What is Narco Test: कोलकाता येथील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरूणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेला महिना उलटला असला तरी पश्चिम बंगालमधील वातावरण अद्याप शांत झालेले नाही. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी संजय रॉय याची नार्को टेस्ट घेण्याची सीबीआयची मागणी कोलकाता न्यायालयाने शुक्रवारी (दि. १३ सप्टेंबर) फेटाळून लावली. संजय रॉयने सुरुवातीला चाचणी घेण्यास होकार दिला होता, मात्र तो आता या टेस्टसाठी तयार नसल्याचे न्यायालयाने सांगितले.
याआधी श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आफताब पुनावालाचीही नार्को टेस्ट घेण्याचे प्रकरण समोर आले होते. काही गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी मुख्य आरोपीची नार्को टेस्ट घेण्याची मागणी तपास यंत्रणेंकडून केली जाते. ही टेस्ट नेमकी कशी घेतात? (What is a narco test) त्यातून काय निष्पन्न होते, टेस्ट घेण्याची परवानगी कुणाकडून घेतली जाते, याबद्दल जाणून घेऊ.
नार्को टेस्ट म्हणजे काय?
एखाद्या गंभीर प्रकरणात गुन्हेगार जर चौकशीत सहकार्य करत नसेल तर त्याची नार्को टेस्ट करण्याची आणि त्यामाध्यमातून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी संबंधित न्यायालयाची परवानगी मिळवणे गरजेचे असते. जर न्यायालयाने परवानगी दिली आणि आरोपीचीही त्यासाठी कोणती तक्रार नसेल, तरच ही टेस्ट घेता येते. नार्को टेस्ट फॉरेन्सिक एक्सपर्ट, तपास अधिकारी, डॉक्टर आणि मानसशास्त्रज्ञ यांच्या उपस्थितीत घेतली जाते.
नार्को टेस्ट कशी घेतली जाते?
१) नार्को विश्लेषण टेस्ट करत असताना आरोपीच्या शरीरात इंजेक्शनद्वारे ‘सोडियम पेंटोथल’ हे औषध सोडले जाते. हे औषध शरीरात जाताच आरोपी संमोहित अवस्थेत जातो, त्याचे आत्मभान आणि कल्पना करण्याची क्षमता खुंटते. त्यामुळे या अवस्थेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना आरोपीला खोटे बोलणे अवघड होऊन जाते.
२) औषधामुळे आरोपी संमोहन अवस्थेत असल्यामुळे त्याला खोटे बोलता येत नाही, त्यामुळे यावेळी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे खरी असल्याचे मानले जाते.
३) ‘सोडियम पेंटोथल’ हे औषध शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला भूल देण्यासाठी वापरले जाते. या औषधाला ‘ट्रूथ ड्रग’ असेही म्हटले जाते.
४) सर्वोच्च न्यायालयाने २०१० साली दिलेल्या निकालानुसार, आरोपीच्या संमतीशिवाय नार्को विश्लेषण चाचणी घेतली जाऊ शकत नाही. नार्को टेस्टला कायदेशीर वैधता असली तरी कोणत्या परिस्थितीत अशा चाचणीला परवानगी द्यायची याचा निर्णय न्यायालयाकडूनच घेतला जातो.
५) भारतात २००२ साली गुजरातमध्ये झालेल्या गोंध्रा हत्याकांडानंतर या गुन्ह्यातील आरोपींची नार्को टेस्ट घेण्यात आली होती. त्यानंतर स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील आरोपी अब्दुल करीम तेलगीची नार्को चाचणी २००३ साली पार पडली. निठारी हत्याकांडातील दोन आरोपींचीही गुजरातच्या गांधीनगरमध्ये नार्को चाचणी करण्यात आली होती.
हे ही वाचा >> विश्लेषण : नार्को आणि पॉलिग्राफ चाचणीत नेमका फरक काय?
नार्को टेस्टआधी घेतली जाते काळजी
नार्को टेस्ट घेण्याआधी संबंधित आरोपीची शारीरिक तपासणी केली जाते. ज्या आरोपीची सदर चाचणी करायची आहे, ती व्यक्ती वृद्ध आहे का किंवा शारीरिक व्याधींनी ग्रस्त आहे का? याचा तपास केला जातो. तसेच आरोपी मानसिकदृष्ट्या दुर्बल तर नाही ना? याचीही माहिती घेतली जाते. औषधाच्या डोसचा कमी-अधिक परिणांमाचाही विचार डॉक्टर करत असतात.