scorecardresearch

रात्री झोपताना Earplugs वापरणे सुरक्षित असते का? तज्ज्ञ काय सांगतात, जाणून घ्या

Earplugs while Sleeping: शांत झोप लागावी यासाठी इअरप्लग्स वापरावेत की नाही हे तज्ज्ञांकडून समजून घेऊयात.

earplugs while sleeping

Earplugs while Sleeping: कामाचा वाढता व्याप, स्क्रीन टाइममध्ये झालेली वाढ यासह ताणतणाव, नैराश्य अशा असंख्य समस्यांचा सामना लोक करत आहेत. यामुळे त्यांच्या शरीरावर परिणाम होत आहे. अनेकांच्या निद्राचक्रावर त्याचा प्रत्यक्ष परिणाम होत आहे. लोकांना शांत झोप लागावी यासाठी विविध उपकरणांची मदत घ्यावी लागत आहे. काहीजण यासाठी विशिष्ट ट्रिक्स वापरत आहेत. व्यवस्थितपणे झोप घेता यावी म्हणून बरेचसे लोक इअरप्लग्स हे उपकरण वापरतात.

Earplugs म्हणजे काय?

रात्री आवाजामुळे झोपमोड होऊ नये यासाठी इअरप्लग्स वापरले जातात. या छोट्या उपकरणामुळे झोपेत कोणत्याही प्रकारचा आवाज रोखला जातो किंवा त्याची तीव्रता कमी होते. गेल्या काही वर्षांमध्ये या उपकरणाच्या वापरकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आवाजामुळे झोपेत व्यत्यय आल्यास त्याचा आरोग्यावर शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ शकते. त्यातून पुढे तणाव, थकवा याचे प्रमाण वाढू शकते. या समस्या उद्भवू नयेत यासाठी इअरप्लग्सचा वापर केला जातो. यामुळे कानात पाणी, धूळ, कचरा जात नाही आणि कानांचे संरक्षण देखील होते.

कानांमध्ये इअरप्लग्स लावल्याने –

 • Noise reduction म्हणजेच एखाद्या आवाजाची तीव्रता कमी करणे. कर्कश, कानाला सहन न होणाऱ्या अतितीव्रता असलेल्या आवाजापासून संरक्षण म्हणून इअरप्लग्स लावले जातात. कॉन्सर्ट्स, डीजे असलेल्या ठिकाणी याचा वापर करणे फायदेशीर ठरते. इअरप्लग्स कानामध्ये लावल्याने जास्त तीव्रता असलेला आवाज कानांपर्यंत पोहचण्यास अडथळा निर्माण होतो.
 • एखाद्या व्यक्तीच्या घोरण्यामुळे झोपमोड होऊ शकते. काही वेळेस बांधकामामुळे होणारा आवाज, शेजारच्या घरातील लहान मुलाचं रडणं यांमुळे रात्री जाग येऊ शकते. अशा वेळी खास झोपताना वापरायचे इअरप्लग्स कानांमध्ये लावू शकता.
 • इअरप्लग्स लावल्याने पाणी कानांमध्ये जाण्यास अडथळा होतो. परिणामी पोहतानाही या उपकरणाचा वापर केला जातो.

आणखी वाचा – फ्लाइटमध्ये मागच्या बाजूने प्रवेश करायला परवानगी का नसते? बॅक-टू-फ्रंट बोर्डिंग केल्याने विमानाचे संतुलन बिघडते का?

झोपताना इअरप्लग्स लावणे धोकादायक असते का?

प्रत्येक मानवाला किमान सात ते आठ तास झोप घेणे आवश्यक असते. सामान्य इअरप्लग्स रात्रभर घातल्याने कानांमध्ये मेण जमा होऊ शकतो. जर असे इअरप्लग्स साफ नसतील, तर इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. तसेच झोपताना इअरप्लग्स वापरण्याची वाईट सवय देखील लागू शकते. या सवयीमुळे व्यक्तीच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो. तर इअरप्लग्समुळे कान दुखावला जाऊ शकतो. तज्ञांच्या मते, काही ठराविक इअरप्लग्स वापरणे योग्य समजले जाते.

 • मेण (wax) – हे इअरप्लग्स काहीसे जाड असतात. त्यामुळे यांचा वापर करण्याआधी ते व्यवस्थितपणे पिळणे आवश्यक असते.
 • फोम (foam) – हे इअरप्लग्स Polyvinyl chloride किंवा Polyurethane या घटकांपासून तयार केले जातात. कानांमध्ये लावण्यापूर्वी ते पिळावे लागतात, जेणेकरुन पुढे ते कानांमध्ये फिट होतील.
 • सिलिकॉन (silicone) – हे इअरप्लग्स मऊ असल्याने ते कानांच्या आत जाऊन अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे सिलिकॉन इअरप्लग्स इअर कॅनलच्या बाहेरील भागांमध्ये ठेवले जातात.

तज्ञांच्या मते, मेण आणि फोम या प्रकारातील इअरप्लग्स झोपताना वापरणे योग्य समजले जाते. तसेच झोप घेताना सिलिकॉन इअरप्लग्स न वापरण्याचा सल्ला दिला जातो.

आणखी वाचा – International Women’s Day ‘८ मार्च’ रोजी साजरा करण्यामागे खरं कारण काय? जाणून घ्या सविस्तर..

रात्री इअरप्लग्स लावून झोपण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात:

 • इअरप्लग्स लावण्याआधी कान स्वच्छ करा. कान आतून ओले असल्यास इअरप्लग्स लावू नये.
 • मोठा आवाज ब्लॉक होईल असा अंदाज घेत इअरप्लग्स कानांमध्ये लावा. जास्त आत ढकलू नका. यामुळे कानाच्या पडद्याला दुखापत होऊ शकते.
 • फोम इअरप्लग्स वापरत असल्यास एका वापरानंतर ते फेकून द्या, प्रत्येकवेळी नवीन इअरप्लग्स वापरा.
 • कानांमध्ये जमा होणाऱ्या मेणांवर लक्ष ठेवा.
 • लहान मुलांनी इअरप्लग्सचा वापर टाळावा.
 • इअरप्लग्स कानांमध्ये लावताना आणि काढताना काळजी घ्या. ते हळूवारपणे काढायचा प्रयत्न करा. जोर लावल्यास इजा होऊ शकते.

वरील माहिती डॉ. रोहित बिष्णोई (वरिष्ठ सल्लागार, ईएनटी, श्री बालाजी ऍक्शन मेडिकल इन्स्टिट्यूट), डॉ. कार्तिक शमन्ना (सल्लागार, ईएनटी, फोर्टिस हॉस्पिटल, बन्नेरघट्टा रोड, बंगलोर) आणि डॉ. कुलदीप कुमार ग्रोव्हर (क्रिटिकल केअर आणि पल्मोनोलॉजीचे प्रमुख, सीके बिर्ला हॉस्पिटल, गुरुग्राम) या तज्ञांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमधून घेण्यात आली आहे.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-03-2023 at 14:45 IST
ताज्या बातम्या