10 Countries Offering Visa-Free Entry to Indians : पासपोर्ट हे आपल्या नागरिकत्वाचे एक प्रकारे ओळखपत्र (identity) असते; तर व्हिसा हा एका विशिष्ट देशात प्रवेश करण्याची परवानगी देणारा परवाना असतो. व्हिसाचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही लोक पर्यटनासाठी व्हिसा घेतात; तर काही लोक नोकरीसाठी. काही लोक शिक्षणासाठी व्हिसा घेतात; तर काही लोक वैद्यकीय उपचारांसाठी. पण तुम्हाला माहितीये का, जगात असे काही देश आहेत, की जिथे जाण्यासाठी तुम्हाला व्हिसाची आवश्यकता नसते. तुम्ही पासपोर्टच्या मदतीने तिथे जाऊ शकता आणि काही ठरावीक दिवस राहू शकता किंवा फिरू शकता. ते देश कोणते आहेत, जाणून घेऊ…

थायलंड

थायलंड हा एक अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक देश आहे, जो पर्यटनासाठी लोकप्रिय आहे. या देशातील सुंदर समुद्रकिनारे, प्राचीन मंदिरे व निसर्गरम्य ठिकाणे बघण्यास लोक गर्दी करतात. समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभलेल्या या देशात भारतीय ६० दिवस व्हिसाशिवाय राहू शकतात.

मॉरिशस

मॉरिशस (Mauritius) हे एक सुंदर बेट असून, हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्याने वेढलेले आहे. निळेशार पाणी, आलिशान रिसॉर्ट्समुळे हा बेटात्मक देश एखाद्या स्वप्ननगरीसारखा वाटतो. दरवर्षी भारतातून हजारो पर्यटक येथे भेट देतात.

मालदीव

मालदीव हा एक सुंदर बेटांचा देश आहे, जो पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या बेटांवर पर्यटकांना आकर्षित करणारे अनेक सुंदर समुद्रकिनारे आहेत. भारतीय पर्यटक ९० दिवस येथे व्हिसाशिवाय राहू शकतात.

भूतान

भूतान हा एक छोटासा देश असून, निसर्गरम्य वातावरण, प्राचीन व ऐतिहासिक संस्कृतीसाठी तो ओळखला जातो. या देशात भारतीयांना कोणत्याही व्हिसाची आवश्यकता नाही.

नेपाळ

नेपाळ हा हिमालयाच्या कुशीत वसलेला एक सुंदर आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असा देश आहे, जो पर्यटनासाठी अत्यंत लोकप्रिय आहे. येथील निसर्गरम्य स्थळे व धार्मिक स्थळे पाहायला लोक गर्दी करतात. भारतीय येथे व्हिसाशिवाय राहू शकतात.

फिजी

फिजी हे एक सुंदर बेट आहे. येथील निसर्गरम्य दृश्ये पाहण्यासाठी पर्यटक खूप गर्दी करतात. भारतीय येथे १२० दिवस व्हिसाशिवाय राहू शकतात.

कझाकस्तान

जगातील सहा तुर्की वांशिक देशांपैकी कझाकस्तान हा एक आहे. येथे भारतीय १४ दिवस व्हिसाशिवाय राहू शकतात.

सर्बिया

सर्बिया हा दक्षिण युरोपातील एक देश आहे. येथील ऐतिहासिक स्थळे आणि रोमांचक ‘नाईट लाईफ’साठी हा देश विशेष प्रसिद्ध आहे. भारतीय येथे ३० दिवस व्हिसाशिवाय राहू शकतात.

अंगोला

अंगोला हा दक्षिण आफ्रिकेतील एक देश आहे. येथील भाषा, जीवनशैली, संस्कृती अशा अनेक गोष्टींमुळे हा देश इतर देशांपासून वेगळा ठरतो. भारतीय या देशात वर्षातून ९० दिवस आणि प्रत्येक भेटीच्या वेळी ३० दिवस व्हिसा नसतानाही राहू शकतात

मकाऊ

मकाऊ देश हा कॅसिनोंचे शहर म्हणून ओळखला जातो. भारतीय ३० दिवसांपर्यंत व्हिसाशिवाय या देशात राहू शकतात.