What is Clear Air Turbulence: थायलंडमधील फुकेतहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला मंगळवारी प्रवासादरम्यान अचानक जोरदार धक्के बसल्याची घटना घडली. या धक्क्यांमुळे विमान काही क्षणांत सुमारे ३०० फूट खाली आले. या दुर्घटनेत सुमारे १५ प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने वैमानिकांनी प्रसंगावधान राखत विमान सुरक्षितपणे दिल्ली विमानतळावर उतरवले.

या दुर्घटनेनंतर अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे. आकाश पूर्णपणे स्वच्छ असताना, पाऊस किंवा वादळ नसताना विमानाला इतके जोरदार धक्के कसे बसले? त्यामागे टर्ब्युलन्स (हवेतील अस्थिरता) हा प्रकार कारणीभूत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टर्ब्युलन्स म्हणजे नेमके काय?

टर्ब्युलन्स म्हणजे वातावरणातील हवेच्या प्रवाहात अचानक निर्माण होणारी अस्थिरता. या अस्थिरतेमुळे विमानाला अचानक वर-खाली किंवा एका बाजूने दुसऱ्या बाजूला धक्के बसतात. बहुतांश वेळा हा अनुभव काही सेकंद किंवा काही मिनिटांचा असतो. मात्र, काही वेळा त्याची तीव्रता जास्त असल्यास विमानाला अचानक उंची गमवावी लागू शकते.

सामान्यपणे टर्ब्युलन्सचा संबंध मेघगर्जना, पाऊस किंवा वादळी ढगांशी जोडला जातो; परंतु काही वेळा आकाशात एकही ढग नसतानाही हा प्रकार घडू शकतो. अशा स्थितीला क्लीअर एअर टर्ब्युलन्स म्हणजेच स्वच्छ आकाशातील टर्ब्युलन्स, असे म्हणतात.

स्वच्छ आकाशात टर्ब्युलन्स कसा निर्माण होतो?

विमाने साधारणपणे ३० हजार ते ४० हजार फूट उंचीवर उड्डाण करतात. या उंचीवर वातावरणातील हवेचे प्रवाह अतिशय वेगाने वाहत असतात. काही ठिकाणी वेगवेगळ्या दिशांनी वाहणाऱ्या हवेच्या प्रवाहांचा वेग अचानक बदलतो किंवा ते एकमेकांना छेद देतात. त्यामुळे वातावरणात अदृश्य अस्थिरता निर्माण होते. विमान या भागातून जाताच त्याला अचानक धक्के बसतात. काही वेळा विमान काही क्षणांसाठी खाली येते, तर काही वेळा वर उचलले जाते. हा संपूर्ण प्रकार इतक्या वेगाने घडतो की, प्रवाशांना काही समजण्याआधीच धक्के बसलेले असतात.

वैमानिकांना आधी इशारा का मिळत नाही?

स्वच्छ आकाशातील टर्ब्युलन्स हा विमान वाहतुकीतील सर्वांत अवघड प्रकारांपैकी एक मानला जातो. कारण- हा प्रकार डोळ्यांना दिसत नाही. आकाशात ढग नसतात आणि त्यामुळे त्याचा कोणताही दृश्य इशारा मिळत नाही.

विमानातील हवामान निरीक्षण प्रणालीही अनेकदा हा प्रकार ओळखू शकत नाही. त्यामुळे वैमानिकांना प्रवाशांना पूर्वसूचना देण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही. अशा वेळी कमरेचा सुरक्षितता पट्टा न बांधलेले प्रवासी किंवा उभे असलेले कर्मचारी हवेत उचलले जाऊन जखमी होऊ शकतात.

टर्ब्युलन्समुळे विमानाला धोका असतो का?

बहुतेक वेळा टर्ब्युलन्समुळे विमानाच्या रचनेला कोणताही गंभीर धोका निर्माण होत नाही. आधुनिक विमाने अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी अत्यंत मजबूत पद्धतीने तयार केलेली असतात. त्यामुळे विमान सुरक्षित राहते.

मात्र, सर्वाधिक धोका विमानातील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना असतो. अचानक धक्के बसल्याने डोके आपटणे, हात-पायांना मार लागणे, हाडे तुटणे किंवा गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते.

हवामान बदलामुळे वाढतोय टर्ब्युलन्स?

हवामानाचा अभ्यास करणाऱ्या अनेक तज्ज्ञांच्या मते, पृथ्वीचे वाढते तापमान वातावरणातील हवेच्या प्रवाहात बदल घडवत आहे. त्यामुळे काही भागांत टर्ब्युलन्सच्या घटना पूर्वीपेक्षा अधिक वारंवार आणि अधिक तीव्र स्वरूपात अनुभवास येत आहेत.

विशेषतः आंतरराष्ट्रीय हवाई मार्गांवर स्वच्छ आकाशातील टर्ब्युलन्सचे प्रमाण वाढत असल्याची नोंद विविध संशोधनांमध्ये करण्यात आली आहे.

प्रवाशांनी कोणती काळजी घ्यावी?

विमानप्रवासादरम्यान आपल्या जागेवर बसलेले असताना कमरेचा सुरक्षितता पट्टा नेहमी बांधून ठेवावा, असा सल्ला विमान कंपन्या देतात. सुरक्षितता पट्टा लावण्याचा दिवा बंद असला तरी शक्यतो पट्टा काढू नये. तसेच विमान कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

फुकेत-ते-दिल्ली विमानातील ही घटना पुन्हा एकदा दाखवून देते की, आकाश शांत दिसत असले तरी वातावरणातील अदृश्य बदल काही क्षणांत विमानाला हादरवू शकतात. त्यामुळे टर्ब्युलन्स हा प्रकार दुर्मीळ असला, तरी त्याबाबत जागरूक राहणे आणि सुरक्षा नियमांचे पालन करणे प्रत्येक प्रवाशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.