Operation Sindoor: रेड क्रॉस हे चिन्ह आपल्या सर्वांच्याच परिचयाचं आहे. हॉस्पिटल्सच्या बाहेर हे चिन्ह असतं. परंतु, सध्या हे चिन्ह भारत- पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा चर्चेत आलं आहे.
रुग्णालयाच्या छप्परावर रेड क्रॉस रंगवण्याची खबरदारी का घेतली जात आहे?
भारतातील काही राज्यांतील रुग्णालयांनी भारत- पाकिस्तान दरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गच्चीवर -छप्परांवर मोठे रेडक्रॉसचे चिन्ह रंगवण्यास सुरुवात केली आहे. अलीकडच्या सीमापार लष्करी कारवायांनंतर हवाई हल्ला किंवा अन्य लष्करी कारवाई झाल्यास आरोग्यसेवा केंद्रांची स्पष्टपणे ओळख पटावी आणि त्यांना आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार संरक्षण मिळावे, यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे.
रेडक्रॉसच का?
रेडक्रॉस हे चिन्ह जिनिव्हा करारानुसार संरक्षित आहे. या आंतरराष्ट्रीय करारानुसार युद्धस्थितीत मानवतेच्या दृष्टिकोनातून काही ठिकाणांना संरक्षण दिले जाते. या नियमांनुसार, रुग्णालये आणि वैद्यकीय सुविधा पुरविणाऱ्या केंद्रांवर हल्ला करणे प्रतिबंधित आहे. त्यामुळेच रुग्णालयांच्या गच्चीवर आणि छप्परांवर मोठ्या प्रमाणात लाल क्रॉसचे चिन्ह रंगवले जात आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये सज्जता
जम्मू आणि काश्मीरमध्ये, कठुआ येथील असोसिएटेड हॉस्पिटल आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यांसारख्या सरकारी रुग्णालयांनी त्यांच्या छप्परांवर आधीच रेडक्रॉस चिन्ह रंगवले आहे. रुग्णालय प्रशासनाने आणखीही काही खबरदारीचे उपाय योजले असून, तातडीच्या पुरवठ्याचा साठा केला आहे. शिवाय रक्तदान शिबिरेही आयोजित केली आहेत, असे News9live ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
तेलंगणामध्येही अशीच खबरदारी घेण्यात येत असून हैदराबादसह राज्यभरातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांना १२ बाय १२ फूट पांढऱ्या पार्श्वभूमीवर मोठा लाल क्रॉस रंगवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून आकाशातूनही हे चिन्ह स्पष्ट दिसू शकेल. तेलंगणाचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. ए. नरेंद्र कुमार यांनी सांगितले की, या कामाची जबाबदारी तेलंगणा मेडिकल सर्व्हिसेस अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांनी घेतली आहे. Deccan Chronicle ने दिलेल्या वृत्तानुसार, आतापर्यंत राज्यातील २८७ पैकी १६४ रुग्णालयांवर रेडक्रॉस हे चिन्ह रंगवण्यात आले असून, उर्वरित रुग्णालयांचे काम लवकरच पूर्ण होईल.
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील गजराराजा मेडिकल कॉलेज (Gajra Raja Medical College) यांसारख्या संस्थांनीही रेड क्रॉस रंगवले आहे. ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना, या कॉलेजचे डीन डॉ. आर. के. एस. धाकड यांनी सांगितले की, भारत सरकारकडून मिळालेल्या राष्ट्रीय सुरक्षाविषयक सूचनांनुसार हे चिन्ह रंगवण्यात आले असून, यामुळे रुग्णालयांवर चुकूनही हल्ला होण्याची शक्यता कमी होते.