India’s Longest-Named Railway Station Has 28 Letters: भारतीय रेल्वे हे जगातील सर्वांत मोठ्या रेल्वेजाळ्यांपैकी एक मानलं जातं. दररोज कोट्यवधी प्रवासी रेल्वेने देशाच्या कानाकोपऱ्यात प्रवास करतात. गेल्या काही वर्षांत भारतीय रेल्वेने स्थानकांचे आधुनिकीकरण, प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा आणि वेगवान सेवा यांवर विशेष भर दिला आहे. त्यामुळे अनेक रेल्वेस्थानके त्यांच्या आधुनिक रूपामुळे चर्चेत असतात. मात्र, काही स्थानके अशीही आहेत, जी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण इतिहासामुळे किंवा अनोख्या ओळखीमुळे आजही देशभरात प्रसिद्ध आहेत.

भारतातील अनेक रेल्वेस्थानकांमागे एखादी रंजक गोष्ट दडलेली आहे. काही स्थानके त्यांच्या रचनेसाठी प्रसिद्ध आहेत, तर काही स्थानके भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे कायम चर्चेत असतात. त्यामुळे रेल्वेप्रेमी आणि प्रवाशांमध्ये अशा स्थानकांविषयी नेहमीच उत्सुकता असते.

उदाहरणार्थ- उत्तर प्रदेशातील मथुरा जंक्शन हे असे स्थानक मानले जाते, जिथून देशाच्या विविध भागांसाठी रेल्वेगाड्या उपलब्ध होतात. त्यामुळे या स्थानकाला महत्त्वाचे रेल्वे केंद्र मानले जाते.

महाराष्ट्रातील नवापूर रेल्वेस्थानक आणखी एका वैशिष्ट्यामुळे प्रसिद्ध आहे. या स्थानकाची रचना अशी आहे की, रेल्वेगाडीचा काही भाग महाराष्ट्रात, तर काही भाग गुजरातमध्ये उभा राहू शकतो. त्यामुळे हे स्थानक दोन राज्यांच्या सीमारेषेवरील आगळ्या वैशिष्ट्यासाठी ओळखले जाते.

त्याशिवाय काही स्थानके त्यांच्या नावामुळेही विशेष लक्ष वेधून घेतात. ओडिशातील कटक, कर्नाटकमधील गदग व हरियाणातील कालका या स्थानकांची नावे पुढून किंवा मागून वाचली तरी सारखीच दिसतात. त्यामुळे पुढून किंवा मागून सारख्याच वाचल्या जाणाऱ्या नावांतील शब्दरचनेच्या वैशिष्ट्यामुळे ही स्थानके वेगळी ठरतात.

तर कर्नाटकमधील सिद्धारूढ स्वामीजी हुबळी हे रेल्वेस्थानक हे भारतातील सर्वांत लांब रेल्वे फलाटासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे या स्थानकाचे नावही वारंवार चर्चेत येते.

मात्र, या सर्व वैशिष्ट्यांपेक्षा एक रेल्वेस्थानक अशी ओळख निर्माण केली आहे, ज्याचे नाव पूर्ण उच्चारताना अनेकांची जीभ अडखळते. इतकेच नव्हे, तर त्या स्थानकाचे नाव लक्षात ठेवणेही अनेकांसाठी सोपे नसते. त्यामुळे हे स्थानक सामान्य प्रवाशांपासून रेल्वेप्रेमींपर्यंत सर्वांच्याच उत्सुकतेचा विषय ठरते.

अनेक जण भारतातील सर्वांत मोठं स्थानक, सर्वांत लांब प्लॅटफॉर्म किंवा सर्वाधिक वर्दळीचे स्थानक कोणतं, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात; पण सर्वांत लांब नाव असलेल्या स्थानकाबद्दल फार कमी लोकांना माहिती असते.

आता जाणून घ्या या अनोख्या रेल्वेस्थानकाचं नाव…

भारतीय रेल्वेमधील २८ अक्षरांचे नाव असलेले रेल्वेस्थानक म्हणजे ‘वेंकटनरसिम्हाराजुवारिपेटा’ (Venkatanarasimharajuvaripeta) होय. हे स्थानक तमिळनाडूच्या सीमेजवळ असून, त्याचा VKZ हा स्टेशन कोड आहे. हे स्थानक दक्षिण रेल्वेच्या अरक्कोनम (Arakkonam) शाखा मार्गावर स्थित आहे. आपल्या विलक्षण लांब नावामुळे हे स्थानक देशातील सर्वांत अनोख्या रेल्वेस्थानकांपैकी एक मानले जाते आणि आजही अनेक प्रवाशांसाठी ते विशेष आकर्षणाचा विषय आहे.