Left Ear or Right Ear Scientists Reveal the Best Ear for Phone Calls: आजच्या काळात स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी डोळे उघडल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोबाईल आपल्या हातात असतो. ऑफिसचे काम, ऑनलाइन शिक्षण, बँकेचे व्यवहार, सोशल मीडिया आणि मनोरंजन अशा अनेक गोष्टींसाठी आपण मोबाईलचा वापर करतो. पण, या सततच्या वापराचा आपल्या शरीरावर नेमका काय परिणाम होतो याबाबत अनेक संशोधनं वेळोवेळी समोर येत असतात.

मोबाईलचा जास्त वापर डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकतो हे अनेकांना माहीत आहे. मात्र, फोनवर बोलताना आपण कोणता कान वापरतो याचाही आपल्या आरोग्याशी काही संबंध असू शकतो का? हा प्रश्न अनेकांना पडत नाही. पण, जगभरातील काही संशोधकांनी याच विषयावर अभ्यास केला असून त्यातून काही रोचक माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे बहुतेक लोक फोनवर बोलताना नकळत एका विशिष्ट कानाचाच वापर करतात. तुम्हीही कदाचित हेच करत असाल, पण तो कान कोणता आहे आणि त्यामागचं कारण काय आहे?

संशोधनानुसार, जगातील बहुतांश लोक फोनवर बोलताना उजव्या कानाचा वापर करतात. काही अभ्यासांमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, उजव्या कानाने फोनवर ऐकताना मिळणारे संकेत मेंदूच्या विशिष्ट भागांपर्यंत अधिक वेगाने पोहोचतात, त्यामुळे काही संशोधकांनी उजव्या कानाचा सतत वापर टाळण्याचा सल्ला दिला आहे.

काही अहवालांमध्ये असेही म्हटले गेले आहे की, मोबाईलमधून निर्माण होणाऱ्या रेडिओ लहरी किंवा रेडिएशनचा प्रभाव एका बाजूवर जास्त काळ पडत राहिल्यास त्याचा शरीरावर परिणाम होऊ शकतो. मात्र, याबाबत अद्याप ठोस आणि अंतिम निष्कर्ष समोर आलेले नाहीत.

फिनलँडमधील काही संशोधक आणि अणुसुरक्षा क्षेत्रातील अभ्यासकांनी केलेल्या संशोधनात असे आढळून आले की, मोबाईलच्या संपर्कात येणाऱ्या पेशींमध्ये काही जैविक बदल होऊ शकतात. याचा परिणाम रक्त आणि मेंदू यांच्यामधील नैसर्गिक संरक्षण प्रणालीवर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, या अभ्यासातूनही डावा कान सुरक्षित की उजवा कान याचे स्पष्ट उत्तर मिळाले नाही.

मग नेमका कोणता कान वापरणे योग्य?

अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, सुमारे ८० टक्के लोक फोनवर बोलताना उजव्या कानाचा वापर करतात. यामागे मेंदूची कार्यपद्धती कारणीभूत असू शकते, असे संशोधकांचे मत आहे.

मात्र तज्ज्ञांच्या मते, सतत एकाच कानाचा वापर करण्यापेक्षा वेळोवेळी कान बदलणे अधिक योग्य ठरू शकते. म्हणजेच काही वेळ उजव्या कानाने आणि काही वेळ डाव्या कानाने बोलल्यास एका बाजूवर सतत ताण येत नाही.

याशिवाय, दीर्घकाळ फोनवर बोलायचे असल्यास स्पीकर मोड किंवा इअरफोनचा वापर करणेही फायदेशीर ठरू शकते, त्यामुळे फोन आणि डोके यांच्यातील अंतर वाढते.

सध्या उपलब्ध संशोधनांमध्ये डावा कान किंवा उजवा कान यापैकी कोणता पूर्णपणे सुरक्षित आहे, याचा ठोस निष्कर्ष समोर आलेला नाही. मात्र एकाच कानाचा सतत वापर टाळणे आणि गरजेनुसार दोन्ही कानांचा वापर करणे ही सवय फायदेशीर ठरू शकते, असे अनेक संशोधकांचे मत आहे.

पुढच्या वेळी फोनवर बोलताना एकदा लक्ष द्या… तुम्ही नेहमी कोणता कान वापरता?