Manipurs Largest Women Market : प्रत्येक बाजारपेठेचे काहीतरी वेगळेपण असते. कोल्हापूरमधील बाजारपेठेबाबत सांगायचे झाल्यास तिथे तुम्हाला कोल्हापुरी चप्पल, सोलापूरला सोलापुरी चादर, नाशिकला द्राक्षे, अशा प्रत्येक बाजारपेठेत काही ना काही प्रसिद्ध गोष्टी असतात. पण, भारतात अशी एक बाजारपेठ आहे, त्यात सर्व गोष्टी मिळतात. पण, त्याचे वेगळेपण म्हणजे इथे पुरुष नाही तर महिलांकडे दुकानांची मालकी आहे. येथील पाच हजारांहून अधिक दुकानं ही केवळ महिला चालवतात, त्यामुळे ही बाजारपेठ आता भारतातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

५०० वर्षे जुनी बाजारपेठ अन् पाच हजार महिला दुकानदार

मणिपूरमधील इम्फाळ येथील ही बाजारपेठ आहे, इमा कीथेल असे या बाजारपेठेचे नाव असून ती आशियातील सर्वात मोठी महिला बाजारपेठ मानली जाते, ज्याला मदर्स मार्केट म्हणूनही ओळखले जाते. हा बाजार ५०० वर्षे जुना असून येथे पाच हजारांहून अधिक महिला आपली छोटी-मोठी दुकाने चालवतात.

मणिपूरमधील आंदोलनामुळे हा बाजार सध्या खूप चर्चेत आहे, इमा कीथेल बाजारपेठेत तुम्हाला महिला सक्षमीकरणाची एक झलक पाहायला मिळते. या अनोख्या बाजारपेठेची खास गोष्ट म्हणजे, येथील दुकानदार फक्त महिला आहेत. स्थानिकमैतेई भाषेत या बाजारपेठेला Ima Keithel असे म्हणतात, ज्याचा अर्थ ‘मदर्स मार्केट’ असा होतो. इथे फक्त महिलाच व्यवसाय करतात आणि पुरुष फक्त खरेदीसाठीच येतात. तसेच जे पुरुष येथे आहेत. ते हमाल किंवा सुरक्षा रक्षक आणि चहा विक्रीचे काम करतात. बाकी मार्केट फक्त महिलाच सांभाळतात.

इमा कीथेल ही ५०० वर्षांहून जुनी बाजारपेठ आहे, जी १६ व्या शतकात मूठभर महिलांनी काही स्टॉल्ससह सुरू केली. पण, आज तिथे तीन बहुमजली इमारतीत ही बाजारपेठ उभी आहे. ही इमारत आज इम्फाळमधील सर्व व्यावसायिक आणि सामाजिक-आर्थिक क्रियाकलापांचे केंद्र आहे, जिथून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे.

या बाजारपेठेत पारंपरिक मणिपुरी मिठाई, कपडे, गालीचे, टेराकोटा मातीची भांडी आणि सर्टिफाइड हँडीक्राफ्ट्स इत्यादी खरेदी करता येते. येथील अनेक दुकानदार तीन पिढ्यांपासून आपली दुकाने चालवत आहेत. येथे कोणतीही महिला विवाहित असेल आणि बाजारात आधीपासून उपस्थित असलेल्या सदस्याने नामांकित केली असेल, तरच ती दुकान चालवू शकते. अशा प्रकारे या महिला बाजाराचे स्वतःचे नियम आहेत, जे केवळ महिलाच ठरवतात.

पुरुष युद्धात उतरले अन् महिलांनी हाती घेतली बाजारपेठेची कमान

१६ व्या शतकात मणिपूरमध्ये कामगार व्यवस्था सक्रिय होती, ज्या अंतर्गत मैती समुदायातील सर्व पुरुष सदस्यांना (जे मणिपूरच्या लोकसंख्येच्या सुमारे ५०% लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करते) इतर देशांमध्ये काम करण्यासाठी किंवा युद्धे लढण्यास भाग पाडले गेले. त्यामुळे खेड्यापाड्यात काही स्त्रिया उरल्या होत्या, ज्यांच्यावर कुटुंबाची काळजी घेण्याची जबाबदारी होती. या महिलांनी त्यांचे घर चालवण्याची जबाबदारी घेतली. त्यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शेती केली; याशिवाय कपडे विणणे आणि हाताने तयार केलेली उत्पादने स्थानिक बाजारपेठेत विक्री करण्यास सुरुवात केली.

….त्यातूनच झाला इमा कीथेलचा जन्म

हळूहळू या जागेने एका मोठ्या बाजारपेठेचे रूप धारण केले, जेथे महिला घरगुती वस्तूंपासून हस्तकला आणि कपड्यांपर्यंत सर्व काही खरेदी आणि विक्री करत असत. या महिलांनी स्वतःचे बाजाराचे नियम स्वतः ठरवले आणि आजही हा बाजार स्त्रीसाठी काहीही अशक्य नाही याचा पुरावा म्हणून उभा आहे. दैनंदिन व्यापार आणि देवाणघेवाणीच्या पलीकडे, इमा कीथेलच्या महिलांनी मणिपूरमधील सामाजिक आणि राजकीय सक्रियतेतही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

हेही वाचा – रागात आला अन् थेट ओला शोरूम दिलं पेटवून, ग्राहकाबरोबर नेमकं घडलं काय? पाहा Video

महिला सक्षमीकरणाचे अनोखे प्रतीक

CNN च्या अहवालानुसार, १८९१ मध्ये महिलांच्या निषेधामुळे ब्रिटीश सरकारला त्यांचे काही नियम आणि सुधारणा मागे घेण्यास भाग पाडले. कारण हे नियम महिलांच्या बाजारपेठेपेक्षा बाह्य व्यवसायाला प्राधान्य देत होते. १९३९ मध्ये भारताच्या इतर भागांमध्ये स्थानिक तांदूळ निर्यात करण्याच्या ब्रिटीश धोरणामुळे संतप्त झालेल्या महिलांनी त्यास विरोध दर्शवला आणि विजय मिळवला.

२००३ मध्ये राज्य सरकारने बाजाराच्या जागेवर शॉपिंग मॉल बांधण्याची योजना जाहीर केली, तेव्हाही या महिलांनी अनेक आठवडे मोठा संप पुकारला, ज्यामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली आणि परिस्थिती बिकट झाली होती, आजही बाजाराच्या हिताच्या नसलेल्या कोणत्याही नियमन किंवा उपक्रमाविरुद्ध महिला नियमितपणे आंदोलन करतात आणि त्यांच्या निषेधाचा स्थानिक निवडणुकांवर गंभीर परिणाम होतो. आज ही बाजारपेठ स्त्री-पुरुष समानता आणि महिला सक्षमीकरणाचे अनोखे प्रतीक आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manipur women market ima keithel 500 year old run and managed by 5000 women vendors sjr
Show comments