What Is the Marathi Word for Railway: भारतात दररोज कोट्यवधी प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. कमी खर्चात, सुरक्षित आणि सोईस्कर प्रवासाचा पर्याय म्हणून रेल्वेला सर्वाधिक पसंती दिली जाते. शहरांमधील दैनंदिन प्रवास असो, लांब पल्ल्याचा प्रवास असो किंवा एखाद्या गावापासून महानगरापर्यंत पोहोचायचे असो, रेल्वे ही अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे.

देशभर पसरलेले विस्तीर्ण रेल्वे जाळे, दररोज धावणाऱ्या हजारो गाड्या आणि लाखो प्रवाशांची सततची वर्दळ यांमुळे रेल्वेची प्रवासी व मालवाहतूक व्यवस्था देशाच्या विकासाचा महत्त्वाचा आधार मानली जाते. मात्र, आपण रोज सहजपणे उच्चारत असलेल्या रेल्वे या शब्दाला शुद्ध मराठी पर्याय काय आहे, याचा विचार कधी केला आहे का?

आपल्या दैनंदिन मराठी बोलण्यात अनेक परभाषांतील इतके शब्द इतक्या बेमालूमपणे मिसळले गेले आहेत की, त्या शब्दांना पर्यायी मराठी प्रतिशब्द अस्तित्वात आहेत. हेच अनेकांना माहीत नसते. ‘रेल्वे’ हा त्यापैकीच एक शब्द आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येक जण ‘रेल्वे’ शब्दाचा अगदी सहजगत्या वापर करतो; पण शुद्ध मराठी भाषेत त्यासाठी वेगळा शब्द आहे, हे फार कमी लोकांना ठाऊक असते.

मराठी भाषेतील शब्दांचा वापर कमी का झाला?

काळानुसार इंग्रजी आणि इतर भाषांतील अनेक शब्द आपल्या दैनंदिन व्यवहारात रूढ झाले. त्यामुळे मूळ मराठी शब्द मागे पडत गेले. शाळा, कार्यालये, प्रवास, व्यापार आणि दैनंदिन संभाषणातही परभाषेतील शब्दांचा वापर वाढल्यामुळे अनेक शुद्ध मराठी शब्द विस्मृतीत गेले.

याच कारणामुळे आज ‘रेल्वे’ म्हणताच प्रत्येकाला अर्थ समजतो; पण त्यासाठी मराठी पर्यायी शब्द काय?, असे विचारले, तर अनेक जण क्षणभर गोंधळतात.

मराठी भाषेचे जतन का महत्त्वाचे?

मराठी ही समृद्ध साहित्यपरंपरा लाभलेली भाषा आहे. या भाषेत अनेक सुंदर आणि अर्थपूर्ण शब्द आहेत. दैनंदिन व्यवहारात आपण शक्य तितक्या मराठी शब्दांचा वापर करीत राहिल्यास आपल्या मायमराठी भाषेतील शब्दांची श्रीमंती टिकून राहील. अर्थात, प्रत्येक परभाषेतील शब्द टाळणे शक्य नाही; पण त्यांचे मराठी पर्याय माहीत असणे ही भाषा जतन करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे.

भाषातज्ज्ञांच्या मते, शुद्ध मराठी शब्दांचा वापर वाढल्यास पुढील पिढीलाही भाषेचा खरा वारसा समजण्यास मदत होते.

मग रेल्वेला मराठीत नेमकं काय म्हणतात?

अनेकांना वाटते की ‘रेल्वे’ला मराठीतही ‘रेल्वे’च म्हणतात. व्यवहारात हे खरे ठरले असले तरी शुद्ध मराठीत या शब्दाला पर्याय आहे.

मराठीतील लोहमार्ग हा शब्द Railway या अर्थाने वापरला जातो. ‘लोह’ म्हणजे लोखंड आणि ‘मार्ग’ म्हणजे रस्ता किंवा वाट. लोखंडी रुळांवर धावणाऱ्या या वाहतूक व्यवस्थेला म्हणूनच ‘लोहमार्ग’, असे म्हटले जाते.

तसेच, रेल्वेगाडी या अर्थासाठी ‘आगगाडी’ हा पारंपरिक मराठी शब्दही वापरला जातो. पूर्वी वाफेवर चालणाऱ्या गाड्यांमुळे हा शब्द रूढ झाला. आज व्यवहारात ‘रेल्वे’ आणि ‘रेल्वेगाडी’ हे शब्द अधिक प्रचलित असले तरी शुद्ध मराठीतील ‘लोहमार्ग’ आणि ‘आगगाडी’ हे शब्द आजही भाषिक दृष्ट्या योग्य मानले जातात.

दैनंदिन वापरात रेल्वे हा शब्द सर्वमान्य असला तरी त्याचा शुद्ध मराठी पर्याय जाणून घेणे ही भाषेची समृद्धी जपण्याच्या दिशेने एक छोटी, पण महत्त्वाची पायरी ठरू शकते.