Train Emergency Chain Coach Detection: भारतीय रेल्वे ही देशाची जीवनवाहिनी मानली जाते. दररोज कोट्यवधी प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. लांबचा प्रवास असो किंवा दैनंदिन प्रवास, रेल्वे हा अनेकांचा सर्वांंत विश्वासार्ह पर्याय आहे. मात्र, प्रवासादरम्यान प्रत्येक डब्यात असलेल्या लाल रंगाच्या आपत्कालीन चेनकडे अनेकांचं लक्ष जातं. ही चेन नेमकी कशासाठी असते, ती ओढल्यावर संपूर्ण रेल्वे कशी थांबते आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे रेल्वेच्या चालकाला किंवा गार्डला नेमकं कोणत्या डब्यात चेन ओढली गेली आहे हे कसं कळतं, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो.

या प्रश्नामागचं उत्तर रेल्वेच्या अत्याधुनिक ब्रेकिंग यंत्रणेत दडलं आहे.

चेन ओढताच रेल्वे का थांबते?

रेल्वेच्या प्रत्येक डब्यात आपत्कालीन परिस्थितीसाठी अलार्म चेन बसवलेली असते. एखादा प्रवासी गंभीर अडचणीत असेल, अपघाताची शक्यता निर्माण झाली असेल किंवा कोणाचाही जीव धोक्यात असेल, अशा प्रसंगी ही चेन ओढण्याची परवानगी असते.

प्रवाशाने चेन ओढताच रेल्वेच्या ब्रेकिंग यंत्रणेत बदल होतो. त्यामुळे रेल्वेचा वेग कमी होत जातो आणि काही अंतरानंतर ती थांबते. त्यामुळे कोणतीही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक वेळ मिळतो.

चालकाला लगेच कसं समजतं?

अनेकांना वाटतं की, चेन ओढल्यानंतर चालकाला फोन किंवा वायरलेसद्वारे माहिती दिली जात असेल. प्रत्यक्षात मात्र त्यामागे पूर्णपणे यांत्रिक आणि तांत्रिक व्यवस्था कार्यरत असते.

रेल्वेमध्ये ब्रेक प्रणाली हवेच्या दाबावर म्हणजेच एअर प्रेशरवर आधारित असते. एखाद्या डब्यात चेन ओढली की, ब्रेक पाइपमधील हवेचा दाब अचानक कमी होतो. हा बदल क्षणार्धात इंजिनापर्यंत पोहोचतो आणि इंजिनामधील उपकरणांवर हा दाब कमी झाल्याचा संकेत चालकाला दिसतो. त्यावरून चालकाला समजते की, रेल्वेतील एखाद्या डब्यात आपत्कालीन चेन ओढली गेली आहे.

मग नेमका डबा कसा शोधला जातो?

रेल्वे थांबल्यानंतर पुढची जबाबदारी गार्ड आणि रेल्वे कर्मचाऱ्यांची असते. ते प्रत्येक डब्याची तपासणी करतात. ज्या डब्यात चेन ओढली गेली असते, त्या डब्यातील अलार्म चेन पुलिंग (ACP) यंत्रणा सक्रिय झालेली असते.

डब्यातील एसीपी इंडिकेटर किंवा संबंधित व्हॉल्व्ह कार्यान्वित झाल्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना काही मिनिटांतच नेमका डबा ओळखता येतो. त्यामुळे तपासणी अधिक जलद आणि अचूक पद्धतीने करता येते.

कोणत्याही कारणाशिवाय चेन ओढणं योग्य आहे का?

अनेकदा काही प्रवासी स्टेशन सुटल्यानंतर गाडी थांबवण्यासाठी किंवा इतर किरकोळ कारणांसाठी चेन ओढतात. मात्र, असे करणे भारतीय रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन मानले जाते.

रेल्वे प्रशासनाच्या नियमांनुसार, ठोस आपत्कालीन परिस्थिती नसताना चेन ओढल्यास संबंधित प्रवाशावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. काही प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाईचाही सामना करावा लागू शकतो.

विनाकारण चेन ओढल्याने नेमकं नुकसान कोणाचं होतं?

रेल्वे काही मिनिटांसाठी थांबली तरी त्याचा परिणाम पुढील संपूर्ण वेळापत्रकावर होऊ शकतो. एका रेल्वेला उशीर झाला, तर त्यामागील अनेक गाड्यांच्या वेळापत्रकावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते.

त्याशिवाय हजारो प्रवाशांचा वेळ वाया जातो, रेल्वेचे संचालन विस्कळित होऊ शकते आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी असलेल्या यंत्रणेचा गैरवापर होतो. त्यामुळे रेल्वे प्रशासन वारंवार प्रवाशांना आवाहन करतं की, अलार्म चेनचा वापर केवळ जीविताला धोका, अपघात किंवा खऱ्या आपत्कालीन परिस्थितीतच करावा.

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशानं या नियमांची माहिती ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण- एका चुकीच्या कृतीमुळे केवळ रेल्वेच उशिरा पोहोचत नाही, तर हजारो प्रवाशांचा प्रवासही प्रभावित होऊ शकतो. त्यामुळे पुढच्या वेळी रेल्वेच्या डब्यातील लाल रंगाची चेन दिसली, तर ती केवळ गरज असेल तेव्हाच वापरण्याचं महत्त्व नक्की लक्षात ठेवा.