four language railway station India भारतातील रेल्वेस्थानकं ही केवळ प्रवासाची ठिकाणं नसून अनेक आश्चर्यकारक गोष्टींची साक्ष देणारी केंद्रं आहेत. काही स्थानके त्यांच्या भव्यतेसाठी ओळखली जातात, काही ऐतिहासिक महत्त्वासाठी, तर काही त्यांच्या अद्वितीय वैशिष्ट्यांमुळे चर्चेत राहतात. पण, तुम्हाला माहिती आहे का, भारतात असं एक रेल्वेस्थानक आहे जिथे फक्त एक किंवा दोन नाही, तर तब्बल चार वेगवेगळ्या भाषांमध्ये घोषणा केली जाते? ही गोष्ट ऐकून अनेकांना आश्चर्य वाटतं, पण हे खरं आहे आणि यामागचं कारण तर अजूनही अधिक रोचक आहे…

एक स्थानक, दोन राज्यं – पण ओळख मात्र अनोखी!

हे अनोखं स्थानक म्हणजे नवापूर रेल्वेस्थानक. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांच्या सीमारेषेवर वसलेलं हे स्थानक भारतातील अत्यंत दुर्मीळ स्थानकांपैकी एक आहे. इथे एक विचित्र पण आकर्षक गोष्ट पाहायला मिळते. स्थानकाचा अर्धा भाग महाराष्ट्रात आणि अर्धा भाग गुजरातमध्ये आहे, म्हणजेच तुम्ही प्लॅटफॉर्मवर एका बाजूला उभे राहिलात तर तुम्ही महाराष्ट्रात आणि दुसऱ्या बाजूला गेलात तर थेट गुजरातमध्ये!

चार भाषांतील घोषणा – प्रवाशांसाठी खास सुविधा

नवापूर रेल्वेस्थानकाची सर्वात मोठी खासियत म्हणजे इथल्या घोषणा. इथे रेल्वेच्या येण्या-जाण्याच्या घोषणा खालील चार भाषांमध्ये केल्या जातात:

हिंदी
इंग्रजी
गुजराती
मराठी

ही सुविधा केवळ तांत्रिक व्यवस्था नाही, तर दोन्ही राज्यांतील प्रवाशांच्या सोयीसाठी तयार केलेली एक अनोखी प्रणाली आहे, त्यामुळे कोणत्याही प्रवाशाला गाडीची माहिती समजण्यात अडचण येत नाही.

अर्ध्या अर्ध्या बाकड्यांचं रहस्य!

या स्थानकावर आणखी एक चकित करणारी गोष्ट पाहायला मिळते. स्थानकावरील बाकं (benches) देखील दोन भागांमध्ये विभागलेली आहेत. एका बाजूला महाराष्ट्र आणि दुसऱ्या बाजूला गुजरात अशी ही अनोखी रचना प्रवाशांचं लक्ष वेधून घेते. हे पाहून अनेक प्रवासी थांबून फोटो काढतात आणि या अनोख्या व्यवस्थेचं कौतुक करतात.

स्थानकामध्येही राज्यांची विभागणी!

फक्त स्थानकच नाही, तर स्थानकाची रचनादेखील वेगळी आहे. तिकीट काउंटर महाराष्ट्रात आहे, तर स्थानक प्रबंधकाचे कार्यालय गुजरातमध्ये स्थित आहे. ही विभागणी १९६१ पासून तशीच कायम आहे आणि आजही ती भारतातील एक ऐतिहासिक आणि प्रशासकीय आश्चर्य मानली जाते.

१९६१ पासून आजपर्यंत कायम असलेली विशेष ओळख

नवापूर रेल्वेस्थानकाची स्थापना झाल्यापासूनच ते दोन राज्यांच्या सीमारेषेवर असल्याने त्याची रचना तशीच ठेवण्यात आली आहे. १९६१ मध्ये झालेल्या राज्य पुनर्रचनेनंतरही या स्थानकाची ओळख बदललेली नाही. आजही हे स्थानक दोन राज्यांच्या सहकार्याचं आणि भारताच्या विविधतेत एकतेचं प्रतीक मानलं जातं.

शेवटी सर्वात मोठं रहस्य काय आहे?

भारतातील असे रेल्वेस्थानक, जिथे एक-दोन नाही, तर चार भाषांमध्ये केली जाते उद्घोषणा (अनाउन्समेंट) ते म्हणजे नवापूर रेल्वेस्थानक.