What Is Bus Called in Marathi: दररोज सकाळी कामावर जाण्यासाठी, शाळा-कॉलेज गाठण्यासाठी किंवा गावाहून शहरात येण्यासाठी लाखो लोक बसने प्रवास करतात. बसस्थानकांवरची गर्दी, तिकिटासाठी लागलेल्या रांगा आणि खिडकीजवळ जागा मिळविण्यासाठी होणारी धावपळ हे चित्र जवळपास प्रत्येकानं अनुभवलेलं असतं. इतकंच काय, दिवसातून अनेक वेळा आपण “बस आली”, “बस पकड”, “बसने जाऊ” असे शब्द सहज बोलून जातो. पण तुम्ही कधी विचार केलाय का, ज्या ‘बस’ शब्दाचा आपण रोज इतका वापर करतो, त्या शब्दाला मराठीत नेमकं काय म्हणतात?

हा प्रश्न अचानक कोणी विचारला, तर अनेकांची अवस्था गोंधळल्यासारखी होते. कारण- आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेक इंग्रजी शब्द इतके बेमालूमपणे मिसळून गेले आहेत की, त्यांचे मराठी पर्यायी शब्द आपल्याला आठवतही नाहीत. अनेक वेळा तर त्या विशिष्ट वस्तूला वेगळा मराठी प्रतिशब्द आहे हेच लोक विसरून जातात.

आजच्या काळात मोबाईल, टेबल, पेन, मिक्सर, किचन, चार्जर, बॅग असे कित्येक इंग्रजी शब्द आपण मराठी शब्द म्हणून सर्रास वापरतो. घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या बोलण्यात हे शब्द अगदी सहजपणे येतात. त्यामुळे अचानक जर कोणी विचारलं, “पेनला मराठीत काय म्हणतात?” किंवा “टेबलसाठी मराठी शब्द कोणता?” तर अनेक जण विचारात पडतात.

अगदी तसंच काहीसं बस या शब्दाबाबतही आहे.

बस हा शब्द इतका सर्वसामान्य झाला आहे की, तो इंग्रजी आहे हेही काही क्षणांसाठी विसरायला होतं. ग्रामीण भाग असो किंवा शहर, प्रत्येक जण ‘बस’ असंच म्हणतो. एसटी बस, सिटी बस, स्कूल बस किंवा ट्रॅव्हल्स… प्रत्येक ठिकाणी हा शब्द कायम ऐकायला मिळतो.

विशेष म्हणजे अनेकांना वाटतं की, बस या शब्दाला मराठीत दुसरा पर्यायी शब्दच नसावा. पण, प्रत्यक्षात या शब्दासाठी सुंदर आणि शुद्ध मराठी शब्द वापरला जातो, हे फार कमी लोकांना माहीत आहे.

सोशल मीडियावर सध्या याच विषयाची मोठी चर्चा सुरू आहे. “बसला मराठीत काय म्हणतात” हा प्रश्न विचारल्यानंतर अनेकांनी वेगवेगळी उत्तरं दिली. काहींनी “वाहन” म्हटलं, तर काहींनी “प्रवासी गाडी” अशी उत्तरं दिली; पण त्यातील बहुतांश जणांची उत्तरं चुकीची ठरली.

भाषातज्ज्ञांच्या मते, मराठी भाषेत अनेक इंग्रजी शब्दांना स्वतंत्र आणि अर्थपूर्ण पर्याय आहेत. मात्र, इंग्रजीचा वाढता वापर आणि बदलती जीवनशैली यांमुळे हे शब्द हळूहळू विस्मरणात जात आहेत. त्यामुळे आजची पिढी शुद्ध मराठी शब्दांपासून दूर जात असल्याची खंतही काही जण व्यक्त करीत आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर हा प्रश्न व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी आपल्या मित्र आणि नातेवाइकांना हा प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. “तुम्हाला माहीत आहे का बससाठी मराठी प्रतिशब्द” असा प्रश्न विचारून अनेक जण एकमेकांची गंमत करताना दिसत आहेत.

आता तुम्हालाही उत्सुकता लागली असेल ना, की अखेर बसला मराठीत काय म्हणतात?

मिळालेल्या माहितीनुसार, बस या शब्दाला मराठीत ‘जनिका’, असं म्हटलं जातं.

हा शब्द ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो. कारण- रोज हजारो वेळा वापरला जाणारा शब्द मराठीत इतका वेगळा असेल, याची कल्पनाही अनेकांना नसते.

तुम्हाला अशाच आणखी काही इंग्रजी शब्दांचे भन्नाट मराठी अर्थ माहिती असतील, तर ते नक्की सांगा. कारण- आपली मराठी भाषा जितकी समृद्ध आहे, तितकेच तिच्या शब्दभांडारातील शब्दही रंजक आणि खास आहेत.