भारतात नारळाला खूप महत्व आहे. प्रत्येक शुभ कार्यात, पूजाविधीत नारळाचा वापर केला जातो. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी लोक नारळ फोडून श्री गणरायाची पूजा करतात. दक्षिण भारतात नारळाशिवाय अनेक पदार्थ पूर्णच होऊ शकत नाही. कारण नारळ हा त्यांच्या आहारातील एक महत्वाचा घटक आहे. अनेकजण स्वयंपाकासाठी नारळाच्या तेलाचा वापर करतात. याशिवाय नारळ पाणी, खोबरं, किशीपासून करवंटीपर्यंत प्रत्येक भागाचा वापर केला जातो, त्यामुळे भारतात नारळाच्या झाडाला ‘कल्पवृक्ष’ असे म्हटले जाते. पण, इतके महत्व असूनही नारळ हे भारताचे नाही तर दुसऱ्या देशाचे राष्ट्रीय फळ आहे. हा देश कोणता सविस्तर जाणून घेऊ…

नारळ साधारणपणे उष्णकटिबंधीय देशांच्या किनारी भागात आढळतात. भारतातही किनारपट्टीच्या राज्यांमध्ये नारळाचे सर्वाधिक उत्पादन केले जाते. केरळ, ओरिसा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये नारळाचे सर्वाधिक उत्पादन होते. याशिवाय, महाराष्ट्रातील कोकण, मुंबई, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू इत्यादी राज्यांच्या किनारी भागातही याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. पण, एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊनही नारळाला राष्ट्रीय फळ म्हणून घोषित करण्याचा विचार कधीच झाला नाही, याबाबत अनेकदा आश्चर्य व्यक्त केले जाते.

नारळ हे मुळात पाम ट्री (ताडीचे झाड) कुटुंबातील एक झाड आहे, ताडगुळ्याप्रमाणे नारळही बाहेरील बाजूस टणक असतो, यानंतर त्याच्या आत लाकडी कवच आणि कवचाच्या आत पांढरे पल्पी फळ असते. नारळाच्या झाडाला सहा ते दहा वर्षांत पहिले फळ येते, परंतु पीक उत्पादन १५ ते २० वर्षांनी सुरू होते. नारळाचे झाड ८० वर्षांपर्यंत फळ देऊ शकते.

भारतात नारळ हे पवित्र फळ म्हणून अधिक ओळखले जाते. त्याला श्रीफळ असेही म्हणतात. तो फोडण्यापासून ते पूजेत अर्पण करण्यापर्यंत हिंदू धर्मात अनेक नियम पाळले जातात. प्रत्येक पूजेपूर्वी नारळाचीही पूजा केली जाते आणि देवाला अर्पण केल्यानंतर त्याचे तुकडे करून प्रसाद म्हणून वाटले जाते. भारतात कोणत्याही सन्मान सोहळ्यातही शाल आणि श्रीफळ अर्थात नारळ देऊन सत्कार करण्याची प्रथा आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, भारतासारख्या देशात नारळाचा सर्वाधिक वापर होत असतानाही ते भारताचे राष्ट्रीय फळ नाही, तर आपल्या शेजारील देश मालदीवचे राष्ट्रीय फळ आहे. मालदीव हा हिंदी महासागरातील अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटांच्या दक्षिणेला सुमारे १२०० बेटांचा देश आहे, जो हिंद महासागराच्या आत पर्वत रांगेत वसलेले आहे; ज्याची शिखरे बेटांच्या रूपात आहेत. पावसाळा आणि येथील समुद्र किनारा नारळासाठी उत्तम मानले जाते.

मालदीवमध्ये नारळाला कुरुंबा असे म्हणतात. नारळाचे झाड हे त्यांचे राष्ट्रीय वृक्ष असून त्याला वैज्ञानिक भाषेत कोका न्यूसिफेरा असे म्हणतात. मालदीवच्या राष्ट्रीय चिन्हातही नारळाचे झाड आहे. नारळ हा मालदीवच्या जीवनाचा एक प्रमुख भाग आहे. येथील अनेक पदार्थांमध्ये नारळ हा प्रमुख घटक आहे.

मालदीवमधील लोक नारळ फक्त जेवणातच वापरत नाहीत, तर अनेक प्रकारे त्याचा वापर करतात. त्याच्या तंतूपासून दोरी बनवली जाते. या झाडाच्या लाकडाचा अनेक प्रकारे उपयोग केला जातो, कारण मालदीवसारख्या देशात इतर लाकूड आणि बांधकाम साहित्य मिळणे खूप कठीण आहे. नारळ पाणी हे इथले प्रमुख पेय म्हणून प्रसिद्ध आहे, जे उन्हाळ्यात थंडीची अनुभूती देते. इथे नारळ आणि त्याचे तेलदेखील अनेक आरोग्यदायी फायद्यासाठी वापरले जाते.

Story img Loader