Bombay Blood Group: रक्तदान हे सर्वांत श्रेष्ठ दान मानले जाते. रक्तदान केल्याने अनेक लोकांना जीवदान मिळते. तुमच्या रक्ताचा एक थेंब इतका मौल्यवान असू शकतो याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. तुम्हाला ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ हा रक्तगट माहीत आहे? आपल्यापैकी बहुतेकांना कदाचित या रक्तगटाविषयी माहीतच नसेल. या रक्तगटाच्या लोकांची संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे या रक्तगटाच्या कुणा व्यक्तीला रक्ताची गरज भासली, तर ते मिळविणे कठीण असते. चला तर आज आपण या रक्तगटाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईत लागला या रक्तगटचा शोध

ए, बी, एबी, ओ पॉझिटिव्ह व निगेटिव्ह हे रक्तगट आपल्या सर्वांना माहीत आहेतच; पण ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ अनेकांसाठी नवीन आहे. अनेकांना या रक्तगटाबद्दल काहीच माहीत नाही. खरंतर बॉम्बे रक्तगट हा सामान्य चाचणीने ओळखता येत नाही. हा रक्तगट दुर्मीळ असल्याने तो अधिक काळ सुरक्षित ठेवावा लागतो. या गटाचे रक्त अत्यंत कमी तापमानात ठेवावे लागते. सर्वप्रथम १९५२ साली डॉ. वाय. एम. भेंडे यांनी मुंबईत या रक्तगटाचा शोध लावला होता. याचा शोध मुंबईला लागल्यामुळे ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ हे नावही रुढ झाले. या रक्तगटाचे सर्वाधिक लोक मुंबईत असल्याचे म्हटले जाते. ‘बॉम्बे’ रक्तगटामध्ये निगेटिव्ह व पॉझिटिव्ह असे प्रकार असतात. हा रक्तगट जगातील केवळ ०.०००४ टक्के लोकांमध्ये आढळतो. भारतातील १०,००० लोकांपैकी फक्त एका व्यक्तीचा बॉम्बे रक्तगट आहे. त्याला एचएच रक्तगट किंवा दुर्मीळ एबीओ रक्तगट, असेही म्हणतात.

(हे ही वाचा : पुण्यातील गरिबांचे आशास्थान असलेल्या ससून रुग्णालयाला ‘ससून’ हे नाव कसे मिळाले? जाणून घ्या या नावामागची रंजक कथा…)

कोणत्याही माणसाच्या रक्तात असलेल्या लाल रक्तपेशींमध्ये साखरेचे रेणू असतात. हे साखरेचे रेणू ठरवतात की, एखाद्या व्यक्तीचा रक्तगट कोणता असेल; परंतु बॉम्बे रक्तगट असलेले लोक साखरेचे रेणू तयार करू शकत नाहीत. म्हणून ते कोणत्याही रक्तगटात येत नाहीत. या रक्तगटाच्या लोकांच्या प्लाझ्मामध्ये ए, बी व एच अँटीबॉडीज असतात.

या रक्तगटाचे लोक बॉम्बे रक्तगट असलेल्या इतर लोकांकडूनच रक्त घेऊ शकतात. बॉम्बे रक्तगट अत्यंत दुर्मीळ असल्याने या गटाचा रक्तदाता शोधणे अत्यंत कठीण आहे. इतर कोणत्याही गटाचे रक्त दिल्यास बॉम्बे रक्तगटाच्या रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो. लोकांना त्यांचा रक्तगट माहीत असणे आवश्यक आहे. विशेषत: ज्यांचा रक्तगट बॉम्बे आहे, त्यांच्या दृष्टीने ही बाब अधिक महत्त्वाची ठरते. कारण- आणीबाणीच्या किंवा शस्त्रक्रियेच्या प्रसंगी उपचारांसाठी त्याचा खूप परिणाम होऊ शकतो.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is bombay blood group only 1 in 10000 indians have this know all about it pdb
Show comments