What is Air quality index: एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजेच AQI हा एक दैनंदिन आधारावर हवेच्या गुणवत्तेचा अहवाल सादर करणारा निर्देशांक आहे. AQI द्वारे कमी वेळेत वायुप्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो याचे मोजमाप केले जाते. खरं तर, AQI लोकांना स्थानिक हवेच्या गुणवत्तेचा त्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो हे जाणून घेण्यास मदत करते. पर्यावरण संरक्षण एजन्सी (EPA) पाच प्रमुख वायुप्रदूषकांसाठी AQI ची गणना केली जाते. या गणनेत सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रीय वायू गुणवत्ता प्रमाण स्थापित करण्यात आले आहे.
१. भूस्तरीय ओझोन
२. कण प्रदूषण / कण पदार्थ (पीएम २.५/पीएम १०)
३. कार्बन मोनोऑक्साइड
४. सल्फर डाय-ऑक्साइड
५. नायट्रोजन डाय-ऑक्साइड
AQI जितका जास्त तितकी वायुप्रदूषणाची पातळी जास्त असते आणि आरोग्यासंबंधित समस्याही तितक्याच अधिक असतात. तीन दशकांपासून अनेक विकसित देशांमध्ये AQI ची संकल्पना मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहे. वास्तविक वेळेत AQI हवेच्या गुणवत्तेची माहिती वेगाने प्रसारित करते.
AQI ची गणना कशी केली जाते?
हवेच्या गुणवत्तेचा अहवाल देण्यासाठी वेगवेगळे देश वेगवेगळे पॉईंट स्केल वापरतात. उदाहरणार्थ सांगायचे झाल्यास, युनायटेड स्टेट्सकडून ५०० पॉईंट स्केल वापरले जाते. त्यामध्ये ० आणि ५० मधील रेटिंग चांगले; तर ३०१ ते ५०० श्रेणीतील रेटिंग धोकादायक मानले जाते. भारतदेखील ५०० पॉईंट स्केलचे अनुसरण करतो.
रेकॉर्ड लक्षात घेऊन प्रत्येक दिवशी प्रमुख प्रदूषकांची मोजमापे घेऊन त्यांचे एकाग्रतेने निरीक्षण केले जाते. हे मोजमाप प्रत्येक प्रदूषका (जमीन पातळी, ओझोन, कण प्रदूषण, कार्बन मोनोऑक्साइड व सल्फर डाय-ऑक्साइड)साठी वेगवेगळ्या AQI मूल्यामध्ये EPA ने विकसित केलेल्या प्रमाण सूत्रांचा वापर करून, रूपांतरित केले जातात. त्यापैकी सर्वोच्च AQI मूल्ये त्या दिवसासाठीची AQI मूल्ये म्हणून नोंदवली जातात.
हेही वाचा: भारतातील सर्वाधिक महागड्या पाच शाळा कोणत्या? वर्षाला घेतात लाखो रुपये
वायू गुणवत्ता निर्देशांक श्रेणी
उत्तम (०-५०)- किमान प्रभाव
समाधानकारक (५१-१००)- सदोष हवेच्या अधिक संवेदनशील लोकांना श्वास घेण्यास किरकोळ त्रास होऊ शकतो.
मध्यम प्रदूषित (१०१-२००)- दम्यासारख्या फुप्फुसाचा आजार असलेल्या लोकांना आणि हृदयविकार असलेल्या लोकांना, तसेच लहान मुलं आणि वृद्धांना त्रास होऊ शकतो.
दूषित (२०१-३००)- अशा हवेच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो आणि हृदयविकार असलेल्या लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ शकते.
अत्यंत खराब (३०१–४००)- अशा हवेच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास श्वसनाचे आजार होऊ शकतात. फुप्फुस आणि हृदयरोग असलेल्या लोकांमध्ये त्याचा प्रभाव अधिक स्पष्ट होऊ शकतो.
गंभीर (४०१-५००)- निरोगी लोकांमध्ये श्वसनाच्या समस्या आणि फुप्फुस/हृदयविकार असलेल्या लोकांमध्ये गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. हलक्या शारीरिक हालचालींमध्येही अडचणी येऊ शकतात.
AQI महत्त्वाचा का?
वायुप्रदूषणाच्या दैनंदिन स्तरांबद्दल जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. विशेषत: ज्यांना वायुप्रदूषणाच्या संपर्कात येण्यामुळे आजार निर्माण होण्याचा धोका उद्भवू शकतो.
एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) चे उद्देश
वेगवेगळ्या ठिकाणी / शहरांमधील हवेच्या गुणवत्तेची तुलना करणे.
हा निर्देशांक सदोष प्रमाण आणि अपुरे निरीक्षण कार्यक्रम ओळखण्यासही मदत करतो.
AQI हवेच्या गुणवत्तेतील बदलाचे विश्लेषण करण्यास मदत करतो.
AQI लोकांना पर्यावरणीय परिस्थितीबद्दल माहिती देतो. हा विशेषत: वाढलेल्या किंवा वायुप्रदूषणामुळे झालेल्या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी उपयुक्त आहे.
वायुप्रदूषणाचा सर्वाधिक धोका कोणाला?
फुप्फुसाचे आजार असलेले लोक, जसे की दमा, क्रॉनिक ब्राँकायटिस व एम्फिसीमा.
किशोरवयीन मुलांसह सर्व वयोगटांतील सक्रिय लोक जे व्यायाम करतात किंवा मोठ्या प्रमाणावर घराबाहेर काम करतात.