्युअल फंडात आता घरबसल्या ऑनलाइन व्यवहार करणे शक्य झाले आहे. ‘झिरोधा’, ‘ग्रो’ किंवा ‘अपस्टॉक’ अशा नगण्य दलाली आकारणाऱ्या मोबाईल अॅपच्या माध्यमातून गुंतवणुकीचा सुलभता अनुभवता येत आहे. त्याचबरोबर इंटरनेटच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात माहिती मिळविणे शक्य बनले आहे.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि निश्चिंतता

प्रत्येक म्युच्युअल घराणे त्यांच्या फंडातील निधीचे व्यवस्थापन करण्यासाठी निधी व्यवस्थापकाची (फंड मॅनेजर) निवड करत असतो. शिवाय गुंतवणुकीविषयी सर्व माहिती असलेली संशोधन करणारी मदतगार तज्ज्ञांची फौज निधी व्यवस्थापकाला भांडवली बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी मदत करत असते. हे तज्ज्ञ अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांचा अभ्यास करत असतात. शिवाय जागतिक पातळीवरील घडामोडी आणि देशांतर्गत भांडवली बाजारावर होणारे त्याचे परिणाम, संभाव्यता याचा नियमितपणे अभ्यास करत असतात. या अभ्यासातून निधी व्यवस्थापकाला विविध अहवाल सादर केले जातात. त्याचा तुलनात्मक अभ्यास करून निधी व्यवस्थापक गुंतवणुकीचा अंतिम निर्णय घेत असतो.

किमान गुंतवणुकीचा पर्याय

म्युच्युअल फंडामध्ये एकरकमी किंवा नियोजनबद्ध पद्धतीने दर महिन्याला थोडीथोडकी गुंतवणूक करण्याचा पर्याय देखील उपलब्ध असतो. अगदी ५०० रुपयांपासूनही गुंतवणूक सुरू करता येते. भांडवली बाजारात कमी पैशांत गुंतवणुकीला सुरुवात करता येते. मात्र म्युच्युअल फंडाचे वैशिष्ट्य म्हणजे समजा तुम्ही टॉप १०० फंडाची निवड केली असेल. तर तुमची ५०० रुपयांची गुंतवणूक भांडवली बाजारातील आघाडीच्या १०० कंपन्यांमध्ये विभागली जाते. हे थेट भांडवली बाजारात इतक्या कमी गुंतवणुकीमध्ये शक्य नसते. याचबरोबर म्युच्युअल फंडामध्ये एकाच वेळी हजारो-लाखो गुंतवणूकदार गुंतवणूक करत असल्यामुळे तुलनात्मकदृष्ट्या गुंतवणुकीचा खर्च कमी असतो.

कर बचतीचेही लाभ

कर बचतीच्या पर्यायांपैकी, म्युच्युअल फंडातील समभाग संलग्न बचत योजना (इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम्स – ईएलएसएस) सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे. ईएलएसएस गुंतवणुकीतून प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत कर वजावटीचा लाभ मिळविता येतो. ईएलएसएसच्या माध्यमातून समभागांमध्ये अधिक प्रमाणात गुंतवणूक केली जात असल्यामुळे ती इतर सर्व करबचत करणाऱ्या पर्यायांपेक्षा वेगळी आणि कर बचतीव्यतिरिक्त तिची संपत्ती निर्मितीची क्षमता देखील अधिक असते.

Gaurav.muthe@expressindia.com