International Father’s Day 2023: आज १८ जून. जून महिन्याचा तिसरा रविवार हा 'इंटरनॅशनल फादर्स डे' म्हणून साजरा करण्यात येतो. 'पितृत्व' म्हणजेच 'फादरहूड'चा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. वडील, बाबा अशा पितृवाचक शब्दांसह फादर, पीटर, डॅड-डॅडी, पप्पा-पापा असे अनेक शब्द वडिलांसाठी वापरले जातात. अगदी गणपतीला ही आपण बाप्पा म्हणतो. बाप्पा हा शब्दही पितृवाचक आहे. अशा पितृवाचक शब्दांची व्युत्पत्ती कशी झाली हे जाणून घेणे रंजक ठरेल. 'फादर' शब्दाची व्युत्पत्ती संस्कृत ही अनेक भाषांची जननी आहे. मॅक्सम्यूलर यांनी भाषाकूळ ही संकल्पना मांडली. अनेक भाषांमध्ये साम्ये आढळतात. त्यांच्या शब्दरचना, त्यातील शब्द यांमध्ये साम्य असते. अशावेळी भारतीय भाषा, संस्कृत भाषा या इंडोयुरोपियन भाषाकुळातून आलेल्या आहेत. त्यामुळे या भाषांमध्ये काहीप्रमाणात साधर्म्य आढळते. 'फादर' या शब्दाची व्युत्पत्ती शोधताना आपल्याला संस्कृत आणि लॅटिन या दोन्ही भाषांचा आधार घ्यावा लागतो. संस्कृतमध्ये वडिलांना 'पितृ' हा शब्द वापरतात. 'पितृ' आणि 'पीटर' या शब्दांमध्ये बहुतांशी साम्य दिसते. कारण, या दोन्ही भाषा एकाच भाषाकुळातील आहे. लॅटिनमधील 'पीटर' शब्दापासून 'फादर' हा शब्द निर्माण झाला आहे. मराठीमधील पिता हा शब्द संस्कृत आहे. पितृ या ऋकारांत पुल्लिंगी नामाचे प्रथमा एकवचन 'पिता' असे होते. 'वडील' शब्दाची व्युत्पत्ती वडील हा शब्द केवळ बाबा किंवा जन्मदाता या अर्थी येत नाही. वडील हा शब्द 'वड्र' या संस्कृत शब्दापासून निर्माण झाला आहे. 'वड्र' म्हणजे मोठे, उत्तम, श्रेष्ठ. वड्र वरून वडील हा शब्द निर्माण झाला आणि वडील शब्दावरून 'वडीलधारी मंडळी' हा शब्दप्रयोग आपण करू लागलो. वडीलधारी मंडळी म्हणजे श्रेष्ठ किंवा ज्येष्ठ मंडळी होय. बाबा हाही शब्द मराठीमध्ये वडिलांसाठी वापरला जातो. परंतु, हा शब्द लहान मुलांच्या उच्चारणावरून निर्माण झाला असल्याची शक्यता आहे. जसे लहान मूल बोलण्याच्या प्राथमिक अवस्थेत बा-बा-बा-आ-आ-आ-का-का-का असे आकारान्त शब्द उच्चारते. ते त्याला उच्चारणे सोप्पे असते. त्यामुळे 'आई' हा शब्द लहान बाळ प्रथम उच्चारत नाही. आबा, बाबा अशा सुलभ शब्दावरून 'बाबा' शब्द आला असावा अशी शक्यता आहे. हेही वाचा : ‘मान्सून’ शब्द आला कुठून ? ‘मान्सून’चे प्रकार माहीत आहेत का ? पापा-पोप-पप्पा शब्दांच्या व्युत्पत्ती इंग्रजी भाषेच्या विकासाचे तीन काळ आहेत. ओल्ड इंग्रजी, मिड इंग्रजी आणि मॉडर्न इंग्रजी. 'पापा' हा शब्द ओल्ड इंग्रजी भाषेत आढळतो. पापा शब्दही स्वर आणि उच्चारण सुलभता यातून निर्माण झाला आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या मते, 'पोप' शब्द ओल्ड इंग्रजीमधील पापा शब्दावरून आला आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मगुरूंना 'पोप' म्हणतात. ते वडिलांसमान, श्रेष्ठ असतात. 'पोप' या शब्दाचा अर्थ ख्रिश्चन धर्मामध्ये 'स्पिरिच्युअल फादर' असा घेतला गेला. 'पप्पा' हे पापा या शब्दाचे पुढील स्थिती आहे. वडील यांच्यासाठी अनौपचारिकरित्या पप्पा असा शब्द वापरला जातो. 'पा' हे त्याचे संक्षिप्त रूप आहे. हेही वाचा : हिंदू मंदिरांमध्ये कासव का असते? 'बाप्पा' शब्दाची व्युत्पत्ती बाप्पा हा शब्द गणपती या देवतेसाठी विशेषत्वाने वापरला जातो. बाप्पा हा शब्द मूळ उडिया भाषेतला असून त्याचा अर्थ 'वडील' असा आहे. श्रीगणेश देवतेला बाप्पा म्हणण्यामागे त्याचे श्रेष्ठत्व, ज्येष्ठत्व मान्य केले जाते. 'बाप्पा' या शब्दाचा रुढार्थ 'देव' असाही घेतला जातो. डॅड-डॅडी शब्दाची व्युत्पत्ती 'डॅडी' शब्दाचा मूळ शब्द डॅड असा आहे. डॅडा हा उच्चारण साधर्म्य असणारा शब्द आहे. लहान मुलांच्या उच्चारणातून निर्माण झालेले हे शब्द आहे. डॅड, डॅडा, डॅडी, डॅडू असे अनौपचारिक शब्द वडिलांसाठी वापरले जातात. परंतु, 'डॅड' हा मूळ शब्द आहे. बाकीचे त्या शब्दाची सामान्यरूपे आहेत. आपण वडिलांना प्रेमाने अनेक शब्द वापरतो. परंतु, या शब्दांचे अर्थही जाणून घेणे महत्त्वाचे आहे.