Poorest Country In The World: जागतिक स्तरावर दरडोई उत्पनानुसार काही देशांचे जगातील सर्वांत श्रीमंत देश किंवा जगातील सर्वांत गरीब देशांची श्रेणी ठरवली जाते. यातील गरीब श्रेणी असलेल्या देशांना अनेकदा राजकीय अस्थिरता आणि संघर्षांचा सामना करावा लागतो; ज्यामुळे त्यांच्या देशाच्या विकासात अडथळा निर्माण होतो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालानुसार २१ फेब्रुवारी २०२४ पर्यंतच्या जगातील सर्वांत गरीब देशांच्या श्रेणीमध्ये २०२४ मधील १० देश कोणते हे ठरवण्यात आले आहे. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत जगातील हे सर्वांत गरीब देश कोणते आहेत ते तुम्हाला ठाऊक आहे का? दरडोई उत्पन्नानुसार जगातील १० गरीब देश (Poorest Country In The World) दक्षिण सुदान पूर्व आफ्रिकेतील दक्षिण सुदान हा देश जगातील सर्वांत गरीब देश आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार, २०२४ मध्ये ४५५.१५७ डॉलर्स दरडोई उत्पन्न असलेला दक्षिण सुदान जगातील सर्वांत गरीब देश ठरला आहे. २०११ मध्ये दक्षिण सुदानला स्वातंत्र्य मिळाले आणि हा जगातील सर्वांत तरुण देश बनला. मात्र, तो सध्या मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे. दक्षिण सुदानमध्ये आर्थिक अस्थैर्य, सामाजिक अस्थिरता आणि दारिद्र्य वाढत चालले आहे. बुरुंडी पूर्व आफ्रिकेतील बुरुंडी देशाचाही या यादीत समावेश आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF नुसार २०२४ मध्ये ९१५.८७९ डॉलर्स इतके दरडोई उत्पन्न किंवा पर कॅपिटा इन्कम असलेला बुरुंडी जगातील दुसरा सर्वांत गरीब देश आहे. बुरुंडी हा पूर्व आफ्रिकेतील एक लहान देश असून या देशाला लोकसंख्यावाढीमुळे तीव्र सामाजिक-आर्थिक आव्हाने भेडसावत आहेत. सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक हा जगातील तिसरा गरीब देश असून, IMF च्या अंदाजानुसार, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकचे दरडोई उत्पन्न १,२२२.६४१ डॉलर्स आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो हा जगातील चौथा सर्वांत गरीब देश आहे. IMF च्या २०२४ च्या अंदाजानुसार, या देशाचे दरडोई उत्पन्न १५५२.३४३ डॉलर्स आहे. या देशात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संसाधने असूनही भ्रष्टाचार आणि अकार्यक्षम प्रशासनामुळे या देशाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. निजेर पश्चिम आफ्रिकेतील निजेर देश जगातील सर्वांत गरीब देशांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. IMF च्या २०२४ च्या अंदाजानुसार, निजेरचे दरडोई उत्पन्न सुमारे १,६७४.६५९ डॉलर्स आहे. या देशाच्या मुख्य समस्या कृषी उत्पादनाचा अभाव आणि पायाभूत सुविधांची कमी या आहेत. मोझांबिक दक्षिण पूर्व आफ्रिकेतील मोझांबिक देश जगातील सर्वांत गरीब देशांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. IMF च्या २०२४ च्या अंदाजानुसार, मोझांबिक देशाचे दरडोई उत्पन्न १,६४८.५५५ डॉलर्स आहे. हा देश आर्थिक आस्थिरता आणि नैसर्गिक आपत्तीला सातत्याने सामोरा जात आहे. मलावी जगातील गरीब देशांच्या यादीत मलावी सातव्या क्रमांकावर आहे. IMF च्या अंदाजानुसार २०२४ साठी मलावीचे दरडोई उत्पन्न सुमारे १,७११.८३७ डॉलर्स आहे. आर्थिक सुधारणा चांगल्या रीतीने राबवूनही मलावी जागतिक स्तरावर सर्वात गरीब देशांपैकी एक आहे. कृषी उत्पादन या देशाचा मुख्य उद्योग असून ८० टक्के जनता यावर अवलंबून आहे. वातावरण बदलाचा सर्वात जास्त फटका या देशाला बसतो. लायबेरिया लायबेरिया देश जगातील सर्वांत गरीब देशांमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. IMF नुसार २०२४ मध्ये या देशाचे दरडोई उत्पन्न १,८८२.४३२ डॉलर्स होते. देशांतर्गत यादवी, हिंसाचार आणि इबोलासारख्या रोगाचा उद्रेक यांच्यामुळे हा देश दारिद्र्यात खितपत असल्याचा निष्कर्ष आहे. मादागास्कर IMF च्या २०२३ च्या आकडेवारीनुसार मादागास्कर २०२३ मध्ये जगातील १० वा गरीब देश होता आणि २०२४ मध्ये हा देश ९ व्या क्रमांकावर आहे. IMF च्या अंदाजानुसार, मादागास्करचे दरडोई उत्पन्न २०२४ मध्ये सुमारे १,९७९.१७३ डॉलर्स होते. हेही वाचा: पुण्यातील ‘ही’ बाग वसवली होती एकाने अन् ओळखली जात होती दुसऱ्याच्या नावाने; जाणून घ्या, या जागेचा इतिहास येमेन IMF २०२३ अहवालानुसार जगातील सर्वांत गरीब देशांच्या यादीत ११ व्या क्रमांकावर असलेला येमेन IMF च्या २०२४ च्या यादीत १० व्या क्रमांकावर आहे. येमेन देशाचे २०२४ मधील दरडोई उत्पन्न १,९९६.४७५ डॉलर्स होते. जागतिक बँकेच्या अहवालानुसार ऐतिहासिकदृष्ट्या येमेन मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेतील सर्वांत गरीब देशांपैकी एक आहे.