LPG Gas in India: एक काळ असा होता की आपल्या घरात स्वयंपाक करण्यासाठी लोक लाकूड, कोळसा किंवा रॉकेल अशा पारंपरिक इंधनांवर अवलंबून होते. पण, भारतात एलपीजी गॅस (LPG) आल्यावर स्वयंपाकघरात मोठा बदल झाला. १९५०–६० च्या दशकात हा गॅस पहिल्यांदा भारतात आणला गेला. एलपीजी गॅसचा इतिहास जाणून घेणे सामान्य ज्ञानासाठी महत्त्वाचे आहे, कारण यासंबंधीचे प्रश्न अनेकदा स्पर्धा परीक्षा आणि मुलाखतींमध्ये विचारले जातात.

तसेच मध्यपूर्वेतील युद्धामुळे भारताच्या LPG पुरवठा साखळीवर प्रचंड ताण आला आहे. गॅस पुरवठा खंडित होण्याच्या भीतीने नागरिकांच्या गॅस एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेकांनी आपली हॉटेल्स बंद ठेवली आहेत तर घरगुती ग्राहकांना रिफिलसाठी अनेक दिवस वाट पाहावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर एलपीजी गॅसची सुरुवात नेमकी कशी झाली ते जाणून घेऊया…

LPG चे पूर्ण नाव काय आहे?

एलपीजीचे पूर्ण नाव लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (Liquefied Petroleum Gas) असे आहे. हा एक मिश्रित गॅस आहे, ज्यामध्ये मुख्यतः प्रोपेन आणि ब्यूटेन हे वायू असतात. भारतात हा गॅस स्वयंपाक करण्यासाठी म्हणून वापरला जातो.

देशात १९५५ मध्ये एलपीजी गॅसची सुरुवात झाली

भारत पेट्रोलियमच्या अधिकृत वेबसाइट bharatpetroleum.in नुसार, भारतात एलपीजी गॅसची सुरुवात १९५५ साली झाली. त्या वेळी ही सेवा बर्मा शेल (Burmah Shell) या नावाने ओळखली जात होती, जी नंतर भारत पेट्रोलियम कंपनीचा भाग झाली. या कंपनीने देशात पहिल्यांदा एलपीजी गॅस सुरू केला आणि तो ‘Burshane’ या ब्रँड नावाने बाजारात आणला होता.

सुरुवातीला गॅस सिलिंडर कसे भरले जात होते?

एलपीजीमुळे अन्न लवकर आणि सहज शिजू लागले, पण गॅस सिलिंडर भरण्याची पद्धत वेळोवेळी बदलत गेली.

सुरुवातीला गॅस सिलिंडर मॅन्युअल बॉटलिंग प्लांटमध्ये हाताने भरले जात होते.
नंतर मशीन आणि आधुनिक कॅरोसेल सिस्टमचा वापर सुरू झाला.
या सिस्टममुळे एका तासात हजारो सिलिंडर भरता येऊ लागले.
यामुळे गॅसचा पुरवठा अधिक जलद आणि व्यवस्थित झाला.

एलपीजी गॅस आज कोट्यवधी कुटुंबांची गरज

आज एलपीजी भारतातील सर्वात महत्त्वाच्या घरगुती इंधनांपैकी एक आहे. ती पर्यावरणासाठी स्वच्छ आणि सुरक्षित इंधन मानली जाते. आधुनिक तंत्रज्ञान, चांगली वितरण व्यवस्था आणि वाढती जागरूकता यामुळे एलपीजी गॅस आता देशातील कोट्यवधी कुटुंबांची रोजची गरज बनली आहे. यासोबतच व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रातही तिचा वापर वाढत आहे.