What Is the Real Marathi Word for Xerox: आपण दैनंदिन आयुष्यात नकळत वापरत असलेल्या अनेक शब्दांमागे रोचक इतिहास दडलेला असतो. त्यापैकीच एक शब्द म्हणजे ‘झेरॉक्स’. कॉलेजमध्ये असो, सरकारी कार्यालयात असो किंवा एखाद्या स्टेशनरी दुकानात “एक झेरॉक्स काढा”, “झेरॉक्स दे ना” किंवा “फाईलची झेरॉक्स करून आण” अशी वाक्ये आपण नेहमी ऐकतो. इतकंच नाही, तर अनेकदा ‘फोटो कॉपी’ हा शब्ददेखील लोक विसरतात आणि थेट ‘झेरॉक्स’ असंच म्हणतात. पण, प्रत्यक्षात हा शब्द एखाद्या प्रक्रियेचं नाव नसून, ते एका कंपनीचं नाव आहे, ही गोष्ट अनेकांना माहीत नाही.

झेरॉक्सचा इतिहास समजून घेतला, तर हा शब्द इतका प्रसिद्ध कसा झाला ते लक्षात येते. १९३८ साली अमेरिकेतील संशोधक चेस्टर कार्लसन यांनी झेरोग्राफी (Xerography) ही प्रक्रिया शोधून काढली. या तंत्रज्ञानामुळे कागदावरील मजकूर किंवा चित्रे कार्बन पेपर किंवा शाईशिवाय दुसऱ्या कागदावर कॉपी करणे शक्य झाले. त्या काळात ही कल्पना अत्यंत क्रांतिकारी मानली गेली. पुढे या तंत्रज्ञानावर आधारित मशीन तयार करण्यासाठी अमेरिकेतील Xerox Corporation या कंपनीने मोठे संशोधन केले.

१९५९ साली या कंपनीने Xerox 914 नावाचे पहिले प्लेन पेपर कॉपियर मशीन बाजारात आणले. हे मशीन इतके लोकप्रिय झाले की, काही वर्षांतच ते जगभरातील कार्यालये, शाळा, महाविद्यालये आणि कंपन्यांमध्ये वापरले जाऊ लागले. या मशीनचे वैशिष्ट्य म्हणजे साध्या कागदावर जलद आणि सोप्या पद्धतीने प्रत तयार करणे. त्यामुळे दस्तऐवजांच्या प्रती काढण्याची पद्धतच बदलून गेली.

याच मशीनच्या यशामुळे ‘झेरॉक्स’ हा शब्द हळूहळू लोकांच्या बोलण्यात स्थिरावू लागला. सुरुवातीला लोक “झेरॉक्स मशीनवर कॉपी काढा” असे म्हणायचे; पण नंतर थेट “झेरॉक्स काढा” असाच शब्दप्रयोग रूढ झाला. हळूहळू कंपनीचे नावच प्रक्रियेचे नाव बनले. भाषाशास्त्रात अशा प्रकाराला ब्रँड नावाचे सर्वसाधारण शब्दात रूपांतर (genericization), असे म्हटले जाते.

भारतामध्येही याच प्रकारे ‘झेरॉक्स’ हा शब्द लोकप्रिय झाला. सरकारी कागदपत्रे, ओळखपत्रे, अर्ज किंवा नोट्स यांच्या प्रती काढताना जवळजवळ प्रत्येक जण ‘झेरॉक्स’ असाच शब्द वापरतो. अनेक शहरांमध्ये तर कॉपी काढणाऱ्या दुकानांना लोक थेट ‘झेरॉक्स सेंटर’ असेच संबोधतात.

असा प्रकार केवळ ‘झेरॉक्स’पुरता मर्यादित नाही. अनेक ब्रँड नावांनी मूळ शब्दांवर अधिराज्य गाजवले आहे. उदाहरणार्थ, इंटरनेटवर काही शोधायचे असल्यास लोक “गूगल कर”, असे म्हणतात; जरी गूगल हे प्रत्यक्षात एका कंपनीचे नाव असले तरी. त्याचप्रमाणे पाण्याच्या बाटलीसाठी ‘बिसलेरी’ किंवा गरम पाणी ठेवण्याच्या बाटलीसाठी थर्मास असे शब्दही अनेकदा सर्वसाधारण अर्थाने वापरले जातात.

मात्र, भाषिक दृष्टिकोनातून पाहिले, तर ‘झेरॉक्स’ हा शब्द मराठीतील मूळ शब्द नाही. तो इंग्रजीतून आलेला असला तरी बोलाचालीत तो इतका प्रचलित झाला की, शुद्ध मराठी प्रतिशब्द जवळजवळ विस्मरणात गेले. त्यामुळे जर तुम्ही एखाद्या दुकानात जाऊन मराठीतून हा शब्द वापरला, तर दुकानदारही क्षणभर गोंधळून जाऊ शकतो.

आता प्रश्न असा की, झेरॉक्सला मराठीत नेमकं काय म्हणतात?

मराठी शब्दकोश आणि भाषातज्ज्ञांच्या मते ‘झेरॉक्स’ किंवा ‘फोटो कॉपी’साठी मराठीत ‘छायाप्रत’ किंवा ‘प्रतिमुद्रा’ हे शब्द वापरले जातात. मात्र, व्यवहारात हे शब्द फारसे वापरले जात नाहीत आणि बहुतेक ठिकाणी आजही ‘झेरॉक्स’ हाच शब्द सर्वाधिक प्रचलित आहे.