What Is Password Called in Marathi: आजचे युग हे पूर्णपणे डिजिटल झाले आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या आयुष्यात तंत्रज्ञानाचा वापर असतो. मोबाईल उघडायचा असो, संगणकावर काम करायचे असो, ई-मेल तपासायचा असो किंवा समाजमाध्यमांवरील खाते उघडायचे असो; प्रत्येक ठिकाणी सुरक्षिततेसाठी एका खास गोष्टीची आवश्यकता असते, ती म्हणजे ‘पासवर्ड.’
आपल्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करण्यासाठी वापरला जाणारा हा शब्द इतका सर्वसामान्य झाला आहे की त्याचा मराठी अर्थ काय आहे, याचा विचारही अनेकांच्या मनात येत नाही. उलट पासवर्ड तयार करताना आपण अक्षरे, अंक आणि विशेष चिन्हांचा वापर कसा करायचा याचाच विचार करत असतो. मात्र, ‘पासवर्ड’ला मराठीत नेमके काय म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही कदाचित आश्चर्य वाटेल.
डिजिटल युगात पासवर्ड इतका महत्त्वाचा का?
पूर्वी एखाद्या व्यक्तीची महत्त्वाची कागदपत्रे किंवा मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी कुलूप आणि किल्लीचा वापर केला जायचा. डिजिटल जगात मात्र परिस्थिती बदलली आहे. आता आपली अनेक महत्त्वाची माहिती कपाटात किंवा पेटीत नसून मोबाईल, संगणक आणि विविध संकेतस्थळांवरील खात्यांमध्ये साठवलेली असते.
बँक खात्याची माहिती, वैयक्तिक छायाचित्रे, ई-मेल, कार्यालयीन कागदपत्रे, समाजमाध्यमांवरील संभाषणे आणि इतर अनेक गोष्टींचे संरक्षण करण्यासाठी गुप्त संकेतशब्दाचा वापर केला जातो, त्यामुळे डिजिटल सुरक्षेच्या दृष्टीने पासवर्डला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
एखादा कमकुवत पासवर्ड वापरल्यास खाते अनधिकृत व्यक्तीच्या ताब्यात जाण्याचा धोका वाढू शकतो, त्यामुळे तज्ज्ञ नेहमीच वेगवेगळ्या खात्यांसाठी वेगवेगळे आणि अंदाज लावणे कठीण असलेले पासवर्ड वापरण्याचा सल्ला देतात.
पासवर्ड तयार करताना काय काळजी घ्यावी?
अनेक जण स्वतःचे नाव, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक किंवा अतिशय सोपा अंकसमूह पासवर्ड म्हणून वापरतात. मात्र, अशी माहिती इतरांना सहज कळू शकते, त्यामुळे शक्यतो वैयक्तिक माहितीवर आधारित संकेतशब्द टाळणे योग्य ठरते.
पासवर्डमध्ये मोठी आणि छोटी अक्षरे, अंक तसेच विशेष चिन्हे यांचा योग्य वापर केल्यास तो अधिक सुरक्षित होऊ शकतो. तसेच एकाच पासवर्डचा वापर अनेक खात्यांसाठी करणे टाळणेही महत्त्वाचे आहे.
पण, ‘पासवर्ड’ या शब्दाचा अर्थ काय?
इंग्रजी भाषेतील ‘पासवर्ड’ हा शब्द प्रामुख्याने एखाद्या प्रणालीत प्रवेश मिळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गुप्त शब्दासाठी किंवा संकेतासाठी वापरला जातो. डिजिटल व्यवहार वाढल्यामुळे हा शब्द दैनंदिन वापरातील भाषेचाच एक भाग बनला आहे.
मात्र, मराठीमध्ये त्यासाठी एक नेमका शब्द वापरला जातो. तो शब्द केवळ संगणक किंवा मोबाईलपुरता मर्यादित नाही. एखाद्या ठिकाणी प्रवेश मिळवण्यासाठी वापरला जाणारा गुप्त संकेत, अशी त्याची संकल्पना आहे.
आता तुम्हाला कदाचित उत्सुकता लागली असेल की तो शब्द नेमका कोणता?
‘पासवर्ड’ला मराठीत ‘सांकेतिक शब्द’ असे म्हणतात.
म्हणजेच, एखाद्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी किंवा विशिष्ट प्रणालीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी वापरला जाणारा गुप्त शब्द किंवा संकेत यासाठी ‘सांकेतिक शब्द’ हा मराठी पर्याय वापरता येतो.
आज आपण मोबाईल, संगणक, बँकिंग आणि विविध डिजिटल सेवांमध्ये ‘पासवर्ड’ हा शब्द सहज वापरतो. मात्र, त्याच अर्थासाठी असलेला ‘सांकेतिक शब्द’ हा मराठी पर्याय अनेकांना माहीत नसतो, त्यामुळे पुढच्या वेळी कोणी तुम्हाला ‘पासवर्ड’ला मराठीत काय म्हणतात, असा प्रश्न विचारला तर उत्तर देताना तुम्ही नक्कीच सांगू शकता-सांकेतिक शब्द!
