Why Washing Machine Has Lines Inside: आपण रोजच्या आयुष्यात अनेक वस्तू पाहतो, वापरतो आणि त्यांच्याशिवाय आपला दिवस पूर्णही होत नाही. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या वस्तूंच्या काही छोट्या छोट्या गोष्टींचा खरा उपयोग आपल्याला माहीतच नसतो. अनेक वेळा आपण एखादी गोष्ट फक्त डिझाईन आहे. असे समजून दुर्लक्ष करतो. पण नंतर अचानक कोणीतरी त्यामागचं खरं कारण सांगितलं की, आपणच थक्क होतो. “अरे, हे मला आधी कसं माहीत नव्हतं?”
अशीच एक रंजक माहिती सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने वॉशिंग मशीनबाबत अशी माहिती दिली आहे, जी ऐकून अनेक जण आश्चर्यचकित झाले आहेत. वॉशिंग मशीनमध्ये दिसणाऱ्या त्या छोट्या रेषा नेमक्या कशासाठी असतात, यामागचं कारण बहुतेकांना माहीतच नसतं.
वॉशिंग मशीनमध्ये दिसणाऱ्या या रेषांचा खरा उपयोग काय?
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन दाखवतो. त्यानंतर तो मशीनच्या आतमध्ये मधोमध दिसणाऱ्या रेषांकडे लक्ष वेधतो आणि लोकांना विचारतो “या रेषा का असतात, हे तुम्हाला माहीत आहे का?”
त्यानंतर तो स्वतःच त्या प्रश्नाचं उत्तर देतो. त्याच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा कपडे खूपच मळकट होतात. विशेषतः शर्टची कॉलर, हातांची कफ किंवा इतर काही भागांवर जास्त मळ साचतो. असे कपडे थेट मशीनमध्ये टाकल्यावर कधी कधी तो मळ पूर्णपणे निघत नाही.
अशा वेळी वॉशिंग मशीनमध्ये असलेल्या या रेषा उपयोगी पडतात. कपड्यांवरील जास्त मळ असलेला भाग या रेषांवर हलक्या हाताने घासला, तर मळ सैल होतो. त्यामुळे कपडे नंतर मशीनमध्ये धुतल्यावर अधिक स्वच्छ होण्यास मदत होते. म्हणजेच या रेषा फक्त सजावटीसाठी नसून त्यांचा प्रत्यक्ष उपयोग कपडे स्वच्छ करण्यासाठी केला जातो.
व्हिडीओ पाहून लोकही झाले आश्चर्यचकित
हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर jaiswalelectronics_ या अकाउंटवरून तो शेअर करण्यात आला आहे. बातमी लिहेपर्यंत या व्हिडीओला २६ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले असून, अनेकांनी त्यावर प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत.
येथे पाहा व्हिडीओ
काही लोकांनी कमेंट करताना सांगितले की, ते अनेक वर्षांपासून वॉशिंग मशीन वापरत आहोत; पण आजपर्यंत या रेषांचा खरा उपयोग त्यांना माहीतच नव्हता. एका युजरने लिहिले, “उद्यापासून मीही हा उपाय करून पाहणार, आजपर्यंत कधीच माहिती नव्हती.” तर दुसऱ्या युजरने लिहिले, “मी आठ वर्षांपासून मशीन वापरतो; पण आजच ही गोष्ट कळली.” आणखी एका महिलेने कमेंटमध्ये म्हटले, “११ वर्षांपासून हीच मशीन वापरते; पण आजच या रेषांचा खरा उपयोग समजला.”
(डिस्क्लेमर : या बातमीत दिलेली माहिती सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ आणि दाव्यांवर आधारित आहे. या माहितीची स्वतंत्रपणे सत्यता पडताळलेली नाही. त्यामुळे वाचकांनी ही माहिती केवळ सामान्य माहिती म्हणूनच वापरावी.)
