What is Tomato Called in Marathi: भाजी असो, आमटी असो, रस्सा असो किंवा कोशिंबीर… टोमॅटो नसला तर अनेक पदार्थांची चव अपुरी वाटते. आज भारतीय स्वयंपाकघरात टोमॅटोचं स्थान इतकं महत्त्वाचं झालं आहे की, त्याशिवाय अनेक पदार्थांची कल्पनाही करणं कठीण आहे. पण, रोजच्या वापरातील या टोमॅटोला मराठीत नेमकं काय म्हणतात हा प्रश्न विचारला तर अनेकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटतं.
लहानपणापासून आपण ‘टोमॅटो’ हाच शब्द ऐकत आलो आहोत. बाजारातही तोच शब्द वापरला जातो, त्यामुळे याला स्वतंत्र मराठी नाव असेल याची कल्पनाच अनेकांना नसते. सोशल मीडियावरही हा प्रश्न अनेकदा चर्चेत येतो आणि त्यावर विविध अंदाज व्यक्त केले जातात. काहीजण मजेशीर उत्तरं देतात, तर काहींना खरंच योग्य उत्तर माहीत नसतं.
पण, टोमॅटोचा इतिहास पाहिला तर तो भारतात जन्मलेलाच नाही. उलट हजारो किलोमीटर दूर असलेल्या दक्षिण अमेरिकेत त्याची सुरुवात झाली, हे अनेकांना आश्चर्य वाटेल.
अभ्यासकांच्या मते, टोमॅटोचं मूळ दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वतरांगांमध्ये आहे. आजचा पेरू, बोलिव्हिया, चिली आणि इक्वाडोर या प्रदेशांत त्याची उत्पत्ती झाल्याचं मानलं जातं. त्या काळात अझ्टेक आणि इंका संस्कृतीतील लोक लहान, रानटी टोमॅटो अन्न म्हणून वापरत असत. तेव्हाचे टोमॅटो आजच्या टोमॅटोपेक्षा आकाराने लहान आणि बेरीसारखे होते.
काळाच्या ओघात प्रवाशांमुळे टोमॅटो मध्य अमेरिकेत पोहोचला आणि नंतर सोळाव्या शतकात स्पॅनिश लोकांनी त्याची ओळख युरोपला करून दिली. सुरुवातीला मात्र युरोपातील अनेक देशांमध्ये टोमॅटो विषारी असल्याचा समज होता, त्यामुळे त्याचा वापर खाण्यासाठी न करता शोभेची वनस्पती म्हणून केला जात असे.
मात्र, इटलीने सर्वप्रथम टोमॅटोचा स्वयंपाकात मोठ्या प्रमाणावर स्वीकार केला. इटालियन लोक त्याला ‘पोमोडोरो’ म्हणजेच ‘सोनेरी सफरचंद’ म्हणत. अभ्यासकांच्या मते, त्या काळातील काही टोमॅटो पिवळ्या रंगाचे असल्याने हे नाव प्रचलित झाले असावे.
यानंतर पोर्तुगीज व्यापाऱ्यांमार्फत सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला टोमॅटो भारतात आला. भारतातील उबदार हवामान त्याला चांगले मानवले आणि हळूहळू तो देशभर पसरला. आज भारतीय स्वयंपाकघरातील तो एक अविभाज्य घटक बनला आहे.
टोमॅटोबद्दल आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे, आपण त्याला भाजी समजतो; पण वनस्पतीशास्त्रानुसार ते फळ आहे. त्याचं शास्त्रीय नाव Solanum lycopersicum असून तो सोलानेसी (Solanaceae) कुळातील वनस्पती आहे. याच कुळात वांगे आणि बटाट्याचाही समावेश होतो.
इतका इतिहास, इतकं महत्त्व आणि इतका वापर असूनही त्याचं खरं मराठी नाव मात्र काळाच्या ओघात मागे पडलं. इंग्रजीतील ‘टोमॅटो’ हा शब्द इतका रूढ झाला की, मूळ मराठी शब्द जवळपास विस्मृतीत गेला.
आता प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच वाढली असेल.
टोमॅटोला मराठीत ‘विलायती वांगे’ असे म्हटले जाते. काही भागांत तो ‘बेलवांगे’ किंवा ‘भेदरे’ या नावांनीही ओळखला जातो.
‘विलायती’ म्हणजे परदेशातून आलेले आणि ‘वांगे’ म्हणजे वांग्याच्या कुळातील भाजी. टोमॅटो हा वांग्याच्याच कुळातील असल्यामुळे मराठीत त्याला ‘विलायती वांगे’ हे नाव देण्यात आले आहे. आज हा शब्द फारसा वापरात नसला, तरी मराठी भाषेतील पारंपरिक आणि योग्य नाव ‘विलायती वांगे’ हेच आहे.
म्हणून पुढच्या वेळी कोणी विचारलं, ‘टोमॅटोला मराठीत काय म्हणतात?’ तर उत्तर असेल – मराठीत त्याला ‘विलायती वांगे’ म्हणतात. काही भागांत ‘बेलवांगे’ किंवा ‘भेदरे’ या नावांनीही तो ओळखला जातो.
