आपल्या देशात आयुर्वेदाला खूप महत्त्व आहे. लहान-मोठ्या अनेक आजारांवर पूर्वीच्या काळी आयुर्वेदिक औषधांच्या माध्यमातूनच उपचार केले जात होते, मात्र वाढती वृक्षतोड आणि बदलत्या वातावरणामुळे जंगले मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहेत. यात अनेक औषधी वनस्पतीदेखील नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या संगोपनासाठी आता महाराष्ट्रातील पुण्यात एक अनोखे जंगल उभारण्यात आले आहे. या जंगलात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या अनेक औषधी वनस्पती वाढवल्या जात आहेत. त्यामुळे तुम्हाला आता पुण्यात औषधी वनस्पतींनी भरलेले जंगल पाहता येणार आहे. पुण्यातील प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्थेच्या आतील एका लहान जंगलात पहिल्या प्रायोगिक प्रकल्पाचा भाग म्हणून अगस्त्य, अग्निमंथ, अर्जुन, अशोक, जपा आणि कडुलिंब अशा प्रकारच्या औषधी वनस्पतींच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे, यासाठी अवघा तीन वर्षांचा कालावधी ठरवण्यात आला होता. कोथरुडमध्ये असलेल्या या संस्थेच्या १९.५ एकर परिसरात जपानी पद्धतीचा वापर करून हे आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे जंगल फुलवण्यात आले आहे. हे जंगल जरी लहान असले तरी त्यातील वनस्पतींचे फायदे अनेक आहेत, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आज जंगलातील अनेक औषधी वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. तर काही वनस्पती दिसेनाशाच झाल्या आहेत. त्यामुळे भविष्यात औषधी वनस्पती मिळणे कठीण होईल, पण आता या जंगलामुळे दाट लोकवस्तीच्या प्रदेशातही हवा शुद्ध करण्यासह मातीचे अस्तित्व टिकवणे आणि जैवविविधतेचे रक्षण करता येत आहे. ३,००० चौरस फूट जमिनीवर पसरलेल्या या मिनी-फॉरेस्टमध्ये तब्बल १२५० वनस्पती उगवल्या आहेत. यात ३०-५० देशी औषधी वनस्पतींच्या प्रजाती लावल्या आणि अवघ्या तीन वर्षांत त्या चांगल्या प्रकारे वाढल्या आहेत, असे संस्थेचे प्रभारी, संशोधन अधिकारी डॉ. अरुण गुरव यांनी सांगितले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आयुष मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेने पुणे, झाशी, रानीखेत आणि बेंगळुरू येथील प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्थांच्या उद्यानांमध्ये सुरू केलेला पुण्यातील हा पहिलाच उपक्रम आहे. संस्थेने पुण्यात मियावाकी पद्धतीचा वापर करून औषधी वनस्पतींचे मिनी-फॉरेस्ट तयार करण्याच्या प्रायोगिक चाचण्यांना २०१८-१९ च्या सुमारास मान्यता देण्यात आली. औषधी वनस्पतींचे जंगल नियंत्रित परिस्थितीत विकसित करणे आणि त्याची मियावाकी पद्धतीचा वापर न करता वनस्पतींची लागवड केलेल्या प्लॉटशी तुलना करणे हा यामागील उद्देश होता. या प्रकल्पाचे निकाल प्रकाशनासाठी परिषदेकडे सादर करण्यात आले आहेत, अशी माहिती डॉ. गुरव यांनी दिली आहे. जपानी वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. अकिरा मियावाकी यांनी विकसित केलेल्या पद्धतीनुसार, विविध मूळ प्रजाती एकमेकांच्या अगदी जवळ लावल्या जातात, जेणेकरून त्यांना फक्त वरून सूर्यप्रकाश मिळेल, ज्यामुळे त्या बाजूला न जाता वरच्या दिशेने वाढू शकतील. परिणामी यामुळे वृक्ष अंदाजे ३० पट घनतेचा होतो आणि १० पट वेगाने वाढतो. तसेच तीन वर्षांनी त्याची एवढी देखभाल करण्याची गरज भासत नाही. ६० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पुण्यातील या संस्थेने सुरुवातीला सर्वेक्षण केले आणि त्यानंतर औषधी वनस्पती गोळा करून त्यांची लागवड केली. संस्थेच्या नेहरू गार्डनमध्ये आता यापैकी ४०० हून अधिक रोपे आहेत, ज्यांत झाडे, झुडपे आणि औषधी वनस्पती आहेत. यात बौहिनिया वाहली विलार हे औषधी वृक्ष चांगल्या प्रकारे बहरत आहे, हे वृक्ष जंगलतोड आणि मातीची धूप रोखण्यातही मदत करू शकतात, असेही डॉ. गुरव म्हणाले. शैक्षणिक हेतूसाठी या मिनी-फॉरेस्टमध्ये नागरिकांना प्रवेश दिला जातो. त्यामुळे ज्यांना हिंडायचे किंवा फिरायचे आहे त्यांच्यासाठी हे मिनी-फॉरेस्ट खुले नाही. अनेक शैक्षणिक संस्थांचे सामूहिक दौरे या ठिकाणी आयोजित केले जातात. शैक्षणिक सहली आयोजित करू इच्छिणाऱ्या शाळांकडून संस्थेबाबत आता माहिती घेतली जाते. आयुर्वेद, वनस्पतिशास्त्र आणि जीवन विज्ञान या विषयांचे पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी हर्बेरियम पाहण्यासाठी आणि या वनस्पती कशा वाढवल्या जातात याबद्दल सखोल माहिती घेण्यासाठी संस्थेला भेट देत आहेत, अशी माहितीही डॉ. गुरव यांनी दिली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नॅशनल अॅक्रिडेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीजने हर्बेरियम आणि फार्माकोग्नोसी प्रयोगशाळेसाठी नुकतेच दिलेले प्रमाणपत्र खूप मोठे आहे. हर्बेरियममध्ये महाराष्ट्र आणि गुजरातमधील विविध ठिकाणांहून गोळा केलेल्या औषधी वनस्पतींचे १६,००० नमुने आहेत. जे अनेक संदर्भ-हेतूंसाठी वाढवले जात आहेत. हे केंद्र आता वनस्पतींवर आधारित फॉर्म्युलेशनचे मानकीकरण आणि प्रमाणीकरण करण्यास उत्सुक आहे, जे अनेक आजारांच्या श्रेणीसाठी वापरले गेले आहेत. सामान्य सर्दीवरील उपचारांपासून ते स्मरणशक्ती सुधारण्यापर्यंतच्या उपचारांसाठी संस्थेतील ४५० हून अधिक औषधे ओळखली गेली आहेत आणि विविध पॅरामीटर्ससाठी प्रमाणित केली गेली आहेत, असेही गुरव म्हणाले. आयुर्वेद आणि इतर पारंपरिक औषध पद्धतींमधील संशोधनाला चालना मिळत असल्याने आता प्राण्यांवर प्रयोग करण्याच्या अभ्यासाचेही नियोजन केले जात आहे. आयुष औषधांची प्री-क्लिनिकल चाचणी घेण्यासाठी फार्माकोलॉजी विभागात एक अॅनिमल हाऊस विकसित केले जात आहे. ते जुलै २०२३ पर्यंत तयार होईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.