१ जुलैला का साजरा केला जातो Doctors’ Day?; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

डॉ. बिधानचंद्र रॉय यांचे योगदान ओळखले जावे या उद्देशाने भारत सरकारने १९९१ मध्ये डॉक्टर दिन स्थापित केला. डॉक्टर दिन हा केवळ भारतातच नव्हे तर वेगवेगळ्या देशांमध्येही साजरा केला जातो.

National Doctors Day
दरवर्षी १ जुलैला राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. हा दिवस सर्व डॉक्टरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.
राष्ट्रीय सेवेसाठी अथक परिश्रम घेत असलेल्या डॉक्टरांच्या अमूल्य योगदानाची ओळख पटविण्यासाठी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. जगातील विविध देशांकडून डॉक्टरांचा दिवस वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. भारतातील महान डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त भारतात दरवर्षी १ जुलैला राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. ज्यांनी आपल्या गरजेच्या वेळी निःस्वार्थपणे आपल्याला मदत केली आणि रूग्णाच्या आरोग्यासाठी अथक परिश्रम केले, अशा सर्व डॉक्टरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

राष्ट्रीय डॉक्टर दिनाचा इतिहास आणि महत्त्व

डॉ. बिधानचंद्र रॉय यांचे योगदान ओळखले जावे या उद्देशाने भारत सरकारने १९९१ मध्ये डॉक्टर दिन साजरा करण्यासंदर्भातील निर्णय घेतला.. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या स्थापनेत डॉ. बिधानचंद्र रॉय यांनी  महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. या देशाच्या प्रगतीमध्ये डॉक्टरांच्या भूमिकेला अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

कसा होता डॉ.रॉय यांचा प्रवास?

डॉ. रॉय यांचा जन्म १८८२ मध्ये ब्रिटिश राजवटीच्या कालावधील भारताच्या पटणा बंगाल प्रेसीडेंसी येथे झाला. गणितातील पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी कलकत्ता विद्यापीठात औषधांसंदर्भातील शिक्षण घेतले. पुढील औषधांसंदर्भातील उच्च शिक्षणाच्या महत्वाकांक्षेने ते परदेशात गेले. लंडनमधील प्रतिष्ठित सेंट बार्थोलोमेझ हॉस्पिटलमध्ये त्यांना अभ्यास करायचा होता. परंतु ते आशियाई खंडातील असल्यामुळे त्यांना प्रवेश नाकारला गेला. तरीसुद्धा त्यांनी हार न मानता  सतत ३० दिवस प्रयत्न केल्यामुळे त्यांना प्रवेश देण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या मन की बात या कार्यक्रमात डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्या आठवणींना उजाळा दिला डॉक्टर्स दिनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांविषयी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ” १ जुलै रोजी आपण राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करू. ज्या डॉक्टरांनी कोविड -१९ ने उद्भवलेल्या आव्हानापुढे भारताला हार मानू दिली नाही, त्या डॉक्टरांबद्दल आफण कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे.”

भारताबाहेरचा डॉक्टर दिन

डॉक्टर दिन हा केवळ भारतातच नव्हे तर वेगवेगळ्या देशांमध्येही साजरा केला जातो. अमेरिकेत हा दिवस ३० मार्च रोजी, क्यूबामध्ये ३ डिसेंबर रोजी तर इराणमध्ये २३ ऑगस्ट रोजी डॉक्टर दिन साजरा केला जातो. अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यात मार्च १९३३ मध्ये प्रथमच डॉक्टर दिन साजरा करण्यात आला होता. हा दिवस डॉक्टरांना कार्ड पाठवून आणि निधन झालेल्या डॉक्टरांच्या कबरीवर फुले ठेवून साजरा करण्यात आला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Reason why india celebrates national doctors day remembering dr bidhan chandra roy ttg