Indian Railway Diamond Crossing: भारतीय रेल्वेला ‘देशाची जीवनवाहिनी’ असे म्हटले जाते. दररोज लाखो प्रवासी काम, शिक्षण, व्यवसाय किंवा पर्यटनासाठी रेल्वेने प्रवास करत असतात. देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले विशाल रेल्वे जाळे भारताच्या प्रगतीचे महत्त्वपूर्ण प्रतीक मानले जाते. मात्र, या रेल्वे व्यवस्थेबाबत अशी एक रंजक गोष्ट आहे, जी ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो.

कल्पना करा… एकाच ठिकाणी उत्तर, दक्षिण, पूर्व व पश्चिम या चारही दिशांकडून रेल्वेगाड्या येत आहेत. अशा वेळी अपघात होणार नाही का, असा प्रश्न कोणाच्याही मनात येईल; पण भारतात एक असे रेल्वेस्थानक आहे, जिथे चारही दिशांहून रेल्वेगाड्या एका ठिकाणी येतात, मार्ग ओलांडतात आणि तरीही कोणतीही टक्कर होऊन अपघात होत नाही. त्यामागील कारण जाणून घेतल्यावर भारतीय रेल्वेच्या तांत्रिक क्षमतेचे कौतुक केल्याशिवाय राहवत नाही.

डायमंड क्रॉसिंग म्हणजे नेमके काय?

रेल्वेच्या रुळांची अशी विशिष्ट रचना, ज्यामध्ये वेगवेगळ्या दिशांमधून येणारे मार्ग एकमेकांना छेद देतात आणि वरून पाहिल्यास ही संपूर्ण रचना एखाद्या हिऱ्याच्या आकारमानासारखी दिसते, त्यामुळे या रचनेला ‘डायमंड क्रॉसिंग’, असे म्हटले जाते. या रचनेमुळे रेल्वेगाड्या विविध दिशांनी एकाच ठिकाणी येऊन, पुढे जाऊ शकतात. ही केवळ रुळांची रचना नसून, रेल्वे अभियांत्रिकीतील अत्यंत अचूक नियोजनाचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते.

या ठिकाणी दिवसभर विविध मार्गांवरील रेल्वेगाड्यांची सतत वर्दळ असते. राजधानी एक्स्प्रेस, दुरांतो एक्स्प्रेस, गरीब रथ, सुपरफास्ट, मेल व एक्स्प्रेस अशा अनेक महत्त्वाच्या गाड्या या मार्गावरून धावत असतात. इतक्या मोठ्या प्रमाणात रेल्वे वाहतूक होत असतानाही येथे शिस्तबद्ध नियोजनामुळे कोणताही गोंधळ वा अपघात होत नाही.

मग अपघात का होत नाही?

चारही दिशांनी रेल्वेगाड्या येत असतील, तर मग दोन गाड्यांची टक्कर कशी टळते, हा प्रश्न अनेकांना पडतो. याचे उत्तर भारतीय रेल्वेच्या अत्याधुनिक इंटरलॉकिंग प्रणाली आणि स्वयंचलित सिग्नल यंत्रणेत दडलेले आहे.

या प्रणालीमुळे एका वेळी फक्त एकाच रेल्वेगाडीला क्रॉसिंग पार करण्याची परवानगी दिली जाते. संबंधित गाडी पूर्णपणे पुढे गेल्यानंतरच पुढील दिशेच्या रेल्वेगाडीला हिरवा सिग्नल मिळतो. त्यामुळे सर्व रेल्वेगाड्यांची हालचाल संगणकीकृत प्रणालीद्वारे नियंत्रित केली जाते. परिणामत: मानवी चुकांची शक्यता अत्यल्प राहते आणि अपघाताचा धोका जवळपास टळतो.

रेल्वे अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना

डायमंड क्रॉसिंग ही केवळ प्रवाशांसाठी आकर्षणाची गोष्ट नाही, तर रेल्वे अभियांत्रिकीतील अचूक नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षिततेचे सर्वोत्तम उदाहरण आहे. येथे प्रत्येक रेल्वेगाडीच्या हालचालीवर नियंत्रण कक्षातून सतत लक्ष ठेवले जाते. रेल्वे कर्मचारी, सिग्नल प्रणाली आणि तांत्रिक यंत्रणा यांच्यातील समन्वयामुळे हजारो रेल्वेगाड्या सुरक्षितपणे आपला प्रवास पूर्ण करतात.

रेल्वेप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी हे ठिकाण विशेष आकर्षणाचे केंद्र बनले आहे. वरून पाहिल्यास हिऱ्यासारखी दिसणारी रुळांची रचना अनेकांना प्रत्यक्षात पाहण्याची उत्सुकता असते. त्यामुळे देशभरातून अनेक जण या अद्वितीय रेल्वे पॉईंटला भेट देतात.

भारतातील एकमेव असे ठिकाण

भारतात चारही दिशांमधून येणाऱ्या प्रमुख रेल्वेमार्गांचा असा संगम दुसरीकडे कुठेही पाहायला मिळत नाही. म्हणूनच या ठिकाणाला भारतीय रेल्वेच्या सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाच्या रेल्वे पॉईंटपैकी एक मानले जाते.

अखेर हे ठिकाण आहे तरी कुठे?

इतका वेळ ज्याची चर्चा होत होती, ते ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील नागपूर रेल्वेस्थानक. देशाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथील रेल्वे रूळरचनेला भारतातील प्रसिद्ध ‘डायमंड क्रॉसिंग’चा मान मिळाला आहे, जिथे उत्तर, दक्षिण, पूर्व व पश्चिम या चारही दिशांमधील मार्ग एकमेकांना हिऱ्याच्या आकारात छेदतात. मुंबई-हावडा, दिल्ली-चेन्नई, काझीपेट-नागपूर व नागपूर-इटारसी हे चार प्रमुख रेल्वेमार्ग येथे एकमेकांना छेद देतात. त्यामुळे नागपूरला भारतीय रेल्वेच्या सर्वांत महत्त्वाच्या जंक्शनपैकी एक मानले जाते. आधुनिक तंत्रज्ञान, अचूक सिग्नल व्यवस्था आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे येथे दररोज शेकडो रेल्वेगाड्या सुरक्षितपणे मार्गक्रमण करतात. म्हणूनच नागपूर स्थानकाच्या रुळांची ही डायमंड क्रॉसिंग रचना भारतीय रेल्वेच्या अभियांत्रिकी कौशल्याचे एक अद्वितीय प्रतीक मानले जाते.