Mameru Ceremony in Gujarati Tradition : रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांच्या बहुचर्चित विवाहसोहळ्याचे विधी सुरू झाले आहेत. १२ जुलैला हिंदू पद्धतीने त्यांचा विवाह होणार असून १३ जुलैला शुभ आशीर्वादाचा कार्यक्रम होणार आहे. तर, १४ जुलैला मोठा रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तर या विधींना मामेरू या विधीने सुरुवात झाली. हा एक महत्त्वाचा विधी असतो. या विधीविषयी जाणून घेऊयात. काय आहे मामेरू समारंभ? बुधवारी (४ जुलै रोजी) मुकेश अंबानी यांच्या घरी ‘मामेरू’ समारंभ पार पडला. या समारंभासाठी अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी व अंबानी कुटुंबियांचे जवळचे नातेवाईक उपस्थित होते. नीता अंबानी यांच्या माहेरून त्यांची आई पूर्णिमा दलाल व बहीण ममता दलाल या समारंभासाठी आले होते, नीता अंबानी यांनी त्यांचं पारंपरिक पद्धतीने स्वागत केलं. मामेरू समारंभ ही गुजराती विवाह परंपरा आहे. या प्रथेमध्ये मामाला अधिक महत्त्व असतं. दोन्हींकडचे मामा आपल्या उत्सवमूर्तींसाठी भेटवस्तू आणि दागिने आणतात. तसंच, त्यांच्या आई-वडिलांसाठीही भेटवस्तू आणतात. मामाने आणलेले कपडे, दागिने नववधू-वर आणि आणि त्यांचे आई-वडिल परिधान करतात. त्यानंतर त्यांचं स्वागत केलं जातं. मुलीचे मामा नववधूला पनेतर साडी, दागिने, हस्तिंदती किंवा पांढऱ्या बांगड्या देतात. तर, मुलाचे मामाही वरासाठी असंच खास आकर्षक भेटवस्तू देतात. View this post on Instagram A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) मामेरू सोहळ्यासाठी अँटिलियावर सजावट अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा रिलायन्स कंपनीच्या जिओ वर्ल्ड सेंटर येथे होणार आहे. परंतु, मामेरू सोहळ्यासाठी संपूर्ण अँटिलियावर रोषणाई करण्यात आली. अँटिलिया लाल, गुलाबी आणि नारिंगी फुलांनी सजले आहे. तर, सोनेरी दिव्यांची सजावट करण्यात आली आहे. तसंच, डिजिटल स्क्रीनवर अनंत आणि राधिकाचा फोटो लावून ऑल दि बेस्टचा संदेश लिहिण्यात आला आहे. मुंबईत होणाऱ्या या लग्नात देशासह जगभरातील अनेक प्रसिद्ध लोक उपस्थित राहणार आहेत. हेही वाचा >> Photos : बांधणी लेहेंगा, आईचे दागिने अन्…; अंबानींच्या होणाऱ्या सुनबाईंचा ‘मामेरु’ समारंभासाठी पारंपरिक गुजराती लूक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नापूर्वी अंबानी कुटुंबाने ५० गरीब जोडप्यांच्या लग्नाचं आयोजन केलं होतं. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी मंगळवारी पालघरमध्ये ५० गरीब मुलींचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला होता. नवीन जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण अंबानी कुटुंब पालघरला आले होते. सामूहिक विवाह सोहळा पार पडताच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या इतर कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.