Police Meaning in Marathi: आपण रोजच्या आयुष्यात कितीतरी शब्द सहजपणे वापरत असतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या बोलण्यात इंग्रजी शब्दांची अक्षरशः रेलचेल असते. मोबाईल, बस, स्टेशन, ऑफिस, डॉक्टर, टीचर… असे अनेक शब्द इतके सवयीचे झाले आहेत की, ते मूळ इंग्रजी आहेत, याचाही विसर पडतो. पण कधी अचानक कुणी विचारलं, “या शब्दाला मराठीत काय म्हणतात?” तर मात्र अनेकांची बोलती बंद होते.
समाजाचा रक्षक म्हणजे ‘पोलीस’. हा शब्द आपण दररोज उच्चारतो. रस्त्यावर वाहतूक नियंत्रण करताना, एखाद्या गुन्ह्याच्या तपासात, मोर्चा सांभाळताना किंवा संकटात धावून येणारी व्यक्ती म्हणून कोणाची आठवण होत असेल, तर ती म्हणजे पोलीस. समाजातील कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असते. त्यामुळे पोलीस हा शब्द आपल्या जीवनाचा जणू अविभाज्य भाग बनला आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, ‘पोलीस’ला शुद्ध मराठीत काय म्हणतात?
बहुतेक लोक या प्रश्नावर क्षणभर थांबतात. काही जण अंदाज लावतात, तर काहींना या शब्दाला मराठीत प्रतिशब्द असूच शकत नाही, असं वाटतं. कारण- हा शब्द इतका रूढ झाला आहे की, त्याचा मराठी पर्याय अस्तित्वात असेल, याची कल्पनाच अनेकांना नसते.
दरम्यान, आपल्या भाषेवर प्रेम करणाऱ्या अनेक साहित्यिक आणि विचारवंतांनी इंग्रजी शब्दांना मराठीत पर्यायी शब्द देण्याचा प्रयत्न केला होता. विशेषतः स्वातंत्र्यपूर्व काळात मराठी भाषेची शुद्धता टिकविण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला. त्यावेळी अनेक इंग्रजी शब्दांना सुंदर आणि अर्थपूर्ण मराठी पर्याय सुचवण्यात आले.
‘पोलीस’ची कर्तव्ये काय?
समाजाचे रक्षण करणे, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस पहारा वा परिसरात गस्त घालणे, गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवणे आणि संकटसमयी धावून येणे हे सर्व करणारी व्यक्ती नेमकी कोण? त्याची ओळख केवळ गणवेशापुरती मर्यादित नाही. तो समाजाचा संरक्षक आहे, सुरक्षिततेसाठी झटणारा पाईक आहे आणि कायद्याचा जागरूक रक्षक आहे.
पर्यायी मराठी शब्द अतिशय समर्पक
आजच्या पिढीला हा शब्द फारसा माहिती नसला तरी जुन्या मराठी साहित्यामध्ये आणि काही सरकारी लिखाणांमध्ये तो आढळतो. विशेष म्हणजे हा शब्द ऐकताच त्या व्यक्तीची भूमिका आणि जबाबदारी लगेच स्पष्ट होते.
‘पोलीस’ मराठीतील नेमका शब्द कोणता?
तर, प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक आणि विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांनी पोलीस या शब्दासाठी आरक्षक असा सुंदर मराठी पर्यायी शब्द सुचवला होता. आरक्षक म्हणजे संरक्षण करणारा, रक्षण करणारा. समाजाच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांच्या भूमिकेला अगदी साजेसा हा शब्द मानला जातो.
आजही अनेक सरकारी कागदपत्रांमध्ये ‘पोलीस शिपाई’ऐवजी ‘पोलीस आरक्षक’ असा उल्लेख पाहायला मिळतो. मात्र, सामान्य बोलाचालीत पोलीस हा शब्दच अधिक प्रचलित असल्याने आरक्षक हा शब्द अनेकांना माहीतच नसतो.
मराठी भाषेची हीच तर खरी गंमत आहे. रोज वापरले जाणारे अनेक शब्द प्रत्यक्षात इंग्रजी असतात आणि त्यांचे सुंदर मराठी पर्यायी शब्द आपल्या भाषेत आधीपासून अस्तित्वात असतात; पण बदलत्या काळात ते मागे पडल्याचे दिसून येते.
तुम्हालाही असे काही इंग्रजी शब्द माहिती आहेत का, ज्यांचे मराठी अर्थ ऐकून लोक आश्चर्यचकित होतील? मग असे शब्द नक्की सांगा. कारण भाषा जितकी समृद्ध, तितकी संस्कृती अधिक जिवंत राहते.
