मनरेगा कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांच्या मजुरीमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (MGNREGA) अंतर्गत मजुरीच्या दरांमध्ये बदल करण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे.
मनरेगा कायदा २००५ च्या कलम ६(१) अंतर्गत ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याअंतर्गत मजुरांच्या वेतनात ७ रुपयांपासून २६ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली असून, १ एप्रिलपासून नवीन दर लागू होणार आहेत. वाढलेल्या मजुरीच्या दराचा फायदा हा महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणाऱ्या कामगारांनाही होणार आहे. या वाढीनंतर हरियाणामध्ये सर्वाधिक दैनंदिन मजुरी ३५७ रुपये प्रति दिवस असेल आणि मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सर्वात कमी २२१ रुपये प्रति दिवस असेल.
राजस्थानमध्ये मजुरीत सर्वाधिक वाढ
केंद्र अधिसूचनेद्वारे त्यांच्या लाभार्थ्यांसाठी वेतन दर निश्चित करू शकते. मागील वर्षीच्या दरांच्या तुलनेत मजुरीत सर्वाधिक टक्के वाढ राजस्थानमध्ये झाली आहे. राजस्थानसाठी सुधारित वेतन २५५ रुपये प्रतिदिन निश्चित करण्यात आले आहे, जे २०२२-२३ मध्ये २३१ रुपये होते.
बिहार आणि झारखंडमध्ये जवळपास ८ टक्क्यांची वाढ
बिहार आणि झारखंडमध्ये या योजनेंतर्गत मजुरांच्या वेतनात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ८ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. गतवर्षी या दोन राज्यांमध्ये दैनंदिन मजुरी २१० रुपये होती, ती आता २२८ रुपये झाली आहे.
छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात सर्वात कमी वेतन
छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये सर्वात कमी दैनंदिन वेतन २२१ रुपये आहे. यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२२-२३ मध्ये दोन्ही राज्यांतील मजुरांची दैनंदिन मजुरी २०४ रुपये होती. कर्नाटक, गोवा, मेघालय आणि मणिपूर ही राज्ये आहेत ज्यांनी सर्वात कमी टक्केवारी वाढ नोंदवली आहे.