What Is the Marathi Word for Bank: पगार जमा झाला की बँक, EMI भरायचा तर बँक, पैसे काढायचे तर बँक… आपल्या दैनंदिन आयुष्यात बँक हा शब्द आपल्या जीवनाशी इतका एकरूप होऊन गेला आहे की, त्याला मराठीत वेगळा शब्द असेल याचा विचारही अनेकांच्या मनात येत नाही. पण, तुम्हाला माहितीये का? आपण रोज वापरत असलेल्या बँक या शब्दाला मराठीत एक सुंदर आणि अर्थपूर्ण प्रतिशब्द आहे. विशेष म्हणजे हा शब्द अनेकांनी कधी ऐकलाही नसेल.
आजकाल मराठी भाषेबद्दल प्रेम व्यक्त करणारे अनेक जण सोशल मीडियावर वेगवेगळ्या शब्दांचे मराठी अर्थ शोधताना दिसतात. “बसला मराठीत काय म्हणतात?”, “रेल्वेला मराठीत काय म्हणतात?” अशा चर्चांमध्ये लोक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. पण, बँक या शब्दाला मराठीत पर्यायी शब्द कोणता आहे, हा प्रश्न विचारला तर बहुतेक जण काही क्षण गोंधळून जातात.
खरं पाहिलं, तर बँक ही फक्त पैसे ठेवण्याची जागा नाही. सामान्य माणसाच्या आयुष्याचा ती अविभाज्य भाग बनली आहे. सकाळी मोबाईलवर पगाराचा मेसेज आला की, आनंद होतो; पण कर्जाचा हप्ता कट झाला की, थोडी काळजी वाटते. विद्यार्थ्यांपासून ते मोठ्या व्यावसायिकांपर्यंत प्रत्येक जण बँकेशी जोडलेला आहे.
पूर्वीच्या काळात लोक पैसे घरातच साठवून ठेवायचे. काही जण सोन्यात गुंतवणूक करायचे; पण काळ बदलला आणि सुरक्षित व्यवहारांसाठी बँकांची गरज वाढली. आता तर मोबाईल बँकिंग, UPI, ऑनलाईन ट्रान्स्फरमुळे बँक आपल्या हातातील स्मार्टफोनमध्येच आली आहे. त्यामुळे बँक हा शब्द इतका सामान्य झाला की, त्याचा मराठी पर्याय लोक विसरूनच गेले.
विशेष म्हणजे अनेक सरकारी कागदपत्रे आणि जुन्या मराठी पुस्तकांमध्ये हा शब्द वापरलेला दिसतो; पण दैनंदिन संभाषणात इंग्रजी शब्दांचा वापर वाढल्यामुळे मूळ मराठी शब्द मागे पडले. त्यामुळे आजच्या पिढीला तो शब्द ऐकला की, आश्चर्य वाटू शकतं.
मराठी भाषा ही अतिशय समृद्ध भाषा मानली जाते. अनेक इंग्रजी शब्दांना सुंदर मराठी पर्याय आहेत. मात्र, आपण सवयीने इंग्रजी शब्द वापरतो आणि मराठी शब्द हळूहळू विसरले जातात. बँक हाही त्यापैकीच एक शब्द आहे.
आता तुमचीही उत्सुकता वाढली असेल की, शेवटी ‘बँक’ला मराठीत नेमकं काय म्हणतात?
तर ‘बँक’ला मराठीत ‘अधिकोष’, असे म्हणतात.
अधिकोष म्हणजे पैसे, संपत्ती किंवा निधी सुरक्षित ठेवण्याचे ठिकाण. हा मराठीतील अधिकृत आणि शुद्ध पर्यायी शब्द मानला जातो. अनेक सरकारी कार्यालये, पुस्तके आणि भाषांतरांमध्ये अधिकोष हा शब्द वापरलेला आढळतो.
म्हणून पुढच्या वेळी कुणी विचारलं की, “बँकेला मराठीत काय म्हणतात?”, तर अभिमानाने सांगा – ‘अधिकोष’.
