What is the Marathi Name for Cricket: भारतामध्ये क्रिकेट हा फक्त खेळ नाही, तर अनेकांसाठी तो भावना, उत्साह आणि अभिमानाचा विषय आहे. सध्या IPL मुळे देशभर क्रिकेटचा माहोल रंगला आहे. कुठे चौकार-षटकारांची चर्चा, कुठे विराट कोहलीच्या फलंदाजीची हवा, तर कुठे धोनीच्या एका एन्ट्रीवर स्टेडियम दणाणून जात आहे. सोशल मीडियावरही क्रिकेटचे व्हिडीओ, मीम्स आणि रील्सचा पाऊस पडत आहे. पण, या सगळ्या गोंधळात अचानक एक वेगळाच प्रश्न लोकांना विचार करायला भाग पाडतो, ‘क्रिकेट’ला मराठीत नेमकं काय म्हणतात?

हा प्रश्न ऐकून अनेक जण काही सेकंद थांबतात. कारण क्रिकेट हा शब्द इतका रोजच्या वापरात आला आहे की त्याला मराठी शब्द असेल याचाही अनेकांना विचार आलेला नसतो. शाळेपासून मैदानापर्यंत आणि टीव्हीपासून मोबाईलपर्यंत सर्वत्र ‘क्रिकेट’ हाच शब्द ऐकायला मिळतो. पण, खरंच या खेळासाठी मराठीत एखादा शुद्ध शब्द आहे का?

विशेष म्हणजे, सोशल मीडियावर सध्या अशा शब्दांबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. “सिग्नलला मराठीत काय म्हणतात?”, “चॉकलेटचा मराठी शब्द काय?”, “बसला मराठीत काय म्हणतात?” अशा प्रश्नांनंतर आता क्रिकेटप्रेमींचं लक्ष या प्रश्नाकडे वळलं आहे. IPL च्या ट्रेंडिंग वातावरणात हा विषय आणखी चर्चेत आला आहे.

क्रिकेट हा खेळ भारतात इतका लोकप्रिय झाला आहे की अनेकांच्या दिवसाची सुरुवातही क्रिकेटच्या बातम्यांनी होते. काही जण तर सामना सुरू असताना फोन उचलत नाहीत. एका विकेटवर घरात शांतता पसरते आणि एका षटकारावर संपूर्ण परिसरात जल्लोष सुरू होतो. पण, ज्या खेळावर भारत एवढं प्रेम करतो, त्या खेळाचं मराठी नाव अनेकांना माहिती नसणं हे थोडं आश्चर्यकारकच मानलं जात आहे.

दरम्यान, काही लोक सोशल मीडियावर मजेशीर अंदाज लावत आहेत. कुणी “चेंडूफटका” म्हणतंय, कुणी “दांडूचेंडू” म्हणतंय, तर कुणी “फलंदाजीचा खेळ” असंही म्हणताना दिसत आहे. काही जणांनी तर “क्रिकेटला मराठीत शब्दच नाही” असंही ठामपणे सांगायला सुरुवात केली आहे; त्यामुळे या प्रश्नाभोवतीच एक वेगळी उत्सुकता तयार झाली आहे.

भाषातज्ज्ञांच्या मते, अनेक परदेशी खेळांचे शब्द भारतीय भाषांमध्ये मूळ स्वरूपातच लोकप्रिय झाले, त्यामुळे त्या शब्दांचे स्थानिक पर्याय फारसे वापरात आले नाहीत. क्रिकेटचंही काहीसं तसंच झालं. इंग्रजांच्या काळात भारतात आलेला हा खेळ इतका लोकप्रिय झाला की ‘क्रिकेट’ हा शब्दच सर्वांच्या जिभेवर बसला.

पण, तरीही मराठी भाषेमध्ये क्रिकेटसाठी एक शब्द सांगितला जातो आणि तो ऐकून अनेक जण थोडे आश्चर्यचकित होतात.

‘क्रिकेट’ला मराठीत ‘चेंडूफळी’ असं म्हणतात. चेंडू म्हणजे बॉल आणि फळी म्हणजे बॅट. ‘चेंडूफळी’ हा शब्द आजही अनेकांना माहिती नाही, त्यामुळे सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे. IPL च्या ट्रेंडिंग वातावरणात आता हा शब्द पुन्हा चर्चेत आला आहे.