‘जागतिक दृक्-श्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे (वेव्ह्ज) उद्घाटन मोदी यांच्या हस्ते वांद्रे-कुर्ला संकुलात जिओ वर्ल्ड येथे करण्यात आले. उद्घाटनानंतर त्यांनी आपल्या भाषणात ‘ऑरेंज इकॉनॉमी’चा उल्लेख केला. त्यांनी वेव्हज हा भारतातील ‘ऑरेंज इकॉनॉमी’चा उदय असल्याचे म्हटले, तेव्हापासून ‘ऑरेंज इकॉनॉमी’ काय हा प्रश्न अनेकांना पडत आहे. ग्रीन इकॉनॉमी किंवा डिजिटल इकॉनॉमी या संकल्पना अनेकांना माहीत आहेत, परंतु मोदी यांनी उल्लेख केलेली ‘ऑरेंज इकॉनॉमी’ काय, याची माहिती अनेकांना नाही. त्याविषयी जाणून घेऊयात.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

वेव्ह्ज, ही केवळ एक संक्षिप्त संज्ञा नव्हे, तर ती संस्कृती, सर्जनशीलता आणि सार्वत्रिक कनेक्टिव्हिटीची लाट आहे. भारताकडे हजारो वर्षांपूर्वीच्या कथांचा वैश्विक खजिना आहे. सर्जनशील व्यक्ती ऊर्जा आणि कार्यक्षमतेद्वारे सर्जनशीलतेच्या क्रांतीला नव्याने आकार देऊ शकतात. आशय, सर्जनशीलता आणि संस्कृती हे रचनात्मक अर्थव्यवस्थेचे (ऑरेंज इकॉनॉमी) तीन स्तंभ असून सर्जनशील अर्थव्यवस्थेचा (क्रिएटिव्ह इकॉनॉमी) चा पुढील १० वर्षांत देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) मोठा वाटा असेल, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी वेव्हज हा भारतातील ‘ऑरेंज इकॉनॉमी’चा उदय असल्याचे म्हटले. त्यामध्ये संगीत, चित्रपट, गेमिंग आणि अॅनिमेशन या सर्जनशील क्षेत्रांचा समावेश होतो. भारताच्या संस्कृतीला जागतिक स्तरावर ओळख मिळत असल्याचेही पंतप्रधान मोदींनी सांगितले. त्यांनी म्हटले की, पुरस्कारांप्रमाणेच वेव्हज उपक्रमाचा उद्देश डिजिटल सर्जनशीलतेच्या क्षेत्रात संधी प्रदान करणे आहे.

“वेव्हज संगीत, गेमिंगमधील भारतातील प्रतिभेसाठी एक व्यासपीठ प्रदान करेल,” असे त्यांनी नमूद केले. हा उपक्रम कलाकारांना जागतिक स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठीचा एक मार्ग प्रदान करेल. भारत आज चित्रपट निर्मिती, डिजिटल सामग्री, गेमिंग, फॅशन, संगीत आणि भव्य महोत्सव आदींसाठी जागतिक केंद्र म्हणून उदयास येत आहे. देशातील अब्जावधी तरुणांनी आपल्या कथा जगासमोर आणाव्यात, असे आवाहनही नरेंद्र मोदी यांनी केले.

‘ऑरेंज इकॉनॉमी’ म्हणजे काय?

ऑरेंज इकॉनॉमी हे नाव आर्थिक मॉडेलशी संबंधित नाही. ही एक संकल्पना आहे, जी कला, संस्कृती आणि क्रिएटिव्हीटीवर आधारित आहे आणि सांस्कृतिक उद्योगांशी संबंधित क्षेत्रे त्यात समाविष्ट आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक नेटवर्कनुसार, ऑरेंज इकॉनॉमी ही एक विकसित होत जाणारी कल्पना आहे. ऑरेंज इकॉनॉमी आर्थिक वाढ आणि विकासाला चालना देण्यासाठी कला आणि सांस्कृतिक उद्योगांवर लक्ष केंद्रित करते. ही अर्थव्यवस्था आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक पैलूंना एकत्रित करते.

ऑरेंज इकॉनॉमीमध्ये वैयक्तिक सर्जनशीलता, कौशल्य आणि प्रतिभेवर आधारित उद्योगांचा समावेश आहे, ज्यात रोजगार, संपत्ती आणि सांस्कृतिक मूल्य निर्माण करण्याची क्षमता आहे. या अर्थव्यवस्थेतील उद्योगांमध्ये जाहिरात, वास्तुकला, कला आणि हस्तकला, डिझाइन, फॅशन, चित्रपट, व्हिडीओ, छायाचित्रण, संगीत, कला, प्रकाशन, संशोधन आणि विकास, सॉफ्टवेअर, संगणक खेळ, इलेक्ट्रॉनिक प्रकाशन आणि टीव्ही/रेडिओ यांचा समावेश आहे.