Ayushman Card Usage Limit: देशातील गरीब आणि गरजू कुटुंबांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेली आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आज लाखो कुटुंबांसाठी आधारवड ठरली आहे. जगातील सर्वांत मोठ्या सरकारी आरोग्य विमा योजनांपैकी एक मानली जाणारी ही योजना पात्र कुटुंबांना दरवर्षी तब्बल पाच लाख रुपयांपर्यंत मोफत व कॅशलेस उपचारांची हमी देते. त्यामुळे गंभीर आजारांच्या उपचाराचा मोठा आर्थिक भार हलका होतो. मात्र, अनेकांच्या मनात एक प्रश्न कायम असतो- आयुष्मान कार्डचा वर्षभरात नेमका किती वेळा वापर करता येतो? चला, याबाबतचे नियम आणि महत्त्वाच्या अटी जाणून घेऊया.

वर्षात किती वेळा उपचार मिळू शकतात?

आयुष्मान कार्डधारकांसाठी उपचारांच्या संख्येवर कोणतीही ठरावीक मर्यादा नाही. म्हणजेच गरज भासल्यास लाभार्थी वर्षभरात कितीही वेळा रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेऊ शकतो. मात्र, एक महत्त्वाची अट लक्षात ठेवावी लागते- संपूर्ण कुटुंबासाठी एका पॉलिसी वर्षात पाच लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च होऊ नये. ही रक्कम ‘कुटुंब फ्लोटर’ पद्धतीने लागू होते. म्हणजे कुटुंबातील एक व्यक्ती किंवा सर्व सदस्य मिळून या मर्यादेपर्यंत उपचार घेऊ शकतात. एकदा पाच लाखांची मर्यादा पूर्ण झाली की, त्या वर्षात पुढील मोफत उपचार मिळत नाहीत. मात्र, नवीन पॉलिसी वर्ष सुरू झाल्यावर ही मर्यादा या पॉलिसीचे आपोआप नूतनीकरण होऊन, तिच्या रकमेची मर्यादा पुन्हा पाच लाख रुपयांपर्यंत होते.

कोणते खर्च समाविष्ट असतात?

या योजनेंतर्गत रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि नंतरच्या ठरावीक कालावधीतील खर्चदेखील समाविष्ट केला जातो. तपासण्या, औषधे, शस्त्रक्रिया, आयसीयूमधील उपचार, प्रत्यारोपणासाठी लागणारी साधने, रुग्णालयातील आहार आणि डिस्चार्जनंतर १५ दिवसांपर्यंतचा फॉलोअप यांचा खर्च या योजनेत समाविष्ट असतो. विशेष म्हणजे, आधीपासून असलेल्या आजारांनाही पहिल्या दिवसापासून संरक्षण दिले जाते. शेकडो उपचार पॅकेजेस आणि हजारो वैद्यकीय प्रक्रिया या योजनेत अंतर्भूत आहेत. शासनाच्या यादीतील सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये हे उपचार कॅशलेस पद्धतीने मिळू शकतात.

उपचार कुठे मिळतात?

आयुष्मान कार्डाचा लाभ फक्त त्या रुग्णालयांमध्ये मिळतो, जे या योजनेंतर्गत नोंदणीकृत आहेत. देशभरातील अनेक सरकारी रुग्णालयांसह अनेक नामांकित खासगी रुग्णालयेही या योजनेत सहभागी आहेत. लाभार्थी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपल्या राज्य व जिल्ह्यानुसार नोंदणीकृत रुग्णालयांची यादी तपासू शकतात. रुग्णालयात पोहोचल्यानंतर ओळख पडताळणी पूर्ण केली जाते आणि त्यानंतर उपचाराची संपूर्ण प्रक्रिया कॅशलेस पद्धतीने केली जाते.

कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे?

उपचार घेण्यापूर्वी आयुष्मान कार्ड सक्रिय आहे याची खात्री करून घ्या. आधार-आधारित ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणे आवश्यक आहे. संबंधित आजार हा योजनेतील पॅकेजमध्ये समाविष्ट आहे का, हे तपासणे महत्त्वाचे आहे. तसेच, ज्या रुग्णालयात उपचार घ्यायचे आहेत, ते या योजनेच्या यादीत समाविष्ट आहे याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.

योग्य माहिती आणि नियमांची जाणीव ठेवल्यास आयुष्मान कार्ड ही योजना संकटसमयी मोठा दिलासा देऊ शकते. त्यामुळे प्रत्येक पात्र कुटुंबाने या योजनेचा योग्य लाभ घ्यावा, हीच अपेक्षा.