Can E20 Petrol Be Stored Like Conventional Petrol: देशात सध्या ई-२० पेट्रोलची जोरदार चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारने इथेनॉलमिश्रित इंधनाच्या वापराला चालना दिल्यानंतर अनेक वाहनचालकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे. ई-२० पेट्रोल हे सामान्य पेट्रोलप्रमाणे दीर्घकाळ साठवून ठेवता येते का? याचे उत्तर जाणून घेणे प्रत्येक वाहनमालकासाठी महत्त्वाचे आहे. कारण- चुकीच्या पद्धतीने साठवलेले इंधन वाहनाच्या इंजिनासाठी गंभीर अडचणी निर्माण करू शकते.

ई-२० पेट्रोल म्हणजे ८० टक्के पेट्रोल आणि २० टक्के इथेनॉल यांचे मिश्रण. पर्यावरणपूरक इंधन म्हणून त्याकडे पाहिले जात असले तरी त्याच्या साठवणुकीबाबत सामान्य पेट्रोलपेक्षा अधिक काळजी घ्यावी लागते. अनेकांना ही बाब माहीत नसल्याने भविष्यात इंजिनाशी संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ई-२० पेट्रोलची साठवण क्षमता इतकी कमी का असते?

सामान्य पेट्रोल योग्य परिस्थितीत तीन ते सहा महिने सुरक्षित राहू शकते. मात्र, ई-२० पेट्रोलची साठवण क्षमता साधारणतः केवळ ३० ते ९० दिवसांची मानली जाते. त्यानंतर त्याच्या गुणवत्तेत हळूहळू घट होऊ लागते.

त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे इथेनॉलचा स्वभाव. इथेनॉल हवेत असलेला ओलावा सहजपणे शोषून घेते. त्यामुळे कालांतराने इंधनामध्ये पाण्याचे प्रमाण वाढू लागते. याच प्रक्रियेमुळे पुढे इंधनाचे थर वेगळे होण्याची शक्यता निर्माण होते.

फेज सेपरेशन म्हणजे नेमके काय?

इंधनातील ओलावा वाढल्यानंतर इथेनॉल आणि पाणी एकत्र येऊन टाकीच्या तळाशी साचू लागते. वरच्या बाजूला पेट्रोलचा वेगळा थर तयार होतो. या प्रक्रियेला फेज सेपरेशन, असे म्हटले जाते.

ही स्थिती निर्माण झाल्यानंतर पेट्रोलची गुणवत्ता कमी होते. त्याशिवाय पाणी आणि इथेनॉलचे मिश्रण इंजिनामध्ये गेल्यास वाहन सुरू होण्यात अडचण येणे, इंजिनाची कार्यक्षमता कमी होणे किंवा काही वेळा यांत्रिक बिघाड होण्याचाही धोका वाढतो.

इंजिनामध्ये काय परिणाम होऊ शकतो?

फेज सेपरेशनमुळे पेट्रोलची ऑक्टेन क्षमता तीन ते चार अंकांनी कमी होऊ शकते. परिणामी इंजिनाला आवश्यक त्या दर्जाचे इंधन मिळत नाही. त्यामुळे वाहनाची गती, मायलेज आणि एकूणच कार्यक्षमता कमी होण्याची शक्यता असते.

इतकेच नव्हे, तर टाकीच्या तळाशी साचलेले पाणी आणि इथेनॉलचे मिश्रण थेट इंजिनामध्ये गेल्यास इंजिन सुरू होण्यास विलंब लागू शकतो. काही प्रकरणांमध्ये इंजिनामधील महत्त्वाच्या भागांचेही नुकसान होऊ शकते.

या समस्या इथेच थांबत नाहीत

इथेनॉलमुळे ऑक्सिडेशनची प्रक्रिया अधिक वेगाने होते. त्यामुळे इंधनामध्ये चिकट पदार्थ तयार होण्याचा धोका वाढतो. हा पदार्थ फ्यूएल इंजेक्टर किंवा कार्बोरेटरमध्ये साचल्यास ते जाम होऊ शकतात.

त्याशिवाय इंजिनामध्ये निर्माण झालेल्या ओलाव्यामुळे त्यामधील स्टील, अॅल्युमिनियम व पितळ यांसारख्या धातूंच्या भागांवर गंज चढू शकतो. जुन्या वाहनांमध्ये रबराच्या नळ्या, सील आणि प्लास्टिकचे काही भाग इंधनातील इथेनॉलच्या जास्त प्रमाणामुळे लवकर खराब होऊ शकतात. त्यामुळे इंधनगळतीचीही शक्यता वाढते.

ई-२० पेट्रोल सुरक्षितपणे कसे साठवावे?

ई-२० पेट्रोल दीर्घकाळ साठवून ठेवायचे असल्यास काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

  • ३० दिवसांपेक्षा जास्त काळ ठेवायचे असल्यास दर्जेदार फ्यूएल स्टॅबिलायझरचा वापर करावा.
  • शक्यतो पूर्णपणे बंद आणि हवाबंद धातूच्या डब्यातच इंधन साठवावे.
  • कंटेनरमध्ये ओलावा शिरू नये याची विशेष काळजी घ्यावी.
  • दीर्घकाळ वापरात नसलेल्या वाहनाची इंधन टाकी शक्य तितकी भरून ठेवावी. त्यामुळे टाकीत हवेचे प्रमाण कमी राहते आणि ओलावा निर्माण होण्याची शक्यता घटते.
  • बराच काळ उभी असलेली गाडी पुन्हा सुरू करण्यापूर्वी टाकीतील इंधनात किमान एक-तृतीयांश ताजे पेट्रोल मिसळल्यास इंधनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होऊ शकते.

ई-२० पेट्रोल वापरताना ही माहिती लक्षात ठेवा

इथेनॉलमिश्रित इंधनामुळे कच्च्या इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यास आणि प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यास मदत होत असली तरी त्याच्या साठवणुकीसंदर्भातील महत्त्वपूर्ण बाबींकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. सामान्य पेट्रोलप्रमाणे ई-२० पेट्रोल महिनोन महिने सुरक्षित राहील, असा समज चुकीचा आहे. योग्य पद्धतीने साठवणूक आणि वेळेत वापर केल्यासच या इंधनाचा अपेक्षित लाभ मिळू शकतो आणि वाहनाचे इंजिनही सुरक्षित राहू शकते.