पंजाबमध्ये १४ फेब्रुवारीला विधानसभेच्या ११७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. अशा स्थितीत सत्ता मिळविण्यासाठी सर्वच पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे आम आदमी पार्टी बद्दल बोलायचे झाले तर २०१७ च्या विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह दिस आहे. वास्तविक या सगळ्यामागे अनेक कारणे आहेत जी आम आदमी पार्टीच्या अपेक्षांना बळ देत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तर पंजाबमध्ये मुख्य लढत ही आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्येच असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे एबीपी ओपिनियन पोलनुसार आम आदमी पार्टी सत्तेत येण्याची देखील शक्यता आहे. आम आदमी पार्टीला ५२ ते ५८ जागा मिळू शकतात तर काँग्रेसला ३७ ते ४३ जागा मिळण्याचा शक्यता वर्तवली गेली आहे. अकाली दलाला १७ ते २३ आणि भाजपाल १ ते ३ जागांवरच यश मिळू शकते असंही सर्वेतून दिसून आलं आहे.

‘आप’च्या बळकटीची महत्त्वाची कारणे –

‘आप’ला ताकदवान बनवण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे सत्ताधारी काँग्रेस. खरे तर, गेल्या काही महिन्यांत काँग्रेसमधील गटबाजी आणि माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे पक्षापासून वेगळे होणे हा काँग्रेसचा कमकुवत दुवा मानला जात आहे. त्याच वेळी, २०१७ मध्ये १५ जागा जिंकणारा शिरोमणी अकाली दल देखील ताकदीने पुनरागमन करण्यात अपयशी ठरला आहे. अशा परिस्थितीत लोकांना बदल हवा आहे.
या सगळ्यात आम आदमी पार्टी स्वत:साठी एका चांगली संधी मानत आहे. याशिवाय आप ने राज्यात आपली पकड मजबूत करण्यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत.

मागील पाच वर्षांतील ‘आप’च्या समस्या –

मागील पाच वर्षांत ‘आप’मध्ये अंतर्गत भांडणे होती. २०१७ मध्ये पक्षाला २० जागा मिळाल्या होत्या. मात्र, अनेक आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अशा स्थितीत आता ‘आप’ची संख्या निम्मीच उरली आहे. तर, विधानसभेत पक्षाचे अजूनही १७ आमदार आहेत.

अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’ने २०१७ मध्ये पंजाबमध्ये सुमारे १०० जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवला होता, परंतु निकाल फक्त २० जागांपर्यंतच मर्यादित राहिला. ज्यामध्ये बहुसंख्य जागा (१८) माळवा विभागातून आणि दोन दोआबा मधून जिंकल्या गेल्या. तर माढा भागात पक्षाला खातेही उघडता आले नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पंजाबमध्ये आपच्या लोकप्रियतेत घट झाली. पक्षाच्या बाजूने केवळ प्रदेशाध्यक्ष भगवंत मान यांना विजय मिळवता आला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकालही तितकेच निराशाजनक होते.

मात्र, गेल्या वर्षभरात ‘आप’कडून पक्ष मजबूत करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. दिल्लीचे आमदार जर्नेल सिंग यांची राष्ट्रीय नेतृत्वाने पंजाबचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आणि त्यानंतर राघव चढ्ढा यांची राज्याचे सह-प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. चड्ढा यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारात अनेक प्रसंगी सांगितले आहे की, २०१७ च्या तुलनेत आप माजा प्रदेशात चांगली कामगिरी करेल.

यावेळी आम आदमी पक्षाने विधानसभेच्या ११७ जागांसाठी १०९ उमेदवारांची घोषणा केली आहे. रविवारी, ९ जानेवारी रोजी राघव चढ्ढा यांनी काँग्रेसमधील अंतर्गत कलहाकडे बोट दाखवत म्हटले की, “चन्नी सिद्धूसोबत नाही, जाखड चन्नी आणि सिद्धू एकत्र नाहीत आणि सुखजिंदर रंधावा सिद्धू यांच्यासोबत नाहीत”. ही परिस्थिती पाहता, आम आदमी पार्टी सत्ता मिळविण्याची ही चांगली संधी असल्याचा विचार करत आहे.

नुकत्याच झालेल्या चंदीगड महानगरपालिकेच्या निवडणुकीत ‘आप’ने चांगली कामगिरी केली. या निवडणुकीत त्यांनी १४ प्रभाग जिंकले. तर भाजपला १२, काँग्रेसला ८ आणि अकाली दलाला १ जागा मिळाली. विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या या निवडणुकीतील चांगली कामगिरी ही बाब पक्षाचे मनोबल वाढवणारी असल्याचे मानले जात आहे.

“जर २०२२ च्या विधानसभा निवडणुकीनंतर पंजाबमध्ये आपचं सरकार स्थापन झालं तर आम्ही १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक महिलेला दर महिन्याला १,००० रुपये देऊ. हे पैसे थेट महिलांच्या खात्यावर जमा होतील. एखाद्या कुटुंबात ३ महिला असतील तरीही प्रत्येक महिलेला १,००० रुपये मिळतील. कोणत्याही सरकारने महिला सबलीकरणासाठी राबवलेला हा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम असेल.” असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलेलं आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punjab assembly election arvind kejriwals aap is looking powerful this time due to these reasons msr
First published on: 11-01-2022 at 12:26 IST