Paris Olympics 2024: क्रीडाविश्वातील सर्वांत मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा यंदा फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे होत आहेत. ऑलिम्पिक २०२४ (Olympic 2024) स्पर्धा २६ जुलैपासून सुरू झाली असून ती ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. २६ जुलैला ऑलिम्पिकचा उदघाटन सोहळा पॅरिसमधील सेन नदीवर पार पडला. ऑलिम्पिकच्या १२८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एखाद्या स्टेडियमऐवजी सीन नदीवर उदघाटन सोहळ्याचे आयोजन झाले. यंदाच्या ऑलिम्पकमध्ये २०६ देश सहभागी झाले असून १० हजारांच्या आसपास जगभरातील खेळाडू सहभागी झाले आहेत. भारताकडून यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये ११७ खेळाडू सहभागी झाले असून १६ विविध खेळांमध्ये हे खेळाडू पदकं जिंकण्याच्या आशेने उतरले आहेत. ऑलिम्पिक स्पर्धा हौशी या परंपरेत मोडतात. येथे कधीही रोख पारितोषिक दिले जात नाही. यावेळी ॲथलेटिक्स संघटनेने ‘ट्रॅक अँड फिल्ड’ प्रकारासाठी सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला रोख ५० हजार डॉलर देण्याचा निर्णय घेतला आहे. पण, ऑलिम्पिक स्पर्धा खऱ्या अर्थाने ओळखली जाते ती सुवर्ण, रौप्य आणि कास्य पदकांसाठी. ज्या देशाला सर्वाधिक सुवर्णपदकं मिळतात, तो देश पदकांच्या गुणतालिकेत सर्वात वरच्या स्थानावर असतो. हे वाचा >> ऑलिम्पिकमध्ये विजयी खेळाडू मेडल दातांनी का चावतात? जाणून घ्या खरं कारण १८९६ साली ग्रीसच्या अथेन्समध्ये ऑलिम्पिक खेळांची सुरुवात झाली. ग्रीकच्या प्राचीन इतिहासाची पुन्हा उजळणी करण्यासाठी या खेळांची सुरुवात झाली. पहिल्या ऑलिम्पिकमध्ये विजेत्या खेळाडूंना केवळ रौप्यपदक दिले जात होते. १९०४ साली सेंट लुईस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण, रौप्य आणि कास्य अशी तीन पदकं देण्याची परंपरा सुरू झाली. गेल्या काही वर्षांत पदक देताना यजमान देशाच्या प्रतीकांचा समावेश पदकात करण्यात येऊ लागला आहे. सुवर्णपदकात किती सोनं असतं? ऑलिम्पिक खेळात प्रत्येक खेळाडू सुवर्णपदक मिळविण्यासाठी जीवाचे रान करत असतो. तसे प्रत्येक पदक हे गौरवाचे मानले जाते, मात्र त्यातही सुवर्णपदक मिळविणाऱ्या खेळाडूचा अधिक बहुमान असतो. पण, सुवर्णपदक हे संपूर्ण सोन्याचे नसते. त्यात केवळ सहा ग्रॅम सोने असते. या पदकात चांदीचे प्रमाण ९२.५ टक्के इतके असते. चांदीच्या पदकाला वरून सहा ग्रॅम सोन्याचा मुलामा दिलेला असतो. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देण्यात येणारे सुवर्णपदक हे ५२९ ग्रॅमचे असल्याचे सांगितले जाते. ज्याची किंमत ९५० युरो इतकी आहे, जी भारतीय रुपयांमध्ये ८७,२९६ इतकी होते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे प्रवक्ते यांनी २०२१ साली न्यूजविकला दिलेल्या मुलाखतीमध्ये पदकाच्या निर्मितीबद्दल माहिती दिली होती. सुवर्ण आणि रौप्य ही दोन्ही पदके चांदीचीच असतात, फक्त सुवर्णपदकाला सहा ग्रॅम शुद्ध सोन्याचा मुलामा दिला जातो. हे ही वाचा >> Paris Olympics 2024 : ऑलिम्पिकमध्ये विजेत्यांना पदकासह लाकडी बॉक्स का दिला जातो? त्यामध्ये नेमकं असतं तरी काय? जाणून घ्या विशेष म्हणजे १९१२ च्या स्टॉकहोम स्पर्धेपर्यंत सुवर्णपदक हे संपूर्ण सोन्याचे दिले जात होते. मात्र, पहिल्या जागतिक महायुद्धानंतर स्पर्धा आयोजित करण्यासाठी पैशांची चणचण भासू लागली, त्यात सोन्याची उपलब्धता कमी झाल्यामुळे १९२० साली अँटवर्प येथे भरलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत चांदीमिश्रित सुवर्णपदक देण्याची परंपरा सुरू झाली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकणाऱ्यांसाठी मोठी घोषणा (photo -@sportwalkmedia) रौप्य आणि कास्यपदक कसे बनते? सुवर्णपदकात चांदीचे मिश्रण असले तरी चांदीचे पदक हे पूर्णपणे चांदीचे असते, तर कास्यपदक मात्र ९५ टक्के तांबे आणि ५ टक्के झिंक धातू यांचे मिश्रण करून तयार केले जाते. ऑलिम्पिक खेळांच्या इतिहासात ही पदके जरी धातूपासून तयार करण्यात आली असली तरी त्याची किंमत फक्त त्या धातूएवढी उरत नाही. ते पदक जिंकणाऱ्या खेळाडूनुसार त्याची किंमत ठरते. पदक जिंकण्यासाठी त्या त्या देशांच्या खेळाडूंनी घेतलेली मेहनत, अनेक संघर्षातून ही पदके मिळवली जातात; त्यामुळे त्याची किंमत लावता येत नाही. भारतासाठी कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी १९५२ साली हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले वैयक्तिक पदक जिंकून दिले होते. त्यांना कुस्तीसाठी कास्यपदक मिळाले होते, तर नेमबाज अभिनव बिंद्रा यांनी २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले वैयक्तिक सुवर्णपदक मिळवून दिले होते.