Javelin throw rules for Olympics : भारताचा ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा आज (दि. ८ ऑगस्ट) रोजी पुन्हा एकदा सुवर्णवेध घेण्यासाठी सज्ज झाला आहे. याआधी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमधूनही त्याच्याकडून भारतीय क्रीडाप्रेमींच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. मंगळवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रानं त्याची यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवत ८९.३४ मीटर भालाफेक करत सुवर्णपदकाच्या शर्यतीत प्रवेश केला होता. कुस्तीपटू विनेश फोगटला ५० किलोहून फक्त १०० ग्रॅम वजन अधिक भरल्यामुळे अपात्र व्हावे लागले होते. कुस्तीप्रमाणेच भालाफेक या खेळाचेही नियम आहेत. ते जाणून घेऊ. भालाफेक खेळाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश कधी? भालाफेक हा ऑलिम्पिकमधील प्राचीन खेळ आहे. इसवी सन पूर्व ७०८ पासून हा खेळला जात आहे. १९०८ पासून त्याचा ऑलिम्पिकमध्ये पुन्हा समावेश झाला. तर १९३२ पासून लॉस एंजिलिस ऑलिम्पिकमध्ये महिलांसाठीही भालाफेक स्पर्धा सुरू झाली. तेव्हापासून या खेळात अनेक नियम बदलत आले आहेत. हे वाचा >> हॉकी संघाने सलग दुसऱ्यांदा कोरलं कांस्यपदकावर नाव; श्रीजेशच्या कारकीर्दीचा गोड शेवट भाल्याचे वजन आणि लांबी किती? ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भाल्याचे काही नियम आखून दिलेले आहेत. प्रत्येक भाला त्या नियमाच्या अंतर्गत तयार केलेला असतो. पुरूष खेळाडूंच्या भाल्याचे वजन ८०० ग्रॅम आणि लांभी २.६ ते २.७ मीटर इतकी असते. तर महिला खेळाडूंच्या भाल्याचे वजन ६०० ग्रॅम आणि लांबी २.२ ते २.३ मीटर इतकी असते. भाल्याचे तीन भाग असतात डोकं, मधला भाग (Shaft) आणि ग्रीप पकडण्याची जागा. भाल्याचा मधला भाग धातू किंवा इतर सामग्रीपासून तयार केलेला असतो. तो घन किंवा पोकळही असू शकतो, मात्र त्याचा पृष्ठभाग गुळगुळीत असावा, असा नियम आहे. भाल्याच्या पुढच्या भागाला डोकं (Head) म्हटले जाते. त्यावर धातूचे टोकदार आवरण लावलेले असते. भालाफेक खेळाच्या मैदानाचे दोन भागात विभागणी केलेली असते. एक म्हणजे धावपट्टी (runway) आणि दुसरी भाला ज्या ठिकाणी रोवायचा आहे ती जागा (landing sector). भाला दूरवर फेकण्यासाठी खेळाडूला धावपट्टीवर धावत जाऊन भाल्याला वेग आणि लांबी प्रदान करायची असते. त्यासाठी ३० मीटरची धावपट्टी तयार करण्यात येते. जर गरज भासल्यास धावपट्टी ३६.५० मीटरपर्यंत वाढवता येते. धावपट्टीची रुंदी जास्तीत जास्त ४ मीटर असते. धावपट्टीच्या शेवटी ८ मीटरचा शेवटचा टप्पा असतो ज्या भागातून भालाफेक करणारा खेळाडू भाला फेकतो. तिथे एक समाप्त रेषाही (foul line) आखून दिलेली असते. ही रेषेच्या अलीकडूनच भालाफेक करावी लागते. लँडिंग सेक्टर भालाफेक मैदानाची रचना नरसाळ्या सारख्या आकाराची असते. धावपट्टी ही खालचा भाग. त्यानंतर पुढच्या त्रिकोणी भागात लँडिंग सेक्टर असतो. लँडिंग सेक्टरचा भाग गवत किंवा आर्टिफिशियल टर्फने तयार करतात.