How to Transfer Voter ID Card online: मतदार ओळखपत्र हे मुख्यतः भारतीय नागरिक असल्याची ओळख आहे. मतदार ओळखपत्र भारतीय नागरिकांसाठी निवडणूक आयोगाने दिलेलं ओळखपत्र आहे. कोणत्याही निवडणुकीत मतदान करताना मतदार ओळखपत्र दाखवावे लागते. तसेच सरकारने जारी केलेला हा एक ओळखीचा पुरावा म्हणून देखील तुम्ही वापरू शकता. निवडणुकीवेळी मतदान करण्यासाठी तुमच्याकडे मतदार ओळखपत्र अर्थात Voter ID असणं गरजेचं आहे.

सध्या विधानसभा निवडणुकांचं वारं वाहू लागलं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यातील कित्येक विवाहित महिला यंदा पहिल्यांदा मतदान करणार आहेत, त्यामुळे आता काही दिवसांत मतदान करण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे. बऱ्याचदी मुलींना लग्नानंतर मतदान ओळखपत्र नवीन पत्त्यावर ट्रान्सफर करण्याची गरज भासते. भारतीय निवडणूक आयोगाने सोयीस्कर ऑनलाइन प्रणालीद्वारे लग्नानंतर मतदार ओळखपत्र ट्रान्सफर करणे सोपे केले आहे. तुम्ही घरबसल्यादेखील ऑनलाइन ही प्रक्रिया करू शकता. यासंबंधिचीच माहिती आपण या लेखात घेणार आहोत. मुलीचे लग्न झाले, परंतु नवीन पत्त्यावर मतदान ओळखपत्र ट्रान्सफर कसे करायचे तुम्हाला माहिती नसेल तर जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस…

भारत निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र ऑनलाइन नवीन पत्त्यावर हस्तांतरित करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता असेल.

लग्नानंतर ऑनलाइन मतदार ओळखपत्र ट्रान्सफर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • युटिलिटी बिल (पाणी, गॅस, वीज) हे मागील एक वर्षाच्या आत दिलेले असावे.
  • आधार कार्ड
  • राष्ट्रीयीकृत किंवा शेड्युल्ड बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून चालू पासबुक
  • भारतीय पासपोर्ट
  • शेतकरी खातेवहीसह महसूल विभागाच्या जमिनीच्या मालकीच्या नोंदी
  • नोंदणीकृत लीज किंवा भाडे करार
  • नोंदणीकृत विक्री करार

(हे ही वाचा : पाकिस्तानमधल्या ‘या’ सर्वांत मध्यवर्ती ठिकाणाला आजही टिळकांचे ‘हे’ नाव कायम; कारण काय? जाणून घ्या रंजक किस्सा…)

अर्ज करण्यासाठी जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया

  • पायरी १- सर्व प्रथम राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल (NVSP) वेबसाइटवर जा.
  • पायरी २-‘शिफ्टिंग ऑफ रेसिडेंस’ हा पर्याय होम पेजवरच दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला ‘फॉर्म ८’ वर टॅप करून तो भरावा लागेल.
  • पायरी ३- आता ‘सेल्फ’वर क्लिक करा आणि EPIC क्रमांक टाका आणि सबमिट करा.
  • पायरी ४- येथे तुम्हाला मतदार तपशिल नीट तपासावे लागेल आणि नंतर ‘शिफ्टिंग ऑफ रेसिडेन्स’वर क्लिक करावे लागेल.
  • पायरी ५- काही महत्त्वाचे तपशील फॉर्म ८ मध्ये भरावे लागतील. जसे की, राज्य, जिल्हा, विधानसभा, आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक, ईमेल आणि नवीन पत्ता, पत्ता पुरावा दस्ताऐवज, अशी माहिती भरावी लागेल. यानंतर कॅप्चा कोड एंटर करून सबमिट करा.
  • पायरी ६- फॉर्म ८ भरल्यानंतर तुमच्या मोबाइल नंबर आणि ईमेलवर अॅप्लिकेशन रेफरन्स नंबर येईल.
  • पायरी ७- काही दिवसांनंतर, तुम्ही NVSP पोर्टलवरून डिजिटल मतदार ओळखपत्र डाउनलोड करू शकाल.

अशाप्रकारे घरबसल्या सोप्या पध्दतीने तुम्ही लग्नानंतर मतदान ओळखपत्र नवीन पत्त्यावर ट्रान्सफर करु शकता.