Lavender Marriage : जून महिना हा जगभरात ‘प्राइड मंथ’ म्हणून साजरा केला जातो. एलजीबीटी (LGBT – Lesbian, gay, bisexual, and transgender) समुदाय या महिन्यात आपली ओळख स्वीकारतात आणि विविध माध्यमांतून स्वत: व्यक्त होत आनंदोत्सव साजरा करतात. जरी एलजीबीटी समुदाय या महिन्यात आनंद उत्सव साजरा करीत असले तरी त्यांना समाजात वावरताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. समाजाच्या अपेक्षा आणि कायदेशीर बंधनांना त्यांना तोंड द्यावे लागते.
आपल्या देशात अनेकदा परंपरा या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आड येतात. एलजीबीटी समुदायाच्या वाटेत येणाऱ्या अडचणींमुळे त्यांना अनेक नकारात्मक गोष्टींचा सामना करावा लागतो. विवाह समानता ही त्यातली एक मोठी समस्या आहे.

कलम ३७७ द्वारे जर अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले, तर १० वर्षांपर्यंत कारावासाची किंवा आर्थिक दंडाची शिक्षा केली जात असे. २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे कलम रद्द केले; पण समलैंगिक विवाहाला मान्यता दिली नाही.
ऑक्टोबर २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिला.

हेही वाचा : मुंबईच्या ‘त्या’ सात बेटांची निर्मिती झाली तरी कशी? जाणून घ्या बॅकबे, वरळी अन् माहीम ‘बे’ची रंजक गोष्ट…

लॅव्हेंडर मॅरेज म्हणजे नेमके काय?

लॅव्हेंडर मॅरेज म्हणजे नेमके काय, हे समजून घेण्यासाठी तुम्हाला आधी ‘गे’ आणि ‘लेस्बियन’ या दोन संज्ञा समजून घ्याव्या लागतील. जेव्हा एखाद्या पुरुषाचा लैंगिक कल हा स्त्रियांपेक्षा पुरुषांकडे जास्त असेल, तर त्याला ‘गे’ म्हणतात आणि जेव्हा एखाद्या स्त्रीचा लैंगिक कल हा पुरुषांपेक्षा स्त्रियांकडे जास्त असेल, तर तिला ‘लेस्बियन’ म्हणतात. जेव्हा हे ‘लेस्बियन’ आणि ‘गे’ एकमेकांबरोबर लग्न करतात, तेव्हा त्याला ‘लॅव्हेंडर मॅरेज’ म्हणतात.

२०२२ मध्ये ‘बधाई दो’ चित्रपटात लॅव्हेंडर मॅरेजची संकल्पना दाखवली गेली होती. त्यावेळी भारतात या लग्नप्रकाराची चर्चा चांगलीच रंगली होती. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला हा लॅव्हेंडर मॅरेजचा प्रकार दिसून आला. समाजातील मान-प्रतिष्ठा जपणे, लैंगिक आवडी-निवडी लपविणे आणि त्यांना कायदेशीर बंधने येऊ नयेत यांसाठी तो एक उपयुक्त पर्याय ठरला आणि त्यामुळे त्यांना सामाजिक आणि आर्थिक असे दोन्हीही फायदे झाले.

समाजात या लोकांना स्वीकारले जात नाही. त्यांच्यावर सामाजिक दबाव दिसून येत. त्यांना सतत भीती असते. त्याशिवाय मान-सन्मान प्रतिष्ठा राखणे आणि कायदेशीर मान्यता मिळावी यांसाठी लॅव्हेंडर मॅरेज प्रकाराचे प्रमाण हल्ली वाढल्याचे दिसून येतेय.

लॅव्हेंडर मॅरेजमुळे आपल्याला समाजाची मानसिकता समजून घेण्याची गरज भासते. लॅव्हेंडर मॅरेज हे दीर्घकाळ टिकेल, असे सांगता येत नाही. अशा नात्याला सतत आव्हानांचा सामना करावा लागतो. अनेकदा हा विवाह एलजीबीटी समुदायासाठी शेवटचा पर्याय असतो.

हेही वाचा : एका ‘माउस जिगलर’ने हजारो लोकांच्या नोकऱ्या घालवल्या! आहे तरी काय हा प्रकार, कर्मचाऱ्यांची हुशारी कशी उलट फिरली?

“माझ्या जोडीदाराला त्याच्या समलैंगिकतेमुळे उशिरा रात्री घरातून हाकलून देणार होते. भारतात समलिंगी व्यक्ती म्हणून जगणे हे एक मोठे आव्हान आहे. सामाजिक दबाव, समाजातील नियमांचे पालन करणे, कायदेशीर आव्हाने, कामाच्या ठिकाणी भेदभाव इत्यादी समस्यांचा त्यांना सामना करावा लागतो”, असे एव्हीपी नॅट-कॅट स्पेशालिस्ट केतन बजाज सांगतात.

“असे दुहेरी जीवन जगत असल्यामुळे व्यक्तीला ताणतणाव जाणवू शकतो; ज्यामुळे नैराश्याचा धोका वाढतो. स्वत:ची ओळख आणि समाजातील अपेक्षा यांच्यामध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर पडू शकतो. असे लोक स्वत: ला एकटे समजतात आणि नैराश्याची शिकार होतात. त्यांच्यामध्ये अपराधीपणाची भावना निर्माण होते; ज्यामुळे त्यांना मानसिक त्रास होऊ शकतो”, असे ॲरिस्टोक्रॅट गेमिंगचे प्रमुख टेक्निकल आर्टिस्ट व मिस्टर गे वर्ल्ड इंडिया (२०१६)चे विजेते अन्विश साहू सांगतात.

एलजीबीटी समुदायाच्या हक्कांसाठी लढणारे कार्यकर्ते व वकील सौरभ किरपाल यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद सादर केला होता. त्यात ते म्हणाले होते, “समलैंगिक लोकांना लग्न करण्यापासून थांबवले, तर काय होईल? आपल्या समाजात लॅव्हेंडर मॅरेज दिसून येईल आणि दोन व्यक्तींचे आयुष्य उद्ध्वस्त होईल.

“भारतात कलम ३७७ रद्द करणे हे एलजीबीटी समुदायासाठी हे महत्त्वाचे पाऊल होते; पण आजही या लोकांचा संघर्ष असाच सुरू आहे. या लोकांना स्वीकारणे, कायदेशीर सुधारणा करणे आणि सामाजिक बदल घडवून आणणे गरजेचे आहे”, असे केतन बजाज सांगतात.
एलजीबीटी समुदायाला आशा आहे ती म्हणजे भारत एलजीबीटी लोकांचे हक्क ओळखून आणि त्यांना संरक्षण देऊन, सर्वसमावेशक धोरण आणेल; ज्यामुळे हा समुदाय स्वाभिमानाने जगू शकेल.