What is the Marathi Meaning of Signal: रस्त्यावरून प्रवास करताना आपण दिवसातून कित्येक वेळा “सिग्नल लागला”, “सिग्नल तोडू नको”, “सिग्नल ग्रीन झाला” असे शब्द अगदी सहजगत्या बोलतो. शहरातील गजबजलेल्या चौकांमध्ये लाल, पिवळे व हिरवे दिवे सतत आपलं लक्ष वेधून घेत असतात. वाहनांची गर्दी नियंत्रित करण्यापासून ते अपघात टाळण्यापर्यंत या सिग्नलची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. पण कधी तुम्ही शांतपणे विचार केला आहे का, आपण रोज वापरत असलेल्या ‘सिग्नल’ शब्दाला शुद्ध मराठीत नेमकं काय म्हणतात?
हा प्रश्न ऐकताच अनेक जण थोडा वेळ विचारात पडतात. काही लोक “दिवा’ म्हणतात, काही ‘ट्रॅफिक लाईट’ म्हणतात, तर काहींना यासाठी मराठी शब्द काय याचा अंदाजच करता येत नाही. विशेष म्हणजे मराठीत बोलताना आपण अनेक इंग्रजी शब्द इतक्या सहजपणे वापरतो की, ते परकीय शब्द आहेत, हेच मुळात आपल्या लक्षात येत नाही. ‘सिग्नल’ हा त्यापैकीच एक शब्द.
पूर्वीच्या काळात एवढी वाहनांची गर्दी नव्हती. रस्ते तुलनेने मोकळे होते आणि चौकांमध्ये वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पोलीस उभे राहत असत. हळूहळू शहरांचा विस्तार झाला, वाहनांची संख्या वाढली आणि वाहतूक नियंत्रणासाठी आधुनिक पद्धती अमलात आणण्याची गरज निर्माण झाली. त्यातूनच सिग्नल यंत्रणा अधिक प्रभावीपणे वापरली जाऊ लागली.
आज प्रत्येक शहरात, प्रत्येक मोठ्या चौकात सिग्नल दिसतो. लाल दिवा थांबायला सांगतो, पिवळा दिवा सावध राहण्याचा इशारा देतो आणि हिरवा दिवा पुढे जाण्याची परवानगी देतो. इतक्या वर्षांत हा शब्द आपल्या दैनंदिन भाषेचा भाग बनला आहे. पण गंमत म्हणजे अनेक सुशिक्षित लोकांनाही ‘सिग्नल’साठी वापरला जाणारा अचूक मराठी शब्द सांगता येत नाही.
मराठी भाषेमध्ये अनेक इंग्रजी शब्दांना सुंदर आणि अर्थपूर्ण पर्यायी शब्द आहेत. उदाहरणार्थ- ‘रेल्वे स्टेशन’ला ‘स्थानक’, ‘हॉस्पिटल’ला ‘रुग्णालय’, ‘टीचर’ला ‘शिक्षक’ असे शब्द वापरले जातात. पण काही शब्द इतके प्रचलित होतात की, त्यांचे मराठी पर्याय हळूहळू मागे पडतात. ‘सिग्नल’चंही तसंच झालं आहे.
सोशल मीडियावर सध्या “या इंग्रजी शब्दाला मराठीत काय म्हणतात?” असे प्रश्न मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. लोक उत्सुकतेने त्याबाबतची उत्तरे शोधत आहेत. ‘टेबल’, ‘झेराॅक्स’, ‘बस’, ‘बँक’ यांसारख्या शब्दांनंतर आता ‘सिग्नल’ या शब्दाची चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी वेगवेगळी उत्तरं दिली; पण योग्य उत्तर मात्र फार कमी लोकांना माहीत आहे.
विशेष म्हणजे, ‘सिग्नल’ हा शब्द फक्त वाहतुकीपुरता मर्यादित नाही. मोबाईल नेटवर्क असो किंवा रेल्वेचा इशारा सर्वत्र ‘सिग्नल’ हा शब्द वापरला जातो. मात्र, वाहतुकीसंदर्भात त्याचा मराठी अर्थ वेगळ्या पद्धतीने सांगितला जातो.
आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, मग ‘सिग्नल’ला मराठीत नेमकं काय म्हणतात?
तर वाहतुकीतील ‘सिग्नल’ला मराठीत ‘वाहतूक संकेत दिवा’ किंवा साध्या भाषेत ‘संकेत दिवा’ असे म्हणतात. काही ठिकाणी ‘वाहतूक दिवा’ हाही शब्द वापरला जातो.
म्हणजे पुढच्या वेळी सिग्नलवर थांबल्यावर तुम्ही अभिमानाने म्हणू शकता – “वाहतूक संकेत दिवा लाल झाला आहे!”
