Pune Gundacha Ganpati Temple : सध्या देशभरात गणेशोत्सव हा सण मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. बाप्पाच्या आगमनानं सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. गणेश म्हणजे गणांचा ईश किंवा प्रभू. तर गणपती म्हणजे गणांचा अधिपती आणि विनायक म्हणजे विशिष्ट रूपानं जो नायक आहे, त्याला विनायक, असं म्हटलं जातं. जसं गणपती बाप्पाला या विशेष नावांनी ओळखलं जातं, तसंच पुण्यातल्या (Pune) काही देवतांना वेगवगेळ्या नावांनी ओळखलं जातं. ही वेगवेगळी नावं ऐकून, पाहून मनात अनेक प्रश्नसुद्धा निर्माण होतात. अशाच एका गणपती बाप्पाच्या मंदिराबद्दल आणि त्या मंदिराच्या नावामागचा इतिहास नेमका काय आहे ते आपण या लेखातून जाणून घेणार आहोत…

पुणे( Pune) शहरातील ५९६, कसबा पेठेत श्री सिद्धिविनायक गुंडाचा गणपती या नावाचं एक मंदिर आहे. तसेच या परिसरात गुंड आडनावाची बरीच घरं होती म्हणून या बाप्पाला गुंडाचा गणपती असं नाव पडलं. गणपतीच्या मूर्तीवरील कवच ३ एप्रिल १९७५ साली निघालं आणि आतमध्ये अतिप्राचीन व सुंदर अशी मूर्ती मिळाली; मात्र ती मूर्ती भग्नावस्थेत होती. काही तज्ज्ञांच्या मते, ही मूर्ती १२ व्या किंवा १३ व्या शतकातील असावी. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना शक्य नसल्यामुळे १९७६ मध्ये नवीन मूर्ती बनवण्यात आली आणि तिची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी करण्यात आली. गोपाळराव व्यवहारे जोशी यांनी पुढाकार घेऊन मंदिराला मोठं स्वरूप दिलं. १८९२ मध्ये सरदार फुलंबरीकर यांच्या आजोबांनी देणगी देऊन मंदिराचा दगडी गाभारा बनवून घेतला. १८५२ ते १९१० पर्यंत देवस्थानाची वहिवाट चित्राव घराण्याकडे होती. त्यानंतर ती वारसा हक्काने चंद्रशेखर मधुकर बाभळे, भालचंद्र यशवंत बाभळे, दीपक प्रभाकर बाभळे यांच्याकडे देण्यात आली.

‘गुंडांचा गणपती’च्या मूर्तीचे वर्णन :

पुण्यातील ( Pune) ‘गुंडाचा गणपती’ची मूर्ती चार ते पाच फूट उंचीची असून, ती संपूर्णतया पाषाणाची आहे. या शेंदरी रंगाच्या गणपतीची सोंड उजव्या बाजूला असून, ती चतुर्भुज मूर्ती आहे. या मूर्तीच्या डाव्या हातात मोदक, तर उजवा खालील हात अभयहस्त, वरच्या दोन्ही हातांमध्ये पाशांकुश आहे. तसेच नागयज्ञो पवित आणि अंगभूत पीतांबरही आहे. ही मूर्ती पाषाणाच्या बैठकीवर विराजमान असून, या मूर्तीचे डोळे अत्यंत प्रभावी आहेत. हत्तीच्या शिरभागातील गंडस्थळ, मोठे कान, प्रशस्तपणा या बाबी मूर्तीमध्ये उठून दिसतात.

हेही वाचा…महाराष्ट्रात विधानसभेच्या किती जागा आहेत? जिल्ह्यानुसार सर्व जागांची यादी एका क्लिकवर वाचा…

व्हिडीओ नक्की बघा…

वास्तुविशारद किरण कलमदानी यांनी लोकसत्ताला दिलेल्या माहितीनुसार, कसबा पेठेतील श्री सिद्धिविनायक गुंडाचा गणपती या पेशवेकालीन मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले होते. या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मंदिराच्या मूळ रचनेला कोठेही धक्का न लावता जीर्णोद्धार करण्यात आला. प्रसिद्ध वास्तुविशारद अंजली व किरण कलमदानी यांच्या ‘किमया’ या संस्थेच्या माध्यमातून या मंदिराच्या लाकडी छत, कळस, सभामंडप आदींची डागडुजी करण्यात आली.

पेशवेकालीन कागदपत्रांमध्ये या गणपतीचा उल्लेखसुद्धा आहे. लोकमान्य टिळकांचे गुरू अण्णासाहेब पटवर्धन यांचा जन्म या गणपतीच्या आशीर्वादाने झाला, असे सांगितले जाते. या मंदिरात अनेक वेळा प्रवचने होत असतात. माघातला गणेशोत्सव आणि सगळ्या विधिवत पूजा-अर्चना येथे नियमित पार पडतात. ही उजव्या सोंडेची श्रींची मूर्ती असून, हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं. तर, तुम्ही पुण्यातील (Pune)हे प्रसिद्ध गणपती मंदिर पाहिलं आहे का ते आम्हाला कमेंट सेक्शनमधून नक्की सांगा…