Kovidar Tree Symbol on Ayodhya Ram Mandir Dharma Dhwaj : अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाच्या पूर्णत्वाचं प्रतीक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण करण्यात आलं. गेल्या वर्षी, जानेवारी २०२४ मध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते या मंदिरातील रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती. परंतु, तेव्हा या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं नव्हतं. अपूर्ण राहिलेलं बांधकाम गेल्या दोन वर्षांमध्ये पूर्ण करण्यात आलं आणि आज त्या मंदिरावर मोदी यांच्या हस्ते औपचारिकरित्या ध्वज लावला गेला. या ध्वजावर कोविदार वृक्ष आणि सूर्य प्रतिमा आहे. कोविदार वृक्ष म्हणजे काय? त्याचं रामराज्यातील महत्त्व काय? आपण जाणून घेऊ.
कोविदार वृक्षाबाबत मोहन भागवत यांनी काय म्हटलं आहे?
धर्म ध्वजावरील कोविदार वृक्ष आहे. तो कांचनार वृक्षासारखा दिसतो. मात्र पारिजात आणि मांदार यांचा संकर असलेला हा वृक्ष आहे. हा वृक्ष रघुकुल रित दाखवणारा आहे. स्वतः उन्हात उभं राहून सगळ्यांना सावली देणारा हा वृक्ष आहे. असे वृक्ष सत्पुरुषांसारखे असतात. कांचनार वृक्षाचा उपयोग औषधांमध्येही होतो आणि अन्नातही होतो. धर्म जीवन हे असंच असतं असं मोहन भागवत यांनी कोविदार वृक्षाबाबत सांगितलं.
कोविदार वृक्षाची अख्यायिका काय?
वाल्मिकी रामायणात कोविदार वृक्षाचा उल्लेख आहे. प्रभू रामचंद्र जेव्हा सीता आणि लक्ष्मणासह वनवासात गेले तेव्हा भरत तिथे नव्हता. भरताला जेव्हा रामाला वनवासात पाठवण्यात आलं आहे हे कळलं तेव्हा तो रामाची समजूत काढण्यासाठी आणि रामाला पुन्हा अयोध्येत परत या ही विनंती करण्यासाठी चित्रकूट पर्वतावर भेटायला गेला होता. त्यावेळी अयोध्येतलं सैन्यही भरतासह आलं होतं. वनवासात देखरेखीची जबाबदारी लक्ष्मणावर होती. त्याने एका झाडावर बसून हे पाहिलं की एक सैन्य त्यांच्या दिशेने येतं आहे. त्याने रामाला याबाबत सांगितलं. तेव्हा रामाने कोविदार वृक्षाची खूण पाहिली आणि लक्ष्मणाला सांगितलं की हे आपल्याच अयोध्येचे ध्वज आहेत. भरताने रामाची भेट घेतली पण रामाने वनवास पूर्ण करणार हे सांगितलंच. त्यानंतर भरताने रामाच्या पादुका डोक्यावर घेऊन येत अयोध्येत रामाचा प्रतिनिधी म्हणून १४ वर्षे राज्य केलं.

कोविदार वृक्षाचा पुराणातला उल्लेख काय?
कोविदार वृक्षाला जगातला पहिला संकरित वृक्ष मानलं गेलं आहे. कश्यप ऋषींनी मांदार आणि पारिजात या दोन झाडांच्या संकरातून कोविदार वृक्षाची निर्मिती केली. या वृक्षाला कांचन वृक्ष, आपटा, कांचनार अशीही नावं आहेत.
कोविदारचं वनस्पती शास्त्रातील नाव काय?
कोविदार वृक्षाचं नाव बॉहिनिया व्हेरिएगेटा असं आहे. संस्कृत भाषेत या वृक्षाला कांचनार असं म्हटलं जातं. या वृक्षाची उंची १५ ते २५ मीटर पर्यंत असते. हा वृक्ष पानांनी आणि फुलांनी डवरलेला असतो आणि त्याची फुलं वांग्याच्या रंगाची असतात. कोविदार वृक्ष हिमालयाचा दक्षिणी भाग, पूर्व भाग आणि दक्षिण भारतात आढळतो. कोविदार वृक्षाच्या सत्त्वाचा उपयोग त्वचेच्या रोगांसाठी होतो. तसंच याची साल पोटाचे विकार बरे करणारी गुणकारी साल आहे. असा बहुगुणी कोविदार वृक्ष रामराज्यात त्यांच्या ध्वजावर होता आणि राष्ट्रीय प्रतीक होता.
